Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘व्हिडिओकॉन’मधील भीषण आगीत ३० कोटींचे नुकसान
२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविली
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी

 

पैठण रस्त्यावरील चितेगावजवळ असलेल्या व्हिडिओकॉन उद्योगात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल २० तासांनंतर आज रात्री आठ वाजता ही आग आटोक्यात आली. आगीमध्ये कोटय़वधी रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे. या आगीत सुमारे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष ज्योती शेखर यांनी सांगितले. ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या आगीत ‘प्लास्टिक मोल्डिंग युनिट’, ‘स्टोअर रूम’ आणि ‘पेंट हाऊस’ जळाले. ‘मोल्डिंग युनिट’मध्ये बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. येथे ‘थिनर’ ठेवले होते. गॅसच्याही टाक्या होत्या. आगीमुळे थिनर आणि गॅस टाक्यांचा स्फोट झाला. त्यामुळे इमारतीचे छत, भिंत कोसळली. नंतर ही आग वेगाने पसरली. माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन बंब रवाना झाले.
कंपनीच्या बंबांनीही लगेच आग विझविण्यास सुरुवात केली होती. विमानतळ प्राधिकरण, औद्योगिक वसाहत, गरवारे, बजाज आणि अन्य कंपन्यांचे बंबही रवाना झाले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूर अंतरावरून दिसत होते. सुमारे ५० कर्मचारी ९ बंब आणि तेवढय़ाच टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते. ‘मोल्डिंग युनिट’मधील आग काही वेळातच शेजारच्या ‘पेंट हाऊस’मध्ये पसरली. तेथे पाण्याचा तसेच फेसाचा मारा करण्यात येत होता. तेथील आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आगीने ‘स्टोअर रूम’ला वेढा दिला. सुमारे ३ हजार लिटर फेस आणि सुमारे २० हजार लिटर पाणी फवारण्यात आल्यानंतर आज रात्री ही आग आटोक्यात आली. सुसाट वाऱ्यामुळे लवकर आग आटोक्यात आणणे शक्य झाले नसल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. आगीचा अंदाज न आल्यामुळे ऐन वेळी पुन्हा फेस मागविण्यात आला. पाणी मिळविण्यासाठी स्थानिक टँकरची मदत घेण्यात आली. आग लागताच या परिसरातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आग वाढत असल्यामुळे तेथील माल अन्यत्र हलविण्याचे कामही हाती घेण्यात आले होते. आग लागली असली तरी कारखान्यातील अन्य काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ‘मोल्डिंग युनिट’मधील ग्राइंडिंग यंत्रामुळे ‘शॉर्ट सर्किट’ होऊन ही आग लागली.