Leading International Marathi News Daily
गुरुवार । २८ मे २००९

दिनकर : काय वहिनी, आता या वयात कुठे आणि कसा घसरला पाय?
शालिनी : अहो, तुमच्या जिभेला काही हाड? भलतेच काहीतरी काय विचारता?
दिनकर : मी कुठं काय वेडंवाकडं बोललो? साधं, सरळ, स्वच्छपणे विचारलं की, वहिनी असा कसा पाय घसरला आणि मोडला? त्यात तुला काय वेडंवाकडं दिसलं कुणास ठाऊक!
शालिनी : हं, पुरे पुरे, कळलं. पण रेखा, खरंच असा कसा गं पाय मोडला?
रेखा : अगं, काय सांगू? ठेच लागल्याचं निमित्त झालं..
दिनकर : ..आणि सुतानं स्वर्ग गाठला असंच ना?
शालिनी : अहो, कुठल्याही म्हणी कुठेही वापरायची ही तुमची सवय केव्हा जाणार कुणास ठाऊक? त्याला काटय़ाचा नायटा

 

होणं म्हणतात.
दिनकर : हां, हां, तेच ते गं. जरा शब्द इकडेतिकडे झाले तर केवढा आरडाओरडा करतेस. पण मग काय वहिनी, हा दागिना पायात किती दिवस आता?
रेखा : चार आठवडे.
शालिनी : चार आठवडे?
रेखा : हो न गं आणि पाय बिलकुल हलवायचा नाही, असा दमही भरलाय डॉक्टरांनी..
शालिनी : म्हणजे चार आठवडे हाऊस अरेस्टच म्हण की.
दिनकर : जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
शालिनी : आता मात्र हद्द झाली हं तुमच्यापुढे. इथे तिचा पाय मोडलाय आणि तुम्ही म्हणताय जे होतं ते चांगल्यासाठी. पाय मोडणं, कामं धामं सोडून घरात अडकून पडणं यात काय चांगलं आहे हो?
दिनकर : शालिनीबाई सांगतो, पण जरा शांत व्हा. मगाशी आम्ही चुकलो, हे आम्ही मान्य करतो. पण याचा अर्थ आम्ही अगदीच ‘हे’ आहोत आणि सारख्या चुकाच करतो, असं स्वत: समजू नका आणि इतरांचाही समज करून देऊ नका.
शालिनी : अहो, तुम्ही काय इथे भांडायला आला आहात का?
दिनकर : भांडायची इच्छा नाही माझी, पण तू भांडायला भाग पाडते आहेस.
शालिनी : मी तुम्हाला भांडायला भाग पाडते आहे? आल्यापासून तुम्ही जी मुक्ताफळं उधळताय ना ती बघा जरा.
दिनकर : शालिनीबाई पुन्हा एकदा सांगतो, झालं हे बरं झालं, हे विधान आम्ही अगदी तोलूनमापून केलंय.
शालिनी : ते कसं काय?
दिनकर : सांगतो, पण असं जरा शांतपणे घ्या की थोडं. आल्यापासून बघतोय मांजरीसारख्या फिस्कारताय नुसत्या.
शालिनी : मला नावं ठेवणं पुरे. मुद्दय़ाचं बोला.
दिनकर : गेले काही महिने रेखा वहिनींकडे चाललेली गडबड तू पाहतेच आहेस. घरातलं पहिलं लग्न म्हणून रंग झाला. मग रश्मीबाईंचं लग्न. मग कॉन्फरन्स. त्यात त्यांना पेपर वाचायचा होता. रश्मीच्या लग्नाच्या गडबडीत झालं नाही म्हणून नंतर मान पाठ एकत्र करून पेपर तयार केला. सेमिनार आटोपून दिल्लीहून परत येत नाहीत तो अप्पा आजारी पडले. त्यांच्या तपासण्यांसाठी इथंच होते. ती गडबड चालली होती. मग सुमी अमेरिकेहून आली होती. सहकुटुंब-सहपरिवार. लग्नाला न येता आल्याचा सगळा वचपा काढला तिनं..
शालिनी : अगदी खरंय हं तुम्ही म्हणता ते. कामं काही पाठ सोडत नाहीत तुझी.
दिनकर : आता कशा मूळ मुद्दय़ावर आलात शालिनीबाई? तर या सगळ्या धावपळीचा परिणाम काय झाला? मध्यंतरी अर्धशिशी उफाळून आली, त्यावर जुजबी उपाय करून ही बाई परत उभी. मग तापानं फणफणल्या. तेव्हा जेमतेम दोन-तीन दिवस विश्रांती घेतली असेल नसेल..
रेखा : काय करणार हो भावजी, अप्पा येतो म्हणाले, त्यांना नाही कसं म्हणायचं?
दिनकर : तोच तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना. मग सारखं काहीतरी तुमच्या मागं लागतच राहतं.
शालिनी : ते पैशाकडं पैसा जातो म्हणतात ना.. तसं कामाकडं काम जातं.
दिनकर : आणि मग अशा ‘सुबह और शाम, कामही काम’ वाल्यांची काळजी ‘तो’ घेतो.
शालिनी : ती कशी काय?
दिनकर : ही बाई कशालाच बधत नाही म्हटल्यानंतर त्यानं सरळ तिचा पायच मोडला. म्हणजे अगदी मुळावर घाव घातला.
शालिनी : अगदी बरोबर. रेखा तसा तुझा हातही तो मोडू शकला असता गं. पण काय आहे ना, हात गळ्यात बांधून कामं करतच राहिली असतीस.
दिनकर : शालिनीबाई कधी नव्हे ते तुमचं आणि आमचं एकमत झालं बुवा. रेखावहिनी तुम्हाला सक्तीची विश्रांती मिळावी म्हणून ही देवाची करणी हो.
रेखा : बाई बाई कुठून कुठे पोहोचलात दोघंजण..
दिनकर : पण हात मोडला असता तर गेला असतात की नाही कामाला? खरं सांगा.
रेखा : हो बाई, शरीराच्या कुठल्याही भागाला काहीही व्हावं, पण पायाला काही होऊ नाही बाई. फार परावलंबित्व येतं.
दिनकर : अ हं हं. शरीराच्या कुठल्याही अवयवाला काहीही झालं तरी आपण हेच म्हणतो. कारण आपला प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. देवानं इतक्या नेमकेपणानं माणसाचं शरीर बनवलं आहे ना की, प्रत्येक अवयवाचं महत्त्व वेगळंच आहे.
रेखा : आणि या अवयवांना काही झालं की मग लक्षात येतं की, आपल्याच शरीराला आपण किती गृहीत धरतो.
शालिनी : अगदी लाखमोलाचं बोललीस बघ. दुखापत होईपर्यंत त्याचं अस्तित्वच आपण विसरून जातो.
रेखा : आणि दुखापत झाल्यावर ताळ्यावर येतो. आताच बघ ना, या प्लास्टरमुळे इतकी बंधनं आली आहेत ना की बस!
शालिनी : खूप जड जड वाटत असेल नाही..
रेखा : अगं पायात मणा मणाच्या बेडय़ा घातल्या आहेत असं वाटतंय. त्यामुळे प्रत्येक अॅक्शन अगदी हळूहळू आणि काळजीपूर्वक करावी लागते.
दिनकर : करावी लागते? अ हं, आपोआपच होते.
रेखा : पहिल्या दिवशी तर ते प्लॅस्टर, त्याचं वजन याचा अंदाज न येऊन मी इतक्या वेळा धडपडले की घाबरलेच. म्हटलं हे असंच होत राहिलं तर परत काही तरी मोडून घेईन. मग शेवटी एका जागी शांत बसून राहिले.
दिनकर : हे छान केलंत वहिनी, अहो, खरं तर आपलं शरीर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सारख्या सूचना करीत असतं. या सूचना आपण ओळखायच्या असतात. त्यांची अंमलबजावणी करायची असते.
रेखा : आणि आपण नेमकं उलटं करतो नाही? या सूचनांकडे, शरीरानं दिलेल्या सिग्नल्सकडे लक्षच देत नाही.
शालिनी : कित्येक वेळेला हे सिग्नल्स आपल्याला कळतातही पण वळत नाहीत.
दिनकर : मग आपलंच शरीर संपावर जातं. खरं तर अशी टाळाटाळ करून आपण स्वत:हून धोक्याची पातळी ओलांडत असतो. वास्तविक वेळेवारी लक्ष दिलं, उपाययोजना सुरू केल्या तर पुढची आपत्ती टळते. A stitch in time saves nine असंच म्हणतात ना. काय शालिनीबाई आता तरी बरोबर म्हण वापरली ना?
शालिनी : हो. म्हणही बरोबर आणि मांडलात तो विचारही बरोबर. तेव्हा रेखा काळजी घे बाई. उगीचच बडबड करू नकोस.
रेखा : हो गं बाई, सगळेजण तेच सांगताहेत.
शालिनी : सांगणारच. ओळखून आहेत सगळे तुला. त्यातून नेमके आता रमेशराव आणि राहुल ट्रेकला गेलेत ना? कळवलंस का त्यांना?
रेखा : छे गं, कशाला उगीच त्यांच्या जिवाला घोर?
शालिनी : आणि रश्मी? तिला माहीत आहेत का तुझे हे प्रताप?
रेखा : नाही गं, ते दोघं गेलेत मैत्रेयच्या आजीकडे. तिलाही नाही कळवलं.
शालिनी : काय गं, आज तुमची सोसायटीही अगदी शांत शांत वाटली..
रेखा : शांत असेल नाही तर काय. सगळी बच्चे कंपनी सुट्टय़ांसाठी कुठे कुठे गेलीय. अविनाश-अरुंधती, अनिरुद्ध-अवंतिका फिरायला गेलेत. नीरज, वंदन, पराग ट्रेकला गेलेत. शाश्वतीनं एक शिबीर आयोजित केलंय. त्यामुळे बरीचशी बच्चे कंपनी तिकडेच गेलीय. शाल्मली, वेदा, नेहा, मीनल, सारंग, विराज सगळी फौज तिला मदत करायला. मुलांना शिबिराला पाठवून त्यांचे आई-वडीलही जरा मोकळा श्वास घेताहेत. शिवाय कोणी नातेवाईकांकडे गेलंय. कोणाचे दहावी-बारावीचे क्लासेस सुरू झालेत. अगदी सुनं सुनं वाटतं त्यामुळे. नाही तर एव्हाना इथेच अड्डा पडला असता सगळ्यांचा.
शालिनी : म्हणूनच म्हणत होते, चल आमच्याकडे.
रेखा : आवडलं असतं गं, पण खरं सांगू का, बरं नसताना आपलंच घर बरं वाटतं.
शालिनी : अगं पण, आमचं घर परकं आहे का तुला?
रेखा : नाही, तसं नाही गं. पण घरातली पेंडिंग राहिलेली कामं करून टाकते आहे गं बसल्या बसल्या.
दिनकर : बस का वहिनी, म्हणजे इतका वेळ केलेली लेक्चरबाजी फुकटच का?
रेखा : नाही हं, अजिबात नाही. बसल्या बसल्या जमताहेत तेवढीच कामं करते आहे. बघितलंत ना पायाची काय बडदास्त ठेवलीय ती.
दिनकर : मग ठीक आहे. पण जाता जाता एक सल्ला देतो. समजा पाय बरा झाला आणि तरी पेंडिंग कामं संपली नसली तर दुसरा पाय मोडून घ्या.
शालिनी : काय तरी बाई, तुम्ही काय बोलाल ना खरंच नेमच नाही. चला तुम्ही आणखी काही मुक्ताफळं उधळायच्या आत आपण घरीच जाऊया..
shubhadey@gmail.com