Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

एका मताच्या बदल्यात १२ मागण्या!
सोपान बोंगाणे

केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात पालघर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची तातडीने तड लागावी, यासाठी विकास प्रकल्पांचे १२ कलमी मागणीपत्र पालघरच्या नवनिर्वाचित खासदाराने थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर केले. त्यावर गंभीरपणे विचार करून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती स्वत: खासदार बळीराम जाधव यांनी दिली.

ग्रंथसंग्रहालय स्थलांतराचा डाव हाणून पाडण्यासाठी नागरिकांची अभेद्य साखळी
डोंबिवली/प्रतिनिधी - पालिका आयुक्त गोविंद राठोड, उपायुक्त सुरेश पवार यांचा पालिकेचे फडके रोडवरील ग्रंथसंग्रहालय स्थलांतर करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शहरातील ज्येष्ठ, सुजाण नागरिक, काही नगरसेवक, पदाधिकारी, युवक संघटना, मनसे, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांची एक अभेद्य साखळी तयार करण्यात आली आहे. या साखळीमुळे ग्रंथसंग्रहालय स्थलांतराचा डाव हाणून पाडण्यात येणार आहे. शहरातील अनेक जाणकार दररोज पालिकेच्या ग्रंथसंग्रहालयात फेरी मारून पुस्तके हलविण्याचा प्रयत्न केला जात नाही ना? याची चाचपणी करीत आहेत.

‘कामे टाकून पळालेल्या खासगी संस्था, अधिकाऱ्यांची चौकशी करा’
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण- डोंबिवली पालिकेत ‘एमएमआरडीए’ने निर्मल अभियानांतर्गत शौचालये उभारणीसाठी नेमलेल्या खासगी अशासकीय संस्था या कोणाच्या आशीर्वादाने नेमल्या आहेत, या संस्थांची नियुक्ती करण्यात पुढाकार घेणाऱ्या ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांची व खासगी अशासकीय संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी पालिकेतील नगरसेवकांनी केली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाचा प्रस्ताव
ठाणे / प्रतिनिधी

आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनीअर व्हावे अशी अनेक पालकांची इच्छा असते. मात्र सीईटी झाल्यावर चांगले मार्क नसतील तर, डोनेशनच्या, कॅपिटेशन फीच्या नावाखाली लाखो रुपये पालकांना भरावे लागतात. भारतातील या महागडय़ा वैद्यकीय शिक्षणाला आता रशियाने चांगला व दर्जेदार पर्याय उपलब्ध केला आहे.

सैनिक हो तुमच्यासाठी..!
कल्याण/प्रतिनिधी - मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक तरुणाला आपण सैन्यात जावे, देशाचे रक्षण करावे, अशी शिरशिरी येऊ लागली आहे. बहुतांशी पालकांनी आपला मुलगा सैन्यात भरती करून देशसेवेत रूजू करावा असा विचार सुरू केला आहे. सैनिकी शाळेसाठीची ही सगळी गरज पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ठाणे जिल्ह्य़ातील पालकांना नाशिक, सातारा, रायगड जिल्ह्य़ात जावे लागे. पण शिवनिकेतन ट्रस्टने ठाणे जिल्ह्य़ातील पालकांची ही अडचण दूर करून ठाण्यात सैनिकी शाळा सुरू केली.

अणुऊर्जा प्रकल्पात अपघात न होण्याची शास्त्रज्ञांची ग्वाही
ठाणे/प्रतिनिधी

तारापूर येथील अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन व जनतेने घ्यावयाच्या दक्षतेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अणुऊर्जेचे दुष्परिणाम लक्षात घेता उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एल. जऱ्हाड यांनी केले.

सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. सावरकर सेवा संस्थेतर्फे मावळी मंडळ चरई येथे सायंकाळी ६.४५ वाजता शतपैलू स्वा. वीर सावरकर या विषयावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

बालवाडी शिक्षिकांना मिळणार वर्षभर दोन हजार मानधन
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत बालवाडी शिक्षिकांना दर महिन्याला वर्षभर दोन हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला.
महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा आसोदेकर, नगरसेविका निलीमा पाटील यांनी हा विषय मंजुरीसाठी आणला होता. यावेळी राजेंद्र देवळेकर म्हणाले, बालकांना संस्कारमय करण्याची खरी जबाबदारी बालवाडी शिक्षिका करत असतात. त्यामुळे या बालवाडी शिक्षिकांना मिळणारे पाचशे रुपये मानधन हे खूप अत्यल्प होते. या शिक्षिकांना एप्रिल, मे महिन्यात बालवाडी शाळांना सुट्टी असल्याने मानधन देण्यात येत नाही, ते देण्याची मागणी देवळेकर यांनी केली. ही मागणी महासभेने मान्य केली.

अतिरिक्त सुरक्षा ठेव न भरल्यास वीजपुरवठा खंडित
ठाणे/प्रतिनिधी

महावितरणतर्फे ग्राहकांना पाठविण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव न भरल्यास ती पुढील देयकात पाठवून थकबाकी म्हणून वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा महावितरणच्या कल्याण परिमंडळाने ग्राहकांना दिला आहे. महावितरणकडून अतिरिक्त वसूल करण्यात येणारी सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्या भल्यासाठीच असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ही ठेव ग्राहकाच्या तीन महिन्यांच्या वीज वापरापोटीच्या किंवा एका बिलिंग अवधीच्याच रकमेपैकी कमी असेल तेवढी असते. याशिवाय वीज वितरण कंपनी वर्षांतून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने पुनर्निर्धारण करू शकते, त्यामुळे ती रक्कम कमी असल्यास राज्य वीज नियामक आयोगाच्या २००५च्या परिपत्रकानुसार वसूल करता येते, त्यामुळे त्वरित अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

खरीप हंगामासाठी तक्रार निवारण कक्ष
ठाणे/प्रतिनिधी

चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खते व कीटकनाशके वेळेत व योग्य दरात मिळावीत याकरिता तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विभाग स्तरावरील गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे ०२२-२५८२२७६६, २५८२०४०७, जिल्हा स्तरावरील गुणवत्ता नियंत्रण कक्ष ०२२-२५३४११९२, २५८२२०१४ असे क्रमांक आहेत. तरी शेतकऱ्यांनी खते, बियाणे व कीटकनाशके या संदर्भात काही तक्रार असल्यास त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक के.एन.देशमुख यांनी केले आहे.