Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम घोषित
पुणे, २७ मे / प्रतिनिधी

 

अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, त्या आषाढीवारीच्या पालखी सोहळ्याचा श्रीगणेशा १५ जूनपासून होत आहे. ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला (१५) संत तुकाराम महाराजांची तर, ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला (१६) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान अनुक्रमे श्रीक्षेत्र देहू व आळंदी येथून होणार आहे. या सोहळ्याची पताका खांद्यावर घेण्यासाठी वारक ऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
दोन्ही पालख्यांचे कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे. सोमवारी (दि. १५) जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर देहूमधीलच इनामदारसाहेब वाडय़ात पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी आकुर्डीत, तसेच तिसऱ्या व चौथ्या दिवशी (दि. १७ व १८) पुण्यात नाना पेठ येथे पालखीचा मुक्काम असेल. दरम्यान, मंगळवारी (दि. १६) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानानंतर तिचा पहिला मुक्काम आळंदीमध्येच गांधीवाडय़ात होणार आहे. दुसऱ्या दिवशी आळंदीतून निघून पुण्यात भवानी पेठेत दोन दिवस (दि. १७ व १८) मुक्काम आहे. पुणे मुक्कामावरून शुक्रवारी (दि. १९) दोन्ही पालख्या निघाल्यानंतर हडपसर येथे दोन्ही पालख्यांची भेट होईल.
त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला दोन दिवस तर, संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे एक दिवस मुक्कामाला राहणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी पुढे यवत, वरवंड, उंडवडी गवळ्यांची येथे प्रत्येकी एक दिवसाचे मुक्काम करून बारामतीला पोहोचेल. हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यानंतर इंदापूर तालुक्यातील भवानीनगर साखर कारखान्यावरून सणसर मुक्कामी व दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २५) बेलवडी येथे गोलरिंगणाचा कार्यक्रम करून निमगाव केतकीला मुक्कामी जाईल. पुढे इंदापूर, सराटी येथील मुक्कामांनंतर रविवारी (दि. २८) अकलूज येथील माने विद्यालयात गोल रिंगण झाल्यावर तेथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होईल. दरवर्षी पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरणारे उभे रिंगण सोमवारी (दि. २९) माळीनगर येथे होणार आहे. उभे िरगण झाल्यावर बोरगाव, पिराची कुरोली (गायरान) येथे प्रत्येकी एक मुक्काम होईल.
त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे मुक्काम केल्यानंतर श्रीक्षेत्र जेजुरी व वाल्हे येथे प्रत्येकी एक मुक्काम करेल. पुणे जिल्ह्य़ाची वेस ओलांडून सातारा जिल्ह्य़ात प्रवेश करताना नीरा नदीत श्रींचे स्नान होईल. स्नान उरकून त्या दिवशी (दि. २३) लोणंदला पालखीचा मुक्काम होणार आहे. लोणंदवरून निघून चांदोबाचे लिंब येथे उभे िरगण झाल्यावर तरडगाव येथे मुक्काम आहे. त्यानंतर फलटण (विमानतळ), बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव येथे पालखीचा प्रत्येकी एक मुक्काम होणार आहे. यादरम्यान रविवारी (दि. २८) सदाशिवनगर येथे पहिले, सोमवारी (दि. २९) खुडूसफाटा येथे दुसरे व ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे. यानंतर दोन्ही पालख्या पुन्हा वाखरी येथे बुधवारी (दि. १ जुलै) मुक्कामी जाण्यापूर्वी बाजीराव विहीर येथे दुसरे व गुरुवारी (२ जुलैला) वाखरी येथे तिसरे उभे रिंगण व आरती होणार आहे. शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दोन्ही पालख्या मुक्कामी पोहोचतील. सात जुलैला पादुकेजवळ विसावा घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल.