Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

बहुतांश मोबाईल टॉवर्स पिंपरीत अनधिकृत
पिंपरी पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडित

बाळासाहेब जवळकर
पिपरी, २७ मे

पिपरी-चिंचवड शहरात मोबाईल कंपन्यांनी उभारलेले ३४३ पैकी ३२६ मनोरे अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महापालिकेला २५ लाखांहून अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. विनापरवानगी मनोरे उभारणाऱ्या या मोबाईल कंपन्यांचे हित जपण्याचा प्रकार या निमित्ताने उघड झाला असून पालिकेचा भोंगळ आणि आतबट्टय़ाचा कारभारही चव्हाटय़ावर आला आहे. पुरेशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत, फायली सापडत नाहीत, असे सांगत हात वर करण्याच्या प्रशासनाच्या पवित्र्याने या संपूर्ण प्रकारामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पीएमपी गाडय़ांच्या खरेदीत नक्की कोणाला विशेष रस ?
पुणे, २७ मे/प्रतिनिधी

पीएमपी गाडय़ांच्या खरेदी प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे की, त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या डॉ. नितीन करीर यांचा हस्तक्षेप सुरू आहे, याची माहिती पुणेकरांना मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी गाडय़ा खरेदीत ‘विशेष रस’ दाखवला आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

आता ‘पेस्ट कन्ट्रोल’च हवे
मुकुंद संगोराम

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर कितीही वर्षे संशोधन केले, तरी त्यातून फारसे काही हाती लागणार नाही, एवढा विश्वास त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांच्यासाठी स्वतंत्र असलेल्या दोन वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण करून त्यांचे खासगी कंपनीत रूपांतर करताना केवढी तरी मोठी स्वप्ने दाखविण्यात आली होती.

पिपरीतही रिक्षाभाडे मीटरनुसारच
पुणे, २७ मे/ प्रतिनिधी

पुणे शहराप्रमाणेच पिपरी- चिंचवड शहरामध्येही रिक्षाभाडे मीटरनुसारच आकारण्याचा निर्णय आज विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींशी आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील रिक्षा थांब्यावर कोणत्याही एका संघटनेचा अधिकार न राहता प्रत्येक थांब्यावर कोणत्याही रिक्षा संघटनेच्या रिक्षा थांबतील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

महापालिकांच्या गोपनीय बैठका पारदर्शी होणार!
सर्व माहिती इंटरनेटवर टाकण्याचे राज्याचे आदेश
संजय बापट
पुणे, २७ मे

माहितीच्या अधिकाराला बगल देणारी गोपनीयतेची पळवाटही आता राज्यातील सर्व महापालिकांच्या कारभारापुरती बंद होणार आहे. महापालिकांमधील गोपनीय बैठकांसह सर्व कारभाराचा तपशील नेटच्या जाळ्यात आणण्याचा महत्त्वाचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यानुसार कारभाराचा संपूर्ण तपशील इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचे बंधन राज्यातील सर्व महापालिकांवर आले आहे.

राजू चौधरी खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात
लोणावळा, २७ मे/ वार्ताहर

लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू ऊर्फ भूपेंद्र चौधरी यांच्या हत्येचे धागेदोरे मिळवण्यास पोलिसांना यश मिळाले असून हत्येप्रकरणी दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. नंदू औरंगे (वय ५०, रा. गवळीवाडा, लोणावळा), वैभव गवळी (वय ३०, रा. लोणावळा) अशी संशयित आरोपींची नावे असून या प्रकरणात अजून तिघांवर संशय असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आज सवलतीत
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज १२६ वी जयंती
पुणे, २७ मे/ प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने ग्राहकहित प्रकाशन व १८५७ चे स्वातंत्र्यसमर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ३५० रुपये किमतीचा ग्रंथ केवळ १०० रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणारा हा ग्रंथ कॉसमॉस बँकेच्या व ग्राहक पेठेच्या सर्व शाखांमध्ये पाच जूनपासून उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर व समितीचे सचिव सूर्यकांत पाठक यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
दुसऱ्या टप्प्यात १०३५ गावांमध्ये लोकाधारित देखरेख !
पुणे, २७ मे / प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या लोकाधारित देखरेख प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकुण १३ जिल्ह्य़ांमधील १०३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्य़ांमधील २२५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात त्याची व्याप्ती वाढवून या पाच जिल्ह्य़ांमधील ४५० तसेच नव्याने निवडलेल्या ८ जिल्ह्य़ांमधील ३६० गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

प्राधिकरणाच्या जागांची दरवाढ नाही
गृहप्रकल्प गुंडाळावा लागणार?
पिंपरी, २७ मे / प्रतिनिधी
जागतिक मंदी,तसेच बाजारपेठेत मागणी कमी असल्याने यंदाच्या वर्षी प्राधिकरणाच्या जागांचे दर वाढविण्यात येणार नाहीत, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी आज येथे सांगितले.दरम्यान,भोसरी येथे अल्प,मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी खासगी तत्त्वावर बांधण्यात यावयाचा नियोजित गृह प्रकल्पाकडे बिल्डर लॉबीने पाठ फिरविल्याने तो तूर्तास गुंडाळावा लागणार अशी चिन्हे आहेत.

विवाहविषयक ज्योतिष प्रश्नांची माहिती
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘जोडी जमली रे’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये गुरुवारी रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या भागात अनेक धमाल इंटरॅक्टिव्ह खेळ, ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ याबरोबरच मनोरंजनपर गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे. विवाहामुळे दोन जीव, दोन मने आणि त्यांची कुटुंबे यांचे नाते जुळते. म्हणूनच लग्न जुळवताना वधू व वर या दोघांचीही जन्मपत्रिका पाहिली जाते. त्यातील दोष कमी करण्यासाठी, अनिष्ट ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपासना तसेच धार्मिक विधी केले जातात. या सर्वच गोष्टींबद्दल कार्यक्रमात सहभागी झालेले ज्योतिषी पंडित संदीप अवचट सविस्तर माहिती देतील. गुरुवारच्या भागात ते मंगळ दोष यावर माहिती सांगून स्पर्धकांची मते जाणून घेतील. मंगळ दोष म्हणजे काय, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, त्यावर कोणती उपाययोजना करता येते यांसारख्या गोष्टी सांगण्यात येतील. त्यामुळे स्पर्धक तरुण-तरुणींबरोबरच ‘जोडी जमली रे’ कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांमधील उपवर आणि उपवधू तसेच त्यांच्या पालकांनाही पं. संदीप अवचट मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय ‘कुंभ विवाह आणि अर्क विवाह’ या विषयावरही ते माहिती देणार आहेत.
प्रतिनिधी

ना. घ. देशपांडे जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांवर कार्यक्रम
पुणे, २७ मे/ प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कविवर्य ना. घ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांवर आधारित उद्या (२८ मे) सायंकाळी येथील निवारा सभागृहात वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. निवारा सभागृहात सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ना. घ. देशपांडे यांच्या ‘नदीकिनारी’, ‘डाव मांडून मांडून’, ‘बकुळ फुलारे’ अशा काही निवडक कवितांचे गायन संगीतकार राहुल घोरपडे व सहकारी करणार आहेत. या गाण्यांसंबंधी कविश्रेष्ठ ना. धों. महानोर बोलणार आहेत. ना. घ. देशपांडे यांचे व्यक्तिचित्रण, त्यांचे लेखन, निसर्गातील जगणं व व्यक्तिगत जीवनासंबंधी त्यांनी केलेले लेखन, त्यांच्या शेवटपर्यंतच्या काळासंबंधी व त्यांच्या समकालीन कवितेसंबंधी ना. धों. महानोर हे त्यांचे विचार मांडणार आहेत. त्याचप्रमाणे ना. घ. देशपांडे यांच्या काही निवडक कवितांचे वाचनही ते करणार आहेत.

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ‘धूम धाम धूम’ चित्रपटाची निर्मिती
पुणे, २७ मे/प्रतिनिधी
कीड्स सिलेव्हिजन व रॉयल पामच्या वतीने लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ‘धूम धाम धूम’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती व्ही.सी.डी. फॉरमॅटमध्ये करण्यात आली आहे. एकूण १८ मुला-मुलींनी आपल्या खाऊच्या पैशातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा रहस्यमय विनोदी चित्रपट असून आकर्षक नाचगाणी, राक्षस, चेटकीण, जादुनगरी, अ‍ॅनिमेशन लाइव्ह शूटिंगचा मनोरंजनाचा सुरेख संगम असलेला हा चित्रपट आहे. लहान मुलांसाठी या चित्रपटाची निर्मिती प्रामुख्याने केलेली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू तुलालवार, गणेश रासने असून संगीतकार रत्नाकर पिळणकर आहेत.

‘डॉ. अ. रा. कुलकर्णी यांचे कार्य दिशादर्शक’
पुणे, २७ मे/प्रतिनिधी

इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी केलेले कार्य पुढील पिढीला दिशादर्शक ठरणार आहे, या शब्दांत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी टिळक बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. उमेश केसकर, प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. टिळक विद्यापीठाला कुलकर्णी यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या योगदानामुळेच विद्यापीठाची प्रगती होत आहे. त्यांच्या पुढाकाराने टिळक महाराष्ट्र विद्यापीठात विविध व्याख्यानमाला सुरू झाल्या. इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर आणि प्रा. विजय काटेकर यांनीही या वेळी डॉ. कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली

‘पक्ष्यांचे प्रकाश’ छायाचित्राचे प्रदर्शन
पुणे, २७ मे / प्रतिनिधी

‘पक्ष्यांचे प्रकाश’ हे छायाचित्राचे प्रदर्शन येत्या २९ ते ३१ मे दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भारतातील भरतपूर, चंबळ, सरिस्का रामनगरम् व नागरहोळे तसेच पुणे परिसरातील विविध पक्ष्यांची छायाचित्रे डॉ. केळकर यांनी टिपली आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन २९ मे रोजी एरीयल फोटोग्राफर गोपाळ बोधे यांच्या हस्ते होणार असून श्रेष्ठ चित्रकार रवि परांजपे हे अध्यक्षस्थानी असतील. निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले ते सर्वाबरोबर वाटण्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना निसर्गाची पशुपक्ष्यांची ओळख होऊन गोडी निर्माण व्हावी, असे डॉ. केळकर यांना वाटते.