Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

व्यक्तिवेध

कथेचा शेवट होतो तेव्हा ती खरेच संपलेली असते का? की तिच्या शेवटातूनही अनेक शक्यतांची बीजे काळाच्या जमिनीत पडलेली असतात? कालांतराने पुन्हा अंकुरण्यासाठी? तसे नसते तर शंभर वर्षांपूर्वीची राजपुत्र आणि नर्तकीची प्रेमकथा माह अख्तरच्या रूपात पुन्हा आज अंकुरली नसती. आपण या प्रेमकथेचा अंकुर असल्याचा विलक्षण शोध ४४ वर्षांच्या माह अख्तरला आपल्या ब्रिटिश पासपोर्टचे नूतनीकरण करताना लागला आणि साहजिकच तिला आश्चर्याचा धक्का बसला, अवघे आयुष्य आपण एक खोटी ओळख घेऊन जगत आलो या जाणिवेने ती अस्वस्थ झाली. आईने - ज़्ाहराने -तिला सांगितले होते त्याप्रमाणे तिचा जन्म

 

ऑस्ट्रेलियात झालेला नव्हता, तर लेबनॉनमध्ये झाला होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिच्या आईचा पती हा तिचा पिता नव्हता! ती कपुरथळा संस्थानचे महाराज जगजीतसिंह यांच्या अजितसिंह या मुलाची मुलगी होती! या नव्या साक्षात्काराला माह अख्तरने ‘द महाराजाज हिडन ग्रँडडॉटर’ या पुस्तकरूपाने अभिव्यक्ती दिली. नुकतेच स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कथेला सुरुवात झाली होती १९०६ साली. हिंदुस्तानातल्या संस्थानांमधले सर्वात श्रीमंत समजले जाणारे संस्थान कपुरथळा. कपुरथळाचे महाराज जगजीतसिंह स्पेनचा राजा तेरावा अल्फान्सो याच्या विवाहप्रसंगी पाहुणे म्हणून स्पेनला गेले असताना तिथल्या कॅफेमध्ये अनिता डेलगॅडोचे फ्लमेंको नृत्य पाहून भाळले. या १६ वर्षांच्या नर्तकीच्या प्रेमात पडले. त्यांनी तिची मनधरणी केली आणि अखेर आपल्याहून १८ वर्षांनी लहान असलेल्या नर्तकीशी विवाह करून त्यांनी तिला आपल्या राणीवशात दाखल करून घेतले. मूळची अंदालुसिया प्रंतातली आणि स्पेनमध्ये स्थलांतरित झालेली १६-१७ वर्षांची फ्लॅमेंको नर्तकी कपुरथळाची महाराणी प्रेमकुमारी झाली. अगदी वेगळ्या संस्कृतीतल्या राजघराण्यातल्या परंपरांमध्ये बंदिस्त झाली. अजितसिंह हा या दोघांचा मुलगा. महाराजा जगजीतसिंहांच्या आधीच्या चार राण्या होत्याच. आपल्या समवयस्क सावत्र मुलाशी अनिता डेलगॅडोचे प्रेमसंबंध सुरू झाले आणि महाराजा जगजीतसिंहांनी तिला घटस्फोट दिला. त्यानंतर अनिता अजितसिंह या अपल्या मुलासहित पॅरिसमध्ये राहू लागली. १९६२मध्ये अनिताचे निधन झाले. पुढच्या काळात अजितसिंह बैरूटच्या अजामी कुटुंबातल्या ज़्ाहरा या तरुणीच्या संपर्कात आला. त्यांचे प्रेमप्रकरण काही महिनेच टिकले आणि ज़्ाहरा बैरूटला परतली तेव्हा ती गर्भवती होती. ज़्ाहराच्या वडिलांनी व्यवसायातल्या एका पाकिस्तानी सहकाऱ्याला पैसे देऊन ज़्ाहराशी विवाह करण्यासाठी राजी केले. माह अख्तरचा जन्म झाला आणि त्यानंतर दोघे ऑस्ट्रेलियाला गेले. त्यानंतर ज़्ाहराचा अजितसिंहाशी कधीही संपर्क झाला नाही. अजितसिंहाचा मृत्यू १९८२मध्ये झाला. ज़्ाहराचे वैवाहिक जीवनही फारसे सुखाचे नव्हते. मुलीने भारतीय कत्थक नृत्य शिकावे असे मात्र तिला वाटे. पण माह शिकायला अमेरिकेला गेली. तिथल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तसेच सीबीएस न्यूज चॅनेलवर काम करू लागली. आणि मग रूटीन जगण्यातून येणाऱ्या अस्वस्थतेवर उपाय शोधताना तिला अचानकच फ्लॅमेंको या अंदालुसियन नृत्यशैलीचा शोध लागला! १९९६ मध्ये स्पेनमध्ये सेविल येथे जाऊन ती फ्लॅमेंको शिकू लागली. यापूर्वी कधी स्पॅनिश भाषेशी संबंध आला नव्हता, तरीही! तिला आपल्या स्पॅनिश- मूळच्या अंदालुसियन - फ्लॅमेंको डान्सर आजीविषयी काही माहिती नव्हती, तरीही! २००४मध्ये पासपोर्टचे नूतनीकरण करताना तिला आपल्या वारशाचा शोध लागला. त्यानंतर माह अख्तर आपल्या जन्मदात्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीला आली. त्यांनीही तिची भेट घेतली आणि तिचा कुटुंबीय म्हणून स्वीकारही केला. फ्लॅमेंकोव्यतिरिक्त एव्हाना ती कत्थकही शिकली आहे. तिला सहा भाषा बोलता येतात. ती आता न्यूयॉर्क, सेविल आणि दिल्ली येथे जाऊन येऊन असते. तिच्या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क एव्हाना ब्राझिल, चीन आणि जर्मनीमध्ये विकले गेले आहेत आणि लवकरच पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद भारतात उपलब्ध होईल. पेनेलॉपी क्रूझ या स्पॅनिश अभिनेत्रीने चित्रपटासाठी तिच्या या पुस्तकाचे हक्क विकतही घेतले आहेत. पेनेलॉपी क्रूझला -आणि हॉलीवूडलाही - फ्लॅमेंको डान्सरच्या या विलक्षण कहाणीचा मोह न पडता तरच नवल!