Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘ज्ञानकोश’ करिअर मेळाव्याचे नाशिकमध्ये आज उद्घाटन
नाशिक, २७ मे / प्रतिनिधी

 

ऊर्जा युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘ज्ञानकोश-२००९’ या करिअर महामेळाव्याचे उद्घाटन आज, २८ मे रोजी होत असून त्यानिमित्त प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू शिव खेरा व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले नाशिकमध्ये येत आहेत. कॉलेज रोडवरील डॉन बॉस्को शाळेच्या प्रांगणात ३१ मे पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती संयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली.
ज्ञानकोश मेळाव्याच्या उद्घाटन सत्रानिमित्त अच्युत गोडबोले यांचे ‘माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्राविषयी मार्गदर्शन’ या विषयावरील कार्यशाळा दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आली असून संध्याकाळी ६.३० वाजता भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात मॅनेजमेंट गुरू शिव खेरा यांचे ‘यश तुमच्या हातात’ या विषयावर व्याख्यान होईल.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी सकाळी १०.०० वाजता शंकर नारायण व राजेश सिंग यांचे ‘अेव्हीअेशनमध्ये करिअर मार्गदर्शन’ ही कार्यशाळा होईल. दुपारी १२.०० वाजता पुणे येथील करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांचे ‘दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन’ या विषयावर व्याख्यान होईल. संध्याकाळी ४.०० वाजता दिल्ली येथील तरूण विजय यांचे ‘इंडियन रेनिसन्स् अ‍ॅण्ड युथ’ या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांचे ‘व्हीजन महाराष्ट्र’ या विषयावर वाजता व्याख्यान होईल. शनिवार सकाळी सिंगापूर येथील हॅडरिन टॅन यांचे परदेशातील करिअर विषयक व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १२.०० वाजता मुंबई आयआयटीचे सुशांतो मित्रा यांचे ‘करिअर इन टेक्निकल एज्युकेशन अ‍ॅण्ड इमिजीएट बिझनेस’ या विषयावर व्याख्यान होईल. ऑर्किड ग्रुपचे विठ्ठल कामत यांचे कालिदास कलामंदिरात संध्याकाळी ७.०० वाजता ‘शून्यातून विश्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
याशिवाय रविवारी नागपूर येथील लोकमतचे संपादक बाळ कुलकर्णी हे अपयशी हा शिक्का बसलेल्या ‘दहावी बारावीच्या नापास विद्यार्थ्यांना करीअरच्या संधी’ या विषयावर सकाळी १०.०० वाजता व्याख्यान होईल. दुपारी डॉ. पवन अग्रवाल यांचे ‘लॉजिस्टीक अ‍ॅण्ड सप्लाय मॅनेजमेंट’ या विषयावर तर सायंकाळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुध्दे यांचे ‘व्यक्तीमत्व विकास’ या विषयावर व्याख्यान होईल.
प्रवेश पत्रिकांसाठी अमित कातकाडे (९८८१४५३०२७, ९६२३०३०३९९), संतोष काहार (९०२११४९०१२,९२७०५२३१८९) अथवा पिनाक जोशी (९८८११९९०२०) यांच्याशी संपर्क साधावा.