Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य


मुरुडच्या किनाऱ्यावर पहाटे कोळी बांधव पर्यटकांसमोरच पेरा मारून पिलसे जातीचे चविष्ट मासे पकडतात. हे ताजे मासे पर्यटक मोठय़ा उत्साहाने खरेदी करतात. (छाया : सुधीर नाझरे)

पवारांकडून पंख छाटण्यात आल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांत अस्वस्थता
सोलापूर, २७ मे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम व दक्षिण महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार तडाखा बसल्याच्या पाश्र्वभूमीवर या भागात पक्षाचे नेते, ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचाच काय तो प्रमुख आधार राहिला आहे. परंतु आता अनपेक्षितपणे याच मोहिते-पाटील यांना पक्षांतर्गत डिवचण्याचे कारस्थान रचले जात असल्याच्या सुप्त भावनेने त्यांच्या समर्थकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

नाशिक पालिकेच्या अनास्थेमुळे कोटय़वधींचे अनुदान हुकले
जयप्रकाश पवार
नाशिक, २७ मे

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत समाविष्ट शहरांतील बस सेवा सक्षम करण्याच्या उदात्त हेतुने केंद्र सरकारनेदेशातील प्रमुख शहरांना पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० बसेससाठी कोटय़वधीेंचे अनुदान मंजूर झाले असले तरी सदरच्या प्रक्रियेत नाशिक महापालिकेकरवी या संबंधींचा प्रस्तावच दाखल होवू शकला नाही. उपरोक्त योजनेच्या निमित्ताने ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या वृत्तीचा अंगीकार पालिकेकडून होणे अपेक्षित असताना केवळ कारभाऱ्यांच्या अनास्थेमुळे कोटय़वधींच्या अनुदानाला पालिका पर्यायाने शहरवासीय मुकले आहेत.

राजू चौधरी खून प्रकरण : दोन संशयित ताब्यात
लोणावळा, २७ मे/ वार्ताहर

लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू ऊर्फ भूपेंद्र चौधरी यांच्या हत्येचे धागेदोरे मिळवण्यास पोलिसांना यश मिळाले असून हत्येप्रकरणी दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. नंदू औरंगे (वय ५०, रा. गवळीवाडा, लोणावळा), वैभव गवळी (वय ३०, रा. लोणावळा) अशी संशयित आरोपींची नावे असून या प्रकरणात अजून तिघांवर संशय असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सुमित गवळी व त्याचा अज्ञात साथीदार हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथके पुणे, बीड, नाशिक, रायगड, अ. नगर आदी ठिकाणी तपास करण्यासाठी रवाना झाले आहेत.

पाणीप्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे
रत्नागिरी, २७ मे/खास प्रतिनिधी

रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून, येत्या आठवडाभरात चांगला पाऊस न झाल्यास हा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरी शहराला शीळ व पानवल या दोन धरणांपासून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरण गाळाने भरल्यामुळे तेथील पाणीसाठा फेब्रुवारीपर्यंतच पुरतो. त्यानंतरचे सुमारे तीन महिने शीळ धरणाच्या पाण्यावर रत्नागिरीकरांना अवलंबून राहावे लागते.

एका मताच्या बदल्यात १२ मागण्या!
सोपान बोंगाणे

केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात पालघर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची तातडीने तड लागावी, यासाठी विकास प्रकल्पांचे १२ कलमी मागणीपत्र पालघरच्या नवनिर्वाचित खासदाराने थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर केले. त्यावर गंभीरपणे विचार करून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती स्वत: खासदार बळीराम जाधव यांनी दिली.

देवरुखच्या ‘गुड्डू’चा जादुई दुनियेत प्रवेश
देवरुख, २७ मे/वार्ताहर

वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय यातून लहानपणापासून सर्वाचीच लाडकी असलेल्या शहरातील दक्षता लिंगायत हिने अगदी लहान वयात नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याची किमया केली आहे. अवघ्या १० वर्षांची दक्षता जादूगारांच्या दुनियेत पदार्पण करीत असून २९ मे रोजी पदार्पणाचा पहिला प्रयोग ती आपल्या गावातच करणार आहे.

परागकण अभ्यासाद्वारे प्राचीन बदलांची उकल
अलिबागजवळ समुद्राच्या पातळीत २३०० वर्षांत पाच मीटरने वाढ

अभिजित घोरपडे, पुणे, २७ मे

ग्लोबल वॉर्मिगमुळे समुद्राच्या पातळीत काही फुटांनी वाढ होणार असल्याची धास्ती व्यक्त केली जात असली तरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी अशी वाढ नवी नसल्याचे डेक्कन कॉलेजतर्फे झालेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. अलिबागजवळील चौल या ठिकाणी सापडलेल्या परागकणांवरून तिथे गेल्या २३०० वर्षांमध्ये समुद्राची पातळी तब्बल चार ते पाच मीटरने वाढली असल्याचे उघडकीस आले आहे.

परतीच्या प्रवासात वाहतूक ठप्प, चाकरमानी रखडपट्टीला कंटाळले
संगमेश्वर, २७ मे/वार्ताहर

एप्रिल-मे महिन्यात कोकणात सुट्टीसाठी आलेले चाकरमानी, तसेच पर्यटक परतीच्या प्रवासादरम्यान वाहतूक ठप्प होण्याच्या प्रकारांना कंटाळले असून, रखडपट्टीमुळे त्यांना तासन्तास रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, अरुंद पूल, अरुंद वळणे यामुळे सातत्याने वाहतूक ठप्प होत आहे. वाहतूक ठप्प होण्याच्या या प्रकारांमुळे एकाच ठिकाणी तासन्तास रखडपट्टी होण्याची वेळ चाकरमानी व पर्यटकांवर येत आहे. महामार्गावरील अरुंद पूल रुंद करणे, अतिक्रमण असलेल्या ठिकाणी वाहने उभी करून ठेवण्यास मनाई करणे, वाहतूक पोलिसांची गस्त ठेवणे, असे उपाय हाती घेतल्यास वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार टाळता येणे शक्य आहे. संगमेश्वरजवळील सोनवी व शास्त्री या दोन पुलांवर ठप्प होणारी वाहतूक वाहनचालक, पादचारी यांच्यासाठी डोकेदुखीच ठरत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी करणे हाच यावरील एकमेव उपाय असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

अलिबागमध्ये सुगम संगीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
अलिबाग, २७ मे/ प्रतिनिधी

जन शिक्षण संस्थान, रायगड व श्रीसमर्थ शारदा सुगम संगीत संस्था याच्या संयुक्त विद्यमाने सुगम संगीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ७ ते ११ जून या कालावधीमध्ये करण्यात आले आह़े यशस्वी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पनवेल येथील कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन आता अलिबाग येथे करण्यात आले आह़े १८ वर्ष पूर्ण केलेल्या संगीताची आवड असणाऱ्या व्यक्ती या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात़ त्यासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी श्रीकांत रानडे (९८२०९३९४७४) वा जन शिक्षण संस्थान, रायगड (०२१४१-२२७९३२, ९९२२९९२९७०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वनरक्षकाला बेदम मारहाण
खोपोली, २७ मे/वार्ताहर

खालापूर वनविभागातील वनरक्षक दीपक काशिनाथ मोकल (३९) यांना अज्ञात चौघा मद्यपींनी सोमवारी बेदम मारहाण करून पलायन केले. दीपक मोकल ताकई येथील औषधी वनस्पती उद्यानाची देखरेख करीत असताना त्यांना चार अज्ञात युवक उद्यानातील काजूच्या वृक्षाच्या छायेत मद्यपान करीत बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या मद्यपींना हटकताच त्या चौघा युवा मद्यपींनी वनरक्षक मोकल यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारले व डोक्यावर दगड मारून रक्तबंबाळ करून सोडले. आरडाओरड झाल्यामुळे अन्य कर्मचारी धावून येताच चौघे मद्यपी मोटारसायकलवरून फरारी झाले. हे वृत्त समजताच खोपोलीचे पोलीस, खालापूरचे परिक्षेत्र वन अधिकारी बाबासाहेब गायकवाड त्वरित घटनास्थळी धावून गेले. मोकल यांना न. पा. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोपोलीची पोलीस यंत्रणा अज्ञात मद्यपींचा वेगाने तपास करीत आहे.

भाऊ उपाध्ये यांचे निधन
कर्जत, २७ मे/वार्ताहर

कर्जत तालुक्यातील कडाव येथील वयोवृद्ध संस्कृतज्ज्ञ ‘स्वाध्याय’ परिवाराचे प्रणेते स्व. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे सहाध्यायी आणि सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक भालचंद्र गणेश तथा भाऊ उपाध्ये (८७) यांचे वृद्धापकाळाने लोधिवली येथील अंबानी रुग्णालयातच निधन झाले. भाऊ उपाध्ये हे कडावमधील इतिहासकालीन श्री बालदिगंबर गणेश मंदिराचे विश्वस्त आणि एक प्रमुख आधारस्तंभ होते. कर्जतमधील अभिनव ज्ञानमंदिर शिक्षण संस्थेचे सदस्य तसेच याच संस्थेच्या कडावमधील श्री गजानन विद्यालयाच्या शालेय समितीचे सदस्य आणि कडावमधील भोपतराव विद्यालयाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. विविध सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ असलेल्या कै. भालचंद्र उपाध्ये यांच्या पश्चात चार पुत्र, दोन कन्या, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पालघर तालुक्यात पाणीटंचाई
पालघर, २७ मे/वार्ताहर

तालुक्यातील हरणकळी, खारेकुरण-विकासवाडी, हालोली-पाटीलपाडा तसेच टेन व चौकी उंबरपाडा-दारशेत गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून, या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गटविकास अधिकारी राहुल धूम यांनी ही माहिती दिली. दरम्यान राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील गोवाडे व दुर्वेस येथे वैयक्तिक शेतकऱ्यांची कामे सुरू असल्याची माहिती धूम यांनी यावेळी दिली.

खोपोलीचा पॉवर लिफ्टर जाफर खान राष्ट्रीय स्पर्धेसाठी जमशेदपूरला रवाना
खोपोली, २७ मे/वार्ताहर

इंडियन पॉवर लिफ्टिंग फेडरेशनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनतर्फे मुंबईच्या कामगार कल्याण भुवन येथे नुकत्याच राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत खोपोली नगरपालिका संचालित छत्रपती शिवाजी व्यायामशाळेचा पॉवर लिफ्टर जाफर शरीफ खान याने ५६ किलो वजन गटात ३३२.५ किलो वजन उचलून कुमार गटात प्रथम क्रमांक पटकावला. सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या जाफर खानची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याची घोषणाही करण्यात आली. जाफर खान याला छत्रपती शिवाजी व्यायामशाळेचे शिक्षक तथा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी मारुती आडकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. जमशेदपूर येथील टाटानगर मध्ये २८ मेपासून राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातर्फे सहभागी होण्यासाठी जाफर शरीफ खान सोमवारी जमशेदपूरला रवाना झाला. खोपोली नगरपालिकेत आयोजित केलेल्या छोटेखानी सोहळ्यात नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी विजेत्या जाफर शरीफ खान याचा व त्याला मार्गदर्शन करणारे व्यायाम शिक्षक मारुती आडकर यांचा सत्कार केला. राष्ट्रीय स्पर्धेतही नेत्रदीपक कामगिरी करेन व खोपोलीच्या नावलौकिकात निश्चित भर घालेन, अशी ग्वाहीही जाफरने सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिली.

एडस् जनजागृती शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघर, २७ मे/वार्ताहर

पालघर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने पालघर येथे अलीकडेच विविध कामगार कायदे व एडस् जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात अ‍ॅड. भट व अ‍ॅड. रघुवंशी यांनी विविध कामगार कायद्यांवर मार्गदर्शन केले, तर पालघर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गावित यांनी एडस्बाबत माहिती देताना यासंबंधात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रबोधन केले. तारापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त व पालघर तालुका इंडस्ट्रीज फेडरेशनच्या सौजन्याने आयोजित या शिबिरात सुमारे ५०० कामगार सहभागी झाले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास सहदिवाणी न्यायाधीश आगरकर, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश गायकवाड, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीम. अग्रवाल, पालघर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन शेलार, सहा. कामगार आयुक्त श्रीम. जाधव, तसेच सरकारी वकील अ‍ॅड. पटेल, अ‍ॅड. दीपक तरे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किमान वेतन निरीक्षक जे. एम. नाईक व अ‍ॅड. तरे यांनी केले.

सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे,२७ मे/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. सावरकर सेवा संस्थेतर्फे मावळी मंडळ चरई येथे सायंकाळी ६.४५ वाजता शतपैलू स्वा. वीर सावरकर या विषयावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. इंगळहळ्ळीकर, अजित तस्ते, शांताराम राऊत, डॉ. मेधा मेहेंदळे, रमेश खारकर, यशवंतराव गर्दे आदींचा सावरकर पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रातर्फे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान होणार आहे. यावेळी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून यंदा विद्याधर ओक, शिवराम घैसास, प्रणाली मांडवकर, समर्थ सेवक मंडळ, सुकन्या काळण, अभिलाष निकाळजे, तसेच खासदार प्रकाश परांजपे स्मृती पुस्कार पांडुरंग पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. फ्रान्समधील मार्सेलिस येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक व्हावे म्हणून हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून मागणी केलेल्या निवेदनाचे हस्तांतरणही यावेळी करण्यात येणार असल्याचे केंद्राचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी सांगितले.

कापसावरील नुकसान भरपाईचे अनुदान वितरित करण्याची मागणी
धुळे, २७ मे / वार्ताहर

कापसावरील लाल्या रोगाच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने मंजूर केलेले अनुदान जिल्हा बँकांच्या निरनिराळ्या शाखांमध्ये जमा झाले आहे. हे सर्व अनुदान शेतकऱ्यांना मे महिन्या अखेर पर्यंत वितरित करावे अशी मागणी तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. २००५-०६ मध्ये कापसावरील लाल्या रोगामुळे पछाडलेल्या धुळे तालुक्यातील २९ गावांमधील शेतकरी मेटाकुटीस आले होते. याप्रश्नी शिवसेनेने तीव्र आंदोलनही केले होती. कापसावरील लाल्या रोगामुळे एकटय़ा धुळे तालुक्यातील २९ गावांमध्ये ११ हजार ३५५ कापूस उत्पादक लाभार्थ्यांसाठी ९८ लाख ६९ हजार ७०४ रुपये अनुदान मंजूर झाले असले तरी ते गेल्या तीन वर्षांपासून वितरित झालेले नाही. ही संपूर्ण रक्कम आता जिल्हा बँकेच्या निरनिराळ्या शाखांमध्ये वितरित झाली असून या अनुदानाचे तात्काळ वितरण करावे अशी मागणी शिवसेनेचे नेते प्रा. शरद पाटील यांनी केली आहे. हे अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना येत्या हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करता येवू शकतील. तसे पाहिल्यास ९६ गावातील ६९ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रातील कापसाचे नुकसान झाल्याने ७८ हजार ६४२ लाभार्थ्यांसाठी नऊ कोटी ५० लाख ७८ हजार ६७१ रुपयांचे अनुदान जाहीर झाले. तथापि, केवळ काही गावांमध्येच अनुदानाचे वाटप करण्यात आले. आता २९ गावातील १० हजार ४१२ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीच्या मदतीसाठी ९८ लाख ६९ हजार ७०४ रुपयांचे अनुदान संबंधित बँक शाखेत जमा झाले आहे. ते वितरित करावे अशी मागणी प्रा. शरद पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, पंचायत समिती सभापती कमलाबाई बळसाणे, तालुका प्रमुख कैलास पाटील आदींनी केली आहे.

तंटामुक्त समितीकडून प्रेमीयुगुलाचा विवाह
भंडारा, २७ मे / वार्ताहर

पवनी तालुक्यातील मोहरी (चौ.) येथे तंटामुक्त समितीने लोकवर्गणीतून प्रेमीयुगुलाचे शनिवारी लग्न लावून दिले. मोहरी (चौ.) येथील अरविंद किसन जांगळे आणि मांगली (चौ.) येथील ज्योती ताराचंद खोब्रागडे यांचे एक वर्षांपासून प्रेम जुळले. मुलीकडील मंडळींचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. प्रेमीयुगुलाने मात्र लग्न करण्याचा निश्चय करून अरविंदने तीन दिवसांआधी ज्योतीला मोहरी येथे पळवून आणले. गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भाजीपाले, सरपंच लेखराम सहारे, सदस्य मधुकर जांगळे यांच्यासमोर दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनीही कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ देण्याची शपथ दिली व लग्नाचा मुहूर्त ठरविला. त्यासाठी गावातून वर्गणी गोळा करण्यात आली. तसेच आमदार बंडू सावरबांधे यांनी एक हजार रुपयांची वर्गणी दिली. या रकमेतून विवाह सोहोळा पार पडला. यातील प्रियकर व प्रेयसी बौद्ध समाजाचे असून मुलीची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे तंटामुक्त समिती व गावकऱ्यांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. बुद्धविहारात बौद्धधर्माच्या विधीनुसार लग्न लावण्यात आले. तंटामुक्त समितीच्या सहकार्याने लग्न करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले, असे नवविवाहित जोडप्याने सांगितले. पवनी तालुक्यात तंटामुक्ती समित्यांचे आपसातील वाद सोडविण्यासोबतच सामाजिक कामातही योगदान मिळत असल्याने पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

मालमोटार चालकाला लूटणाऱ्या पाच जणांना पोलीस कोठडी
येवला, २७ मे / वार्ताहर

मालमोटार चालकाला बेदम मारहाण करून २४ हजाराची लूट करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात येवला पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तालुक्यातील अनकाई ते साबरवाडी शिवारात २३ मे रोजी ही लुटीची घटना घडली होती. गणेशन् बुरकलन् (रा. तामिळनाडू) हा चालक मालमोटार घेवून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या सात युवकांनी रस्त्यात वाहने आडवी करीत त्यांना रोखले. काही समजण्याच्या आत दोन युवकांनी मालमोटारीत शिरून कट मारल्याच्या कारणावरून चालक गणेशन्शी वाद घातला. त्यानंतर हे संशयित मालमोटारीसह चालकाला घेवून साबरवाडी शिवारात गेले. तेथे गणेशन््ला बेदम मारहाण करून त्याच्याकडील २४ हजार रूपयांची रोकड व भ्रमणध्वनी घेवून पोबारा केला. अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावलेल्या गणेशनने मालमोटार घेवून तामिळनाडूकडे प्रयाण केले. मालमोटारीच्या मालकाला हा प्रकार सांगितल्यावर त्याने जेथे ही घटना घडली त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी चालकाला परत पाठविले. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात चालकाने तक्रार दिली. मारहाण करताना झालेल्या झटापटीत दरोडेखोरांपैकी एकाची डायरी व काही कागदपत्रे मालमोटारीत पडली होती. ही डायरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर गणेश शेलार (रा. अनकडे) याचा छडा लागला. त्याला अटक केल्यानंतर बाळनाथ गायकवाड, अनिल गुंजाळ, सुनील गुंजाळ व गोरख पवार या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली.