Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळी
माजी जिल्हाध्यक्षांच्या छायाचित्रावरून वाद

वार्ताहर / जळगाव

लोकसभा निवडणूक पार पडते न पडते तोच विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झालेली असतानाच जिल्हा काँग्रेसमध्ये गटा-तटाचा वाद उफाळून आला आहे. जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील यांचे छायाचित्र हे वादाचे कारण असून त्यावरून विद्यमान अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी एका गटाने लावून धरली आहे. परिणामी आधीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या काँग्रेसची जिल्ह्य़ातील स्थिती अधिकच रसातळाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सावरकर जयंती विशेष
सावरकर जयंतीदिनी भगूरमध्ये जुन्या मित्रांचा मेळा

प्रकाश उबाळे/ भगूर

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांचे मूळ गाव असलेल्या भगूर येथील वीर सावरकर जयंती उत्सव समितीने भगूर निवासी मित्र जमा करून त्यांच्यात ॠणानुबंध जपण्याचा आगळा-वेगळा पायंडा पाडला आहे. या उपक्रमातून आत्मिक समाधान मिळत असल्यानेच नोकरी व्यवसायानिमित्त अन्यत्र स्थायिक झालेली मंडळी या दिवशी आवर्जुन येथे दाखल होत असतात.

तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञात रंगले भाविक
अमळनेर / वार्ताहर

वातावरणातील निस्तब्धता आणि प्रत्येकाच्या हातात पेटविलेल्या मेणबत्त्या, मुखात रामनामाचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञाचा समारोप अमळनेरच्या खड्डाजीन (अयोध्यानगरी) भागात झाला. कृषीभूषण साहेबराव पाटील मित्र मंडळातर्फे रामायण कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. रामराव ढोक महाराजांनी रावणाचा वध आणि रामराज्याभिषेकाचे रसभरित वर्णन केले.

श्रमिक संघाचा इशारा
धुळे / वार्ताहर

वेगवेगळ्या गावांमधून सुमारे ४७५ मजुरांचे अर्ज भरून कामाची मागणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तीन महिने उलटल्यानंतरही रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता या सर्व मजुरांना बेकार भत्ता द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा धुळे जिल्हा सर्व श्रमिक संघाचे सचिव श्रावण शिंदे यांनी लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी आणि रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना दिला आहे.
नकाणे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने स्वत: सात मार्च २००९ रोजी मजुरांशी संवाद साधला आणि या मजुरांना काम मिळत नसल्याबद्दल खात्री करून घेतली. काम मागणीचे अर्ज १५ दिवसांत उपलब्ध करून देऊ अन्यथा बेकार भत्ता देऊ, असे आश्वासन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु नकाणे, फागणे, गोंदूर, नांदनवन, मालपूर, कसारा, प्रतापपूर, नवडणे, कळंभीर या गावातून सुमारे ४७५ मजुरांनी अर्ज भरून कामांची मागणी केली असली तरी गेल्या तीन महिन्यानंतर अद्यापही कुणाला रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. २००६ पासून धुळे जिल्ह्य़ातील ३३ गावांमधून तीन हजार जणांनी रोजगार मागणीसाठी अर्ज भरून दिले आहेत. अशा सर्व मजुरांना दरवर्षीप्रमाणे १०० दिवसांचा अर्थात तीन वर्षांचा बेकार भत्ता देण्यात यावा, अन्यथा आपल्या न्याय हक्कासाठी मजुरांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अ‍ॅड. मदन परदेशी व रमेश पारोळेकर यांच्या सह्य़ा आहेत.