Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

दत्ता गायकवाडांनी पदाचा राजीनामा देऊन फेकली विकेट
आर्थिक व मानसिकदृष्टय़ा खचल्याने जिल्हा प्रमुख पदाचा त्याग

प्रतिनिधी / नाशिक

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेने लढविलेल्या लोकसभेच्या एकमेव जागेवर अर्थात, नाशिकमध्ये पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि त्यावरून सुरू झालेल्या भवती न् भवतीत खुद्द पराभूत उमेदवार दत्ता गायकवाड यांनीच आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत पहिली विकेट फेकली आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत संघटनेची स्थानिक कार्यकारिणी रद्द करण्याचे संकेत दिले होते.

शिक्षणसंस्थांची बनवाबनवी
‘डोनेशन’च्या अंतस्थ हेतूनेच पालकांच्या मुलाखती

प्रतिनिधी / नाशिक

शहरी अथवा ग्रामीण भागातील कोणत्याही खासगी शाळेत पाल्यास प्रवेश मिळवायचा असेल तर ‘डोनेशन’ मोजल्याशिवाय ते शक्य होत नाही असा बहुतांश पालकांचा अनुभव आहे. बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तर अधिक ‘डोनेशन’ कोण देणार हा निकष खुद्द पालकांची मुलाखत घेवून लावला जातो. प्रवेश प्रक्रियेत डोनेशन व पालकांची मुलाखत या दोन्ही बाबी नियमबाह्य़ असल्याचे स्पष्टीकरण खुद्द शिक्षण विभाग देत असले तरी शिक्षण संस्था त्यास जुमानत नाहीत.

कीर्तनरंगी!
मॅनेजमेंट टेक्निक्स, पॉझिटिव्ह थिंकींग, अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, काऊन्सििलग, सायको मॅट्रिक टेस्ट.. अशा जडजंबाळ आंग्ल शब्दांचा सातत्याने मारा करीत ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणवून घेणाऱ्या मंडळींच्या ठायी दिसणाऱ्या भपकाऱ्याचा जराही लवलेश न होऊ देता व्यवस्थापन शास्त्रातील या साऱ्या तंत्रांना पोवाडा, भारूड असा अस्सल एतद्देशीय सांस्कृतिक मुलामा चढविणाऱ्या संदीप भानोसे यांनी आज औद्योगिक कीर्तनकार म्हणून देश-विदेशात आपली ओळख निर्माण केली असली तरी येथवरचा त्यांचा प्रवास वळणा वळणांचा आहे.

माथाडी कामगारांचा मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

नाशिकरोड रेल्वे मालधक्क्य़ावरील कामगारांच्या प्रश्नांकडे कार्टीग एजन्ट दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करत माथाडी कामगारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. नाशिक जिल्हा माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियन संघटनेच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, श्रीधर देशपांडे, अशोक लहाने यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. कार्टीग एजन्टच्या कार्यशैलीचा निषेध करून निदर्शने करण्यात आली. माथाडी बोर्डाने जाहीर केलेल्या वाढीव दराने मजुरीची रक्कम माथाडी बोर्डाकडे भरणा करून कामगारांचे वेतन त्वरित अदा करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मालधक्क्य़ावर अनोंदीत कामगार कार्यरत असून त्यांचे काम बंद करावे, तसेच बालकामगारांकडून करून घेतले जाणारे हमालीचे कामही बंद करण्याची मागणी यावेळी कामगारांनी केली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी आणि नवीन धक्क्य़ावरील कामगारांना जुन्या धक्क्य़ात काम देणे बंद करावे अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोर्चात हिरामण तेलारे, बाळकृष्ण गोरे, विठ्ठल ठोके आदी कामगार सहभागी झाले होते.

नाशिक जिल्हा उद्योग केंद्राचे पुरस्कार जाहीर
नाशिक / प्रतिनिधी

२००५ ते २००७ या वर्षांत लघु उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २९ मे रोजी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या हस्ते जिल्हा पुरस्कार देवून उद्योजकांना गौरविण्यात येणार आहे. सातपूर येथील निमा हाऊसमध्ये सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. २००५ या वर्षांसाठी दिंडोरी तालुक्यातील लखमापूरच्या हेक्झॉगॉन न्युट्रीशनला प्रथम तर सातपूरच्या स्टर्लीग इंडस्ट्रिजला द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. २००६ मध्ये अंबडच्या रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्सला प्रथम व अंबडच्याच एस. एस. एस. इंडियाला द्वितीय, २००७ या वर्षांत सातपूरच्या मॅक्सहिल फार्मास्युटिकल्सला प्रथम तर सातपूरच्याच जय बायोटेक इंडस्ट्रिजला द्वितीय जिल्हा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भास्कर पालवे यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्य़ात नवापूरमध्ये सर्वाधिक पशुधन
नवापूर / वार्ताहर

जिल्ह्य़ात तीन लाख हेक्टर डोंगरी क्षेत्र असून नवापूर तालुक्यात सर्वाधिक पशूधन असल्याची माहिती जिल्हा पशूधन उपायुक्त डॉ. के. आर. सिंघल यांनी दिली.
गायींची संख्या एक लाख आठ हजार ८९, म्हशी २४ हजार ९६७ आहेत. नवापूरलगत गुजरातची हद्द असल्याने येथे दुग्धोत्पादनासाठी अधिक संधी आहे. तालुक्यातील जमीन सुपीक, रंगावली मध्यम प्रकल्पामुळे मुबलक पाणी तसेच चाराही उपलब्ध असल्यामुळे नवापूरला पशूधनाची संख्या सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील जंगल क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर आहे. नवापूर तालुक्याव्यतिरिक्त अक्कलकुवा तालुक्याचा क्रमांक आहे. अक्कलकुव्यात ७९ हजार १४९ गायी तर शहाद्यात ७४ हजार ७१४, धडगावात ७१ हजार ६४, नंदुरबार तालुक्यात ५४ हजार ६३ गायी आहेत. म्हशी शहाद्यात सर्वाधिक २६ हजार ३९२ तर सर्वात कमी तळोदा तालुक्यात ११ हजार २५८ आहेत. गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्य़ात गायींची संख्या १४ हजारांनी तर म्हशींची संख्या बारा हजारांनी कमी झालेली आहे. जरशी, जाफराबादी, सुरत एच. एफ. या सारख्या संकरीत जनावरांची संख्या कमी असून बहुतांश जनावरे स्थानिक जातींची आहेत. जनावरांच्या संभाव्य आजाराच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रतिबंधक लसी प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहितीही सिंघल यांनी दिली.

इगतपुरी आश्रमशाळेत मोफत प्रवेश
नाशिक / प्रतिनिधी

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे भटक्या, विमुक्त जाती, जमातीच्या इयत्ता १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी आश्रमशाळा आहेत. विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, पुस्तके, ग्रंथालय, क्रीडा साहित्य विनामूल्य दिले जाते. पुढील शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून कैकाडी, बंजारा, राजपूत भामटा, वडार, बेलदार, धनगर, गोसावी, वंजारी या प्रवर्गात येणाऱ्या भटक्या, विमुक्त जाती जमातीच्या मुलामुलींनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक किंवा अधीक्षक यांच्याशी कार्यालयीन वेळेत प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा, तळेगांव रोड, नाशिक-मुंबई हायवेवर, इगतपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गोस्वामी यांनी केले आहे.