Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

राजू चौधरी खून प्रकरण : दोन संशयित ताब्यात
लोणावळा, २७ मे/ वार्ताहर

 

लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू ऊर्फ भूपेंद्र चौधरी यांच्या हत्येचे धागेदोरे मिळवण्यास पोलिसांना यश मिळाले असून हत्येप्रकरणी दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. नंदू औरंगे (वय ५०, रा. गवळीवाडा, लोणावळा), वैभव गवळी (वय ३०, रा. लोणावळा) अशी संशयित आरोपींची नावे असून या प्रकरणात अजून तिघांवर संशय असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सुमित गवळी व त्याचा अज्ञात साथीदार हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथके पुणे, बीड, नाशिक, रायगड, अ. नगर आदी ठिकाणी तपास करण्यासाठी रवाना झाले आहेत.
लोणावळा उपविभागीय अधिकारी शशिकांत माने याबाबत माहिती देताना म्हणाले, की नगराध्यक्ष चौधरी यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून या हत्येच्या कटातील सर्व आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हत्येतील फरारी व मुख्य संशयित आरोपी सुमित प्रकाश गवळी (वय २४) व त्याच्या अज्ञात साथीदारांना लवकरात लवकर पकडले जाईल.
नगराध्यक्ष चौधरी यांच्या हत्येच्या कटात नंदू औरंगे सामील असल्याचा संशय चौधरी कुटुंबीयांनी व्यक्त केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सखोल चौकशीसाठी औरंगे याला ताब्यात घेतले तर सहारा रोडच्या दिशेने पोलीस हल्लेखोर यांच्या मागावर जात असताना पोलिसांना पाहून वैभव अशोक गवळी (वय ३०, रा. लोणावळा) याने आपली मोटारसायकल जागेवरच सोडून पळून गेला असल्याच्या संशयावरून वैभव याचा या हत्येत संबंध आहे का, यासाठी पोलिसांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी गुन्हे विभागाची विविध पथके, मुंबई, रायगड, हिंगोली आदी ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत. लोणावळा पोलिसांनी केलेल्या चौकशीत लोणावळा शहरात झालेल्या अतिक्रमण कारवाईत नगराध्यक्ष चौधरी यांनी जाणूनबुजून मुख्य संशयित सुमित गवळी याची अनधिकृत असलेली दोन हॉटेलांची बांधकामे पाडली. तसेच या हॉटेलच्या जागी व मावळा पुतळा हलवून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करायची, तसेच सुमित गवळीचा भाऊ नगरसेवक अमित गवळी हा आगामी १६ जूनला होणाऱ्या ओबीसी राखीव नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होता. नगराध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाल संपणार होता, तसेच ते या पदासाठी ओबीसी प्रवर्गातून पुन्हा इच्छुक होते. हे पद पुन्हा मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी लोणावळ्यातील नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न करत होते. अतिक्रमण कारवाईत सुमारे एक कोटीचे नुकसान व भावाला नगराध्यक्षपद मिळणार नाही या सूड भावनेपोटी सुमित गवळी याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला