Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

क्रीडा

मरेचा संघर्षमय विजय; सॅफिना तिसऱ्या फेरीत
पॅरिस २७ मे / वृत्तसंस्था

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅन्डी मरेला आज फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठताना इटलीच्या पोटिटो स्टॅरेसने कडवा प्रतिकार केला. मात्र, मरेने ही लढत ६-३, २-६, ७-५, ६-४ अशा कडव्या संघर्षांनंतरजिंकली आणि तिसरी फेरी गठली. दरम्यान, महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या रशियाच्या दिनारा सॅफिनाने तिच्याच संघसहकारीचा लीलया पराभव करत तिसरी फेरी गाठली.

संघ म्हणून कोलकाता अपयशी - इशांत शर्मा
नवी दिल्ली, २७ मे / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगमध्ये झालेल्या दारुण पराभवाचे खापर कर्णधार ब्रेन्डन मॅकक्युलम किंवा प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांच्यावर न फोडता हा सांघिक कामगिरीचा पराभव होता, असे मत कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा गोलंदाज इशांत शर्मा याने व्यक्त केले आहे. मॅकक्युलमच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या संघाला सलग आठ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या वर्षी संघाचे नेतृत्व करणाऱ्या सौरव गांगुलीऐवजी मॅकक्युलमला कर्णधारपद सोपविण्यात आले. पण त्याला हे कर्णधारपद फळले नाही. मात्र इशांत शर्माच्या मते याठिकाणी कुणीही असते तरी त्याला संघाचे नशीब बदलता आले नसते.

आता अमेरिकन प्रीमियर लीगचा धमाका
वॉशिंग्टन, २७ मे / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेत इंडियन प्रीमियर लीगने दणका उडवून दिल्यानंतर आता अमेरिकेतही अशीच एक लीग सुरू करण्यात येणार आहे. बेसबॉलसारख्या खेळाचा प्रभाव असलेल्या अमेरिकेसारख्या देशात क्रिकेट लवकरच मूळ धरेल, असा विश्वास ‘एपीएल’च्या आयोजकांना वाटतो आहे.

आयसीसीविरुद्ध पीसीबीची याचिका दाखल
कराची, २७ मे / पीटीआय

सुरक्षिततेच्या कारणामुळे २०११ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद काढून घेणाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयाविरोधात पाकिस्तान क्रिकेट मंडळाने याचिका दाखल केली आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत या वर निश्चितपणे ठोस विचार होईल, आशी आशा पाकिस्तान क्रिकेट विश्वाला आहे. पुढच्या आठवडय़ात होणाऱ्या बैठकीपर्यंत आमच्या याचिकेवर निश्चित विचार होईल. त्यातून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे, असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कायदेशीर सल्लागार तफझ्जूल रिझवी यांनी व्यक्त केला आहे. आयसीसीने आमची याचिका गांभीर्याने घेतली नाही, तरीही आम्ही आमचा कायदेशीर लढा सुरूच ठेवणार आहोत.

ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही दर्जा मिळायला हवा- निल्सन
नवी दिल्ली, २७ मे/ वृत्तसंस्था
ट्वेन्टी-२० क्रिकेटला कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेट सारखी परंपरा नसली तरी या प्रकाराला योग्या तो दर्जास आणि मानसन्मान मिळायला हवा, असे मत ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रशिक्षक टीम नेल्सन यांनी व्यक्त केले आहे. सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटला अन्य प्रकारांएवढा मान सन्मान मिळताना दिसत नाही किंवा या प्रकाराला जास्तीतजास्त खेळविण्यातही येत नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटला पुढे आणायचे असेल तर जास्तीतजास्त सामने खेळवायला हवेत. एखाद्या दौऱ्यात फक्त एक किंवा दोनच ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने खेळविण्यात येत असतात. त्याऐवजी एका दौऱ्यात तीन किंवा पाच ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने खेळवायला हवेत. जेणेकरून ट्वेन्टी-२० क्रिकेटला चांगली प्रसिद्धी मिळू शकेल, असे निल्सन यांनी सांगितले. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया या वर्षांत जास्त सामने खेळलेली नाही, यावर्षांत ऑस्ट्रेलियाला फक्त तीनच ट्वेन्टी-२० सामने खेळायला मिळाले असल्याने संघाचा चांगली सराव झालेला नाही असे निल्सन यांना वाटत आहे. त्यामुळे यापुढे ऑस्ट्रेलियान क्रिकेट मंडळाने या गोष्टीची दखल घ्यावी असे निल्सन यांचे म्हणणे आहे.

आयटीएफ टेनिस स्पर्धेत : भांबरी भगिनी, तेलतुंबडे पराभूत
नवी दिल्ली, २७ मे / पीटीआय

येथे सुरू असलेल्या आयटीएफ फ्युचर्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रमुख खेळाडूंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अव्वल मानांकित अंकिता भांबरीसह मानांकित खेळाडू स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या. अंकितासह तिची बहीन साना, तृतीय मानांकित इशा लखानी, रश्मी तेलतुंबडे यांना दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
रश्मी चक्रवर्ती व परिजा मालू यांच्या रूपात भारताचे आव्हान जिवंत आहे. या दोघींनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अंकिताला चीनच्या यिंग यिंग दुआनकडून २-६, ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला. तर साना भांबरी यी झोंगकडून याच फरकाने पराभूत झाली. इशाला ऑस्ट्रेलियाच्या रेनी बिन्नीकडून ४-६, ०-६ अशी मात सहन करावी लागली तर तेलतुंबडेवर इस्रायलच्या केरेन शोल्मोने ६-२, ६-३ असा विजय मिळविला.
सहाव्या मानांकित रश्मी चक्रवर्तीने मात्र आपली घोडदौड कायम ठेवली. तिने कोरियाच्या सेऊ क्युंग कांगला ६-७ (४), ७-५, ६-४ असे नमविले तर परिजाने भारताच्या त्रेता भट्टाचार्यवर ६-३, ७-५ अशी सरशी केली.

आशियाई टेनिस स्पर्धा : बिगरमानांकित धृती वेणुगोपाळची तृतीय मानांकित ताहिरावर मात
पुणे, २७ मे/प्रतिनिधी
बिगरमानांकित धृती वेणुगोपाळ हिने १४ वर्षांखालील गटाच्या बिलकेअर चषक आशियाई टेनिस स्पर्धेत आज तृतीय मानांकित ताहिरा भट्टीवर मात करीत उपान्त्य फेरी गाठली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत वेणुगोपाळ हिने सरळ लढतीत ताहिरास ६-१, ६-४ असे हरविले. तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. उपान्त्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यांत अंबिका पांडे हिने रिंपलदीप कौर हिचे आव्हान संपुष्टात आणले. तिने चुरशीने झालेली ही लढत ३-६, ६-१, ६-४ अशी जिंकताना परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. चौथ्या मानांकित जस्मीन कौर बजाज हिने पाचव्या मानांकित रोमा चंदीरामला नमवित उपान्त्य फेरीकडे आगेकूच केली. एकतर्फी झालेला हा सामना बजाजने ६-३, ६-१ असा जिंकला. तिने फोरहॅन्ड फटक्यांचा कल्पकतेने उपयोग केला. अग्रमानांकित सी. साई समिता हिने आगेकूच राखताना सिऊली उपाध्यायची आश्चर्यजनक विजयाची मालिका खंडित केली.

रॉयल चॅलेंज गेम फोर चॅलेंजसाठी मुंबई सज्ज
मुंबई, २७ मे / क्री. प्र.

सुनील जोशी, जे. अरुणकुमार, टिनू योहानन या बंगलोरच्या क्रिकेटपटूंच्या जिद्दीचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या द रॉयल चॅलेंज गेम फोर चॅलेंज फेस-ऑफ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाद्वारे क्रिकेटवरील प्रेमाचा मार्ग प्रत्यक्ष मैदानात कसा उघडतो, हे दाखविण्याचा प्रयत्न आहे. बंगलोर येथे या उपक्रमाचा आरंभ झाला व त्यात सतीश घाडगेची निवड झाली. त्याला लंडनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे. हा उपक्रम बंगलोरपाठोपाठ हैदराबाद, मुंबई, दिल्ली व चंदीगढ येथेही आयोजित केला जाणार आहे.

इंग्लंडमध्ये आर. पी. प्रभावी ठरेल- दीपक
नवी दिल्ली, २७ मे/ पीटीआय
यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ‘पर्पल कॅप’ चा मानकरी ठरलेल्या आर. पी. सिंगला इंग्लंडचे वातावरण पोषक असून तो तिथे नक्कीच प्रभावी कामगिरी करेल, असे मत त्याचे प्रशिक्षक दीपक शर्मा यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संघातून वगळल्यानंतही तो कधीही हताश झाला नाही. उलट दुप्पट वेगाने तो तयारीला लागला. फिटनेस आणि तांत्रिक गोष्टींवर त्याने भर दिला व त्याचेच फळ त्याला यंदाच्या आयपीएमध्ये मिळाले. इंग्लंडमधील वातावरण तर त्याच्या गोलंदाजीला मदत करणारेच आहे. त्यामुळे तो ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये नक्कीच वेगळा ठसा उमटवेल, असे शर्मा यांनी सांगितले.