Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

अमरावती विभागात खतांची टंचाई
अमरावती, २७ मे / प्रतिनिधी

अमरावती विभागात खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी खात्याकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्ष बाजारात विपरित चित्र असल्याचे दिसून येत आहे. विभागात युरिया आणि डीएपीसह रासायनिक खताची मागणी ६ लाख मेट्रिक टनापर्यंत वाढली असताना पुरवठा आराखडा मात्र ५ लाख मेट्रिक टनाचाच आहे.

दारूबाज वृत्ती सोडा सभापतींचा शिक्षकांना सल्ला
वर्धा जिल्हा परिषद शाळांमधील गणवेश बदलला

वर्धा, २७ मे / प्रतिनिधी

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा सल्ला शिक्षण सभापतींना देणाऱ्या काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आता सभापतींनी दारूबाज वृत्ती सोडण्याचा ‘नहले पे दहला’ मारला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील मुलामुलींचा गणवेश बदलण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी घेतला आहे. पारंपरिक निळ्या पांढऱ्या रंगाऐवजी आकर्षक रंगातील डिझाईनचा गणवेश या वर्षीपासूनच लागू करण्याचा निर्णय झाला.

चंद्रपूर जिल्ह्य़ात आदिवासी पाडय़ांवर कर्जमुक्त शेतीचा अभिनव प्रयोग
कृषी केंद्रांच्या सावकारीला धडा!
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, २७ मे

खते व बियाण्यांची दामदुपटीने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांच्या सावकारीला धडा शिकवण्यासाठी जिवती व पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासींनी सहकारातून कर्जमुक्त शेतीचा अभिनव प्रयोग यंदा सुरू केला आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांची बियाणे व खते घेण्यासाठी लगबग सुरू होते.

शिकारी टोळ्यांना पकडण्यासाठी संयुक्त गस्त
मोहीम चंद्रपूर, २७ मे/ प्रतिनिधी

जिल्हय़ातील जंगलात वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या शिकारी टोळय़ा सक्रिय झाल्या असून यावर आळा घालण्यासाठी पोलीस दल, रेल्वे पोलीस व वन खात्याच्यावतीने जंगलात संयुक्त गस्त मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिकारी टोळय़ांची माहिती देण्यासाठी उत्तर चंद्रपूर वनवृत्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्हा व्याघ्रकक्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

तिवसा तालुक्यात पाणी टंचाई
तिवसा, २७ मे / वार्ताहर
तिवसा तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई असून वाढत्या तापमानामुळे पाण्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. खोल जात असलेल्या भूजल पातळीमुळे कुपनलिका व विंधन विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. वर्धा नदी कोरडी झाल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद झाल्या आहेत.मागील काही महिन्यात जिल्हय़ात वाघ व बिबट या वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या आठ घटना उघडकीस आल्या. तसेच बिबटय़ाच्या कातडय़ाची तस्करी करताना यावर्षी चार टोळय़ांना अटक करण्यात पोलीस दलाला यश आले.

वीज वितरणातील गोंधळाने बेलावासी त्रस्त
बेला, २७ मे / वार्ताहर

वादळ-वारा व पाऊस झाला की, बेला येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने बेला येथील जनता कमालीची त्रस्त झाली आहे. कनिष्ठ अभियंता गुजर हे बेला येथे मुख्यालयी राहत नसल्यामुळे हा गोंधळ वाढला आहे. गेल्या महिन्याभरापासून येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून तो पूर्ववत सुरळीत सुरू होण्यास पाच-पाच, दहा-दहा तास लागत असल्याने उन्हाच्या उकाडय़ात विजेचाही त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या वादळाच्या तडाख्याने ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने खंडित वीज प्रवाह सुरू करायला तब्बल ८ ते १० तास लागले. वारंवार तारा तुटणे, जंपर तुटणे, डी.पी. वरून बिघाड निर्माण होणे, गुंतागुंतीचे वायर तारा व्यवस्थित करणे आदी दुरुस्ती त्वरित करण्यासाठी कंपनीचे तुटपुंजे मनुष्यबळ अपुरे पडत आहे.

प्रा. देशमुख यांना पुरस्कार प्रदान
वर्धा, २७ मे / प्रतिनिधी

नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांतर्फे घेण्यात आलेल्या उत्कृष्ट अध्यापक स्पर्धेत वर्धेच्या लोक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वाय.डी. देशमुख व प्रा. विकास काळे यांनी नागपूर विभागात प्रथम पुरस्कार पटकावला. प्रा. देशमुख यांनी इंग्रजी तर प्रा. काळे यांनी शास्त्रीय गायन अध्यापन विभागात अव्वल क्रमांक गाठला. तालुका, जिल्हा व विभाग अशा तीन टप्प्यात ही अध्यापन स्पर्धा चाचणी पार पडली. शिक्षकांमधील प्रतिभेचा संपूर्ण सक्षमतेने विद्यार्थ्यांसाठी उपयोग करून घेणे, त्यांना ज्ञानार्जनासाठी प्रेरित करणे, सकारात्मक दृष्टी विकसित करणे अशा हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.प्रा. देशमुख व प्रा. काळे यांनी संबंधित विषयाच्या अध्यापन चाचणीत दाखवलेल्या कौशल्याने त्यांना पुरस्कार मिळाल्याचे मत शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांनी पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केले. या दोघांचाही ते कार्यरत असलेल्या लोक विद्यालयात संस्थाध्यक्ष दे.सी. हेमके गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव प्रा. डॉ. गजानन कोटेवार व प्राचार्य वसुधा इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम पुरस्कार पटकावणारे प्रा. श्रीराम मेंढे यांचाही गौरव करण्यात आला.

सोयाबीन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी
रोहणा, २७ मे / वार्ताहर

वर्धा जिल्ह्य़ात अत्यल्प पावसामुळे सोयाबीनवर मोठय़ा प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांना सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाले. वर्धा जिल्ह्य़ाच्या परिस्थितीप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्य़ातही किडीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती होती. चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसान भरपाई पोटी प्रती हेक्टरी ५ हजार रुपयाचे अनुदान शासनाद्वारे देण्यात आलेले आहे. वर्धा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झालेले असताना शेतकरी शासकीय अनुदानापासून अजूनपर्यंत वंचित आहेत. तसेच संपूर्ण जिल्ह्य़ाची आणेवारी ही ५० पैशाच्या आत असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपयांचे अनुदान त्वरित देण्याची मागणी नागपूर जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे आणि रोहणा शाखेचे फनिंद्र रघाटाटे, बाळासाहेब गलाट, प्रकाश टाकळे, हितेंद्र बोबडे, दिलीप पांडे, विजय घारगे आणि विजय राऊत यांनी एका पत्रकाद्वारे मागणी केलेली आहे.

सिंधी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अकोला, २७ मे / प्रतिनिधी

भाजप नेते श्याम गुरबानी मृत्यूप्रकरणी तसेच मूल बदलल्याप्रकरणी तपास पूर्ण करून न्याय मिळावा या मागणीसाठी सिंधी बांधवांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सिंधी कॅम्पपासून मोर्चाला सुरुवात झाली. दक्षता नगर, अशोक वाटिका या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पेाहचला. आमदार गोवर्धन शर्मा, महापौर मदन भरगड, आमदार गोपीकिसन बाजोरीया, आमदार हरिदास भदे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
गुरबानी मृत्यूप्रकरणी तसेच मूल बदलल्याप्रकरणी डॉ. शुक्लंविरोधात सुरू असलेला तपास मंद गतीने सुरु असल्याचा आरोप सिंधी बांधवांनी केला आहे. हा तपास लवकरात लवकर पूर्ण करून न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर क रण्यात आले. मोर्चामध्ये रमाकांत खेतान, विजय अग्रवाल, उषा विरक, हरीश अलिमचंदानी, राजकुमार मुलचंदानी, कन्हैयालाल रंगवाणी, मारुमल भुलानी, हिरालाल कृपलानी, गोविंद चंदवानी, गोपी ठाकरे, डॉ. अशोक ओळंबे, विनोद मनवानी, वसंत बाछुका आदी सहभागी झाले होते.

‘मॅग्मो’ संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नीलेश टापरे
खामगाव, २७ मे / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो)च्या जिल्हाध्यक्षपदी येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. नीलेश टापरे तर सचिवपदी चिखलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात उपाध्यक्ष डॉ. जयंत पाटील, डॉ. प्रशांत राठोड, डॉ. अशोग ढगे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. श्याम बुरुंगले, सहसचिव डॉ. राजेश फाळके, डॉ. अमोल गिते, डॉ. डी.व्ही. सावंत, राज्य प्रतिनिधी डॉ. रफीक अन्सारी, जिल्हा संघटक डॉ. उमेश जाधव, डॉ. डी.व्ही. खिरोळकर, डॉ. आर.डी. गोफणे, महिला प्रतिनिधी डॉ. सुजाता बचुटे, प्रमुख सल्लागार सैय्यद उमर हाश्मी, निमंत्रित डॉ. राजेंद्र गाडेकर, तालुका संघटक मेहकर- डॉ. चऱ्हाटे, चिखली- डॉ. शहाबाज देशमुख, बुलढाणा- डॉ. भुसारी, लोणार- डॉ. पाबीतवार, देऊळगाव राजा- डॉ. दाहाडे, सिंदखेड राजा- डॉ. बन्सोड, खामगाव- डॉ. असत फहीम, शेगाव- डॉ. डाखोरे, संग्रामपूर- डॉ. चिमणकर, जळगाव जा.- डॉ. ठोंबरे, नांदुरा- डॉ. जैस्वाल, मोताळा- डॉ. सोळंके, मलकापूर- डॉ. सैय्यद जुनेद यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोटारसायकलला वाहनाची धडक
दोन ठार, एक जखमी
चंद्रपूर, २७ मे/ प्रतिनिधी

विवाह सोहोळा आटोपून चंद्रपूरला परत येणाऱ्या मोटारसायकलला एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात साखरवाही कोल वॉशरीजवळ मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास झाला. मृतांमध्ये संजय बावणे व श्यामराव चंदनखेडे यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील संजय बावणे, श्यामराव चंदनखेडे व बंडू बावणे हे तिघे मित्र मोटारसायकलने (एम.एच.३४-एन-८१६) भद्रावती तालुक्यातील गोन्नाड येथून विवाह सोहोळा आटोपून परत येत होते. साखरवाही कोल वॉशरीसमोर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला मागावून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की संजय बावणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर बंडू बावणे व श्यामराव चंदनखेडे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत बंडू व श्यामराव यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच श्यामराव चंदनखेडे यांची प्राणज्योत मालवली. या अपघात प्रकरणी भद्रावती पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश
वाशीम, २७ मे / वार्ताहर

वाशीम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वाशीम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील वरिष्ठ लिपीक शेषराव इंगोले व समाज कल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याची तक्रार ‘या’ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक स्मिता भीमराव धामणे यांनी महाराष्ट्र अपंग भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केली होती. या तक्रारीबाबत समितीने विभागीय समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून विभागीय समाज कल्याण अधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन एक चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. अकोला येथील विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.एफ. पाडवी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सहाय्यक लेखाधिकारी एस.बी. त्रिमुखे, सांख्यिकी सहाय्यक जी.जी. मालवे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जी.बी. वाकोडे या सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र अपंग भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष संजय पंडित यांनी दिली.

यवतमाळात महिलांचा निषेध मोर्चा
दलित महिलेची धिंड
यवतमाळ, २७ मे / वार्ताहर

जादूटोणा करण्याच्या संशयावरून दलित महिलेची धिंड काढण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्हा नाग संघटनेच्या महिला आघाडीने मोठा मोर्चा काढून समाजकंटकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे. अकोला जिल्ह्य़ातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे रंगू थोटे या ६८ वर्षीय प्रौढ महिलेची काही समाज कंटकांनी अर्धनग्नावस्थेत गाढवावरून धिंड काढल्याची घटना २३ मे रोजी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी मोठा मोर्चा काढला होता. या घटनेच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. शासनाने पीडित महिलेला आर्थिक मदत करावी आणि जादूटोणा विधेयक मंजूर करावे, अशी मागणी मोर्चेकरी महिलांनी केली. समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रलंबित जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात सादर करून ते मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. अंधश्रद्धा फैलावणाऱ्या अवैज्ञानिक मालिकांचे प्रसारण विविध वाहिन्यांवरून होते. ते बंद करावे, अशीही मागणी करण्यात आली. मोर्चात वनिता तलवारे, ललिता नीतनवरे, लीला घोंगडे, रमा मेश्राम, आनंद गायकवाड, नागसेन ढोकणे इ. सहभागी झाले होते.

भूदेव वांढे ‘राष्ट्रीय गौरव’ पुरस्काराने सन्मानित
कोराडी, २७ मे / वार्ताहर

महादुला-कोराडी येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष भुदेव वांढे यांना उल्लेखनिय कार्याबद्धल पुणे येथे पार पडलेल्या एका समारंभात ‘राष्ट्रीय गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ येथील समता साहित्य अकदामीतर्फे वांढे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात नुकत्याच पार पडलेल्या समारंभात माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते वांढे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी आमदार रामदास तडस, समता साहित्य अकादमीचे अध्यक्ष देवानंद तांडेकर, अरुण राऊत, दत्तात्रय धुमाळ, भारती तांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. समता साहित्य अकादमीतर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्धल वांढे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

अपघात होऊनही अवैध प्रवासी वाहतूक जोरात
वडनेर, २६ मे / वार्ताहर

गेल्या आठवडय़ात येथून जाणाऱ्या महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला लोंबकळत जाणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा ट्रकचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होऊनही या महामार्गावर अवैध वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे.हिंगणघाट तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-हैद्रराबाद या महामार्गावरून हिंगणघाट ते वडकी असा अवैधरीत्या प्रवास सुमारे ५० ऑटोमधून तर वडनेर येथून आजनसरा, शेकापूर, सिरसगाव या मार्गावर ३० ऑटोमधून प्रवासी वाहतूक केली जाते. गेल्या आठवडय़ात लोंबकळत ऑटोने प्रवास करणाऱ्या हिंगणघाट येथील अफजल खान पठाण या १४ वर्षीय मुलाचा पोहना गावाजवळ ट्रकची धडक लागून बळी गेला तरी अवैध वाहतूक जोरात सुरू आहे.

हिंगणघाटला परिचारिका सप्ताह साजरा
हिंगणघाट, २७ मे / वार्ताहर

येथील लोक शिक्षण मंडळाद्वारे संचालित जनता नर्सिग स्कूलमध्ये परिचारिका सप्ताह साजरा करण्यात आला. परिचारिका व्यवसायाच्या जनक फ्लोरेंस नाइटेंगल यांच्या वाढदिवसानिमित्त हा परिचारिका दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जनता नर्सिग स्कूलमध्ये परिचारिका सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाचे उद्घाटक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दुधे होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डागा तर प्रमुख पाहुणे म्हणून सिस्टर योहाना व डॉ. निशा सिंघवी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थिनी शुभांगी जगताप व पाहुण्यांनी फ्लोरेंस नाइटेंगल यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली. सिस्टर देशपांडे यांनी विद्यार्थिनींना शपथ देऊन परिचारिकेच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा झाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोमल पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवराज दंडगी, डॉ. प्रकाश पिसे, राजेश सातपुते, संदीप खोबे व दीपक चौधरी यांनी परिश्रम घेतले.

सामूहिक विवाह सोहोळा शनिवारी
हिंगणघाट, २७ मे / वार्ताहर

येथील जय भारती शिक्षण संस्थेच्यावतीने ३० मे रोजी हिंगणघाट येथे सामूहिक विवाह सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. जैन संघटना, धान्य-किराणा-कापड संघटना, रॉकेल विक्रेता संघ व बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या या सामूहिक विवाह सोहोळ्याचे हे चौथे वर्ष आहे. ३० मे रोजी होणाऱ्या या विवाह सोहोळ्यासाठी आतापर्यंत १५ जोडप्यांनी नावाची नोंदणी केली आहे. या विवाह सोहोळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आर.आर. पाटील, खासदार दत्ता मेघे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे, आमदार अमर काळे, आमदार रणजित कांबळे, सुरेश देशमुख, रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती संयोजक दीपक कळंबे यांनी दिली. या मेळाव्यात मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, पांडुरंग उजवणे, श्याम मसराम यांनी केले आहे.

दुचाकीची धडक; एक ठार
तिवसा, २७ मे / वार्ताहर

जवळचा चांदूरबाजार-सार्सी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने सुरेंद्र देवीदास इंगोले (३५) हा जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे. ममदापूर येथील सुरेंद्र इंगोले चांदूरबाजारवरून लग्न आटोपून गावाकडे येत असतानाच मोटारसायकल (एमएच ३१ बीके ९८०५) तिवसा येथून नेरपिंगळाईकडे जाणाऱ्या मोटारसायकल (एमएच २७ झेड १८३८) सोबत धडक झाली. प्रवीण मनोहर गुल्हाने व सतीश गायकवाड (रा. शिरखेड) मोटारसायकलवर होते. या अपघातात सुरेंद्र इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला.गेल्या तीन वर्षांत वडील देवीदास, त्यानंतर तीन भाऊ बाबाराव, नरेंद्र, सुरेंद्र पाठोपाठच सुरेंद्रची पत्नी अर्चना यांचाही मृत्यू झाल्याने सुरेंद्रची आई व भाऊ महेंद्र यांच्यावर या अपघाताने आभाळ कोसळले.

गांधी सिटी पब्लिक स्कूलचा उत्कृष्ट निकाल
वर्धा, २७ मे / प्रतिनिधी

येथील जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. ‘सीबीएसई’ने नुकत्याच या निकालाची घोषणा केली. शाळेचा अभिलाष तळवटकर ९२ टक्के, टी.एन. भारद्वाज ८९ टक्के व सुचित सूरकार ८८ टक्के मिळवून शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर झळकले. संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री, प्राचार्य दीपिका गार्डनर, सचिव सचिन अग्निहोत्री यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले.

खासदार मेघेंनी शकुंतलेचा प्रश्न अग्रक्रमाने निकाली काढावा
रोहणा, २७ मे / वार्ताहर
नुकत्याच झालेल्या १५ व्या लोकसभेसाठी वर्धा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार दत्ताजी मेघे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल रोहणा परिसरातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यात राष्ट्रवादीचे शिरीष वाघ यांनी मेघेंनी वर्धा जिल्ह्य़ाचा औद्योगिक विकास करण्याची अपेक्षा व्यक्त केली. विदर्भ शकुंतला रेल्वे विकास कृतीचे बाबासाहेब गलाट यांनी पुलगाव-आर्वी शकुंतला रेल्वे ब्रॉड ग्रेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग मोर्शीपर्यंत वाढविण्याची मागणी लावून धरावी, अशी विनंती एका पत्रकाद्वारे केली. भटक्या विमुक्त महासंघाचे हितेंद्र बोबडे यांनी रेणके आयोग व तिसऱ्या सूचीची मागणी मंजूर करण्यासाठी मेघे प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वेगळा विदर्भ, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वर्धा मतदारसंघातील मतदारांना सावंगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार करणे याही मागण्या खासदार मेघेंकडे मतदारांनी केलेल्या आहे.

ग्रामपंचायतीच्या निर्णयाने ‘लॉन’ मालकांचे धाबे दणाणले
वर्धा, २७ मे / प्रतिनिधी
अवैधरीत्या ‘लॉन’ तयार करून त्यावर होणाऱ्या विवाह सोहोळ्याचा धडाका थांबविण्याचा निर्णय नालवाडी ग्रामपंचायतीच्या पहिल्याच सभेत घेण्यात आल्याने ‘लॉन’ मालकांचे धाबे दणाणले आहे. दहा हजाराची उच्चभ्रू व पांढरपेशी नागरिकांची वसाहत असलेल्या वर्धेलगतच्या नालवाडी ग्रामपंचायतीत गत १५ वर्षांनंतर सत्ताबद्दल झाला. सरपंचपदी नालवाडी विकास आघाडीच्या संजीवनी उरकुडे व उपसरपंचपदी राकेश गणवीर यांची बहुमताने निवड झाली. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या सभेत तीन संकल्प सोडण्यात आले. ग्रामसभेच्या परवानगीशिवाय मंगल कार्याचे ‘लॉन’ उभारल्या जाऊ नये. अस्तित्वातील लॉनच्या मालकांनी मंगलकार्यातील आर्केस्ट्रा, फ टाक्यांचा आवाज, नाच गाणे यावर नियंत्रण ठेवावे. गत पाच वर्षांतील कामांची तपासणी व रिकाम्या भूखंडावर करवसुली तसेच मतदारयादीतील घोळ दूर क रून मतदारांना अधिकृत करणे, असे निर्णय झाल्याची माहिती गटप्रमुख गिरीश काशीकर यांनी दिली.

ब्रह्मपुरी तालुक्यात कृषी दिंडी
ब्रह्मपुरी, २७ मे / वार्ताहर

कृषी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या कृषी दिंडीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. चिखलगाव, अऱ्हेर नवरगाव, सावलगाव, मालडोंगरी, खेड व लाखापूर आदी गावात कृषी दिंडीचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तालुका कृषी अधिकारी एन.एन. वाघाये यांच्या नेतृत्वाखाली कृषी दिंडी काढण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांना धानाकरिता बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिके, बियाणे उगवण शक्ती तपासणे, जीवाणू-खते-औषध व रासायनिक खतांचा संतुलित वापर युरिया, डीएमपी ब्रिकेटची माहिती, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्न-द्रव्य-व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि मृदसंधारणाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. चिखलगाव येथे श्रीराम बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत किसन धांडे, नरेंद्र दुपारे व भास्कर नाकतोडे उपस्थित होते. यावेळी कृषी िदडीच्या आयोजनामागील उद्दिष्टांवर कृषी अधिकारी एन.एन. वाघाये यांनी माहिती दिली. अशाच सभा विविध गावात घेण्यात आल्या.

स्वतंत्र महिला रुग्णालयाकरिता दिरंगाई
भंडारा, २७ मे / वार्ताहर

भंडारा जिल्हा विभागणीत जिल्ह्य़ातील महिला रुग्णालय गोंदिया जिल्ह्य़ाला गेले आणि महिला रुग्णांना कमालीच्या अडचणींना तोंड देणे भाग पडत आहे. राजकारणातील सारी सूत्रे गोंदियातून हालत असल्यामुळे येथील तथाकथित नेतेही याबद्दल मौन धरून आहेत. सध्या येथील जिल्हा रुग्णालयासोबत स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय नसल्यामुळे अवास्तव भार पडत आहे. अनेकदा रुग्णांना खाली झोपावे लागते. प्रसूतीकरिता आलेल्या रुग्णांनाही या समस्येला तोंड द्यावे लागते. दररोज या जिल्हा रुग्णालयात सुमारे १० प्रसूती होतात. स्वतंत्र महिला रुग्णालयामुळे ही समस्या राहणार नाही.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय समविकास योजनेच्या अंतर्गत महिलांच्या १०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. अजून तो धूळखात आहे. या रुग्णालयाकरिता जागा उपलब्ध असूनही अक्षम्य दिरंगाई होत आहे.

कॉमर्स एज्युकेशन असोसिएशनची सभा
बुलढाणा, २७ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कॉमर्स एज्युकेशन इन्स्टिटय़ूट असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची सभा शेगाव अर्बन पत संस्थेच्या सभागृहात नुकतीच झाली. या सभेला ७० प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात केली. सचिव शैलेंद्र पाटील यांनी मागील कामकाजाची माहिती दिली. या सभेला सुभाष बागड, अशोक पावस, रामदास उमाळकर, दत्तात्रय पैठणकर, मोहन भोमे, सुनील भालेराव आदी उपस्थित होते.

आय.आय.टी. परीक्षेत साहील गोधने विदर्भातून द्वितीय
वरूड, २७ मे / वार्ताहर

साहील गोधने आय.आय.टी. परीक्षेत देशातून ३१५ वा तर विदर्भातून तो दुसरा आला आहे. साहील याने सी.बी.एस.ई. माध्यमिक शालांत परीक्षेतही ९१ टक्के गुण प्राप्त केले. साहीलने आय.आय.टी. परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. चरण सोनारे, डॉ. आनंद झामडे, डॉ. विकास विंचूरकर, डॉ. मिलिंद खेरडे आदींनी अभिनंदन केले.