Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

परागकण अभ्यासाद्वारे प्राचीन बदलांची उकल
अलिबागजवळ समुद्राच्या पातळीत २३०० वर्षांत पाच मीटरने वाढ
अभिजित घोरपडे, पुणे, २७ मे

 

ग्लोबल वॉर्मिगमुळे समुद्राच्या पातळीत काही फुटांनी वाढ होणार असल्याची धास्ती व्यक्त केली जात असली तरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी अशी वाढ नवी नसल्याचे डेक्कन कॉलेजतर्फे झालेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. अलिबागजवळील चौल या ठिकाणी सापडलेल्या परागकणांवरून तिथे गेल्या २३०० वर्षांमध्ये समुद्राची पातळी तब्बल चार ते पाच मीटरने वाढली असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक भूशास्त्रीय हालचालींमुळे तेथील भूरचनेत झालेले बदल तसेच, तापमानवाढ आणि पावसाच्या प्रमाणात झालेली वाढ या कारणांमुळे समुद्राची पातळी इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याची शक्यता संबंधित अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे समुद्राची पातळी वाढल्याचे पुरातत्वीय पुरावे आधीच मिळाले आहेत. आता परागकणांच्या विश्लेषणामुळे या पुराव्यांना पूरक असा भक्कम आधार प्राप्त झाला आहे. डेक्कन कॉलेजमधील संशोधक डॉ. भास्कर देवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश नाईक यांनी हे संशोधन केले. डॉ. विश्वास गोगटे, अभिजित दांडेकर, सचिन जोशी, शिवेंद्र पाडगावकर आणि श्रीकांत प्रधान यांनीही त्यात हातभार लावला. चौल या ठिकाणाला प्राचीन इतिहास आहे. सुमारे तेवीसशे वर्षांपूर्वी गुप्त काळात व दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात त्या ठिकाणी प्राचीन बंदर होते, याचे पुरावे आहेत. त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे डॉ. गोगटे यांच्या पथकाने गेली काही वर्षे उत्खनन केले. त्यात आताच्या समुद्रपातळीपेक्षा तीन मीटर खोलीवर गुप्त व सातवाहन काळातील मानवी वसाहतीचे पुरावे मिळाले आहेत. या पातळीत मानवी वसाहत असेल तर समुद्राची पातळी त्यापेक्षा किमान दोन मीटर खाली असेल, असा गोगटे यांच्या पथकाचा अंदाज आहे. त्याच उत्खननाच्या ठिकाणच्या मातीमधील परागकणांचा अभ्यास देवतारे व सतीश नाईक यांनी केला. त्यात गवताळ प्रदेश, झुडपी वन व आद्र्र हवामानात आढळणाऱ्या वनस्पतींचे परागकण आढळले आहेत. त्यात विविध प्रकारचे गवत, लव्हाळे, गोडय़ा पाण्याजवळ आढळणाऱ्या वनस्पतींच्या परागकणांचाही समावेश आहे. त्याचबरोबर नेचे, कवक यांसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींचे परागकणही मिळाले आहेत. अशा प्रकारे आताच्या समुद्रपातळीच्या खाली तीन मीटर खोलीवर गोडय़ा पाण्याच्या संपर्कातील वनस्पतींचे परागकण मिळाले असले, तरी खाजण (खारफुटी) जमिनीत असणाऱ्या वनस्पतींचे परागकण आढळलेले नाहीत. याचा अर्थ त्या काळी (तेवीसशे वर्षांपूर्वी) समुद्राची पातळी तीन मीटरपेक्षा बरीच कमी होती. ती तब्बल चार ते पीच मीटरने खाली असावी, असे नाईक यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. चौल येथे मिळालेल्या पुराव्यांप्रमाणेच इतरत्र अशा प्रकारे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याचे पुरावे मिळतात का, हे शोधण्यासाठी डहाणू व वेंगुर्ले येथेही असा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्राच्या पातळीत झालेली वाढ ही केवळ चौल येथील भौगोलिक कारणांपुरती मर्यादित आहे, की संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टीवर झाली, हे या संशोधनानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.