Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पवारांकडून पंख छाटण्यात आल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांत अस्वस्थता
सोलापूर, २७ मे/प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम व दक्षिण महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार तडाखा बसल्याच्या पाश्र्वभूमीवर या भागात पक्षाचे नेते, ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचाच काय तो प्रमुख आधार राहिला आहे. परंतु आता अनपेक्षितपणे याच मोहिते-पाटील यांना पक्षांतर्गत डिवचण्याचे कारस्थान रचले जात असल्याच्या सुप्त भावनेने त्यांच्या समर्थकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत शानदार विजयी होऊन केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा सन्मानाने कृषिमंत्रिपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच गेल्या रविवारी माढा लोकसभा मतदारसंघात माढा तालुक्याचा दौरा केला. त्यानंतर येत्या २९ ते ३१ मे पर्यंत तीन दिवसांच्या भेटीवर पवार हे मतदारसंघात येत आहेत. या दुसऱ्या भेटीत ते अकलूजसह सांगोला, करमाळा, फलटण आदी सर्व भागांचा दौरा करणार आहेत. परंतु त्यांचा पहिला दौरा माढा तालुक्यात झाल्यामुळे व अन्य काही संकेत मिळाल्यामुळे मोहिते-पाटील यांचे पक्षांतर्गत महत्त्व कमी करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न चालल्याची भावना त्यांच्या समर्थकांत वाढीस लागली आहे. याच सुप्त भावनेने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील आपले वजन आणि दबदबा विशेषत: सोलापूर जिल्हय़ाच्या राजकारणावरील वर्चस्व कमी न होता ते अबाधित राहण्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घेण्यासाठी समर्थकांकडून मोहिते-पाटील यांच्यावर दबाव आणले जात असल्याचेही संकेत मिळत आहेत.
शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे दावेदार घोषित करून राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत मोठी व्यूहरचना केली होती. परंतु पक्षाला दारुण पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील पक्षाच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची दयनीय अवस्था झाली. कोल्हापूरच्या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या. पवार यांच्या पुण्यातही दोन जागांवर हार पत्करावी लागली. नगरमध्येही मार खावा लागला. सांगलीत काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीने केलेले छुपे प्रयत्न असफल ठरले. सातारा येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर लगोलग, ‘आपण स्वत:च्या राजघराण्याच्या पुण्याईवर निवडून आलो आहोत, राष्ट्रवादीच्या पाठबळामुळे नव्हे’ असा घरचा आहेर दिल्याने पक्षाची स्थिती आणखी दयनीय झाल्याचे सर्वश्रुत आहे.
माढा मतदारसंघात उमेदवारीवरून मोहिते-पाटील घराण्यात कलह निर्माण झाल्याने शरद पवार यांना या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आमंत्रण विजयसिंह मोहिते-पाटील यांनीच दिले आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांसह रात्रंदिवस कष्ट करून त्यांच्या शानदार विजयासाठी सिंहाचा वाटा उचलला. माढय़ाप्रमाणे सोलापुरात काँग्रेसचे नेते, केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवडून आणण्यातही पुढाकार घेतला. एवढेच नव्हे तर शेजारच्या उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना सोलापूर जिल्हय़ातील बार्शी भागातून ‘बुडत्याला काडीचा आधार’ याप्रमाणे मतांची निर्णायक आघाडी मिळवून दिली. माढा, सोलापूर व उस्मानाबाद या तिन्ही जागा जिंकण्यासाठी मोहिते-पाटील यांचे योगदान राजकीय विश्लेषकही मान्य करतात. या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या पडत्या काळात पश्चिम महाराष्ट्रात मोहिते-पाटील यांचा प्रमुख आधार राहिला असताना पक्षांतर्गत आता त्यांच्याच विरोधात फासे टाकण्यात येत आहेत. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ यांसह अनेक साखर कारखाने, पंचायत समित्यांवर मोहिते-पाटील यांची एकछत्री हुकमत असताना त्यांचे पंख छाटून पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या हालचाली लक्षात घेता मोहिते-पाटील समर्थकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना आपली राजकीय ताकद अबाधित ठेवण्यासाठी समर्थकांकडून मोहिते-पाटील यांच्यावर दबाव आणण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत मोहिते-पाटील हे आगामी काळात कोणती भूमिका घेतात, ते शरद पवार यांना काटशह देतील काय, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.