Leading International Marathi News Daily
गुरुवार । २८ मे २००९

दवंडी - उष:काल होता होता..
माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
मराठी माणसाची कातडी गेंडय़ाची आणि मन मुर्दाड झाले आहे. त्याला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे असा जर बहुसंख्य लोकांचा समज असेल तर तो चुकीचा आहे असं मला म्हणावं लागेल. कारण गेल्या गुरुवारी ‘भाषातुराणा न भयम् न लज्जा’ हा लेख छापून आला आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. इतका की असं वाटलं हाच विषय थोडा पुढे चालविला पाहिजे. विकृत मराठी भाषा वाचून संतापणारे लोक खूप आहेत, पण त्यांना काय करायचं हे कळत नाही. ‘मराठी माणूस विनोद म्हणून सगळं हसून सोडून देतो’ या माझ्या विधानावर अनेकांनी असं म्हटलं

 

की आम्ही दुसरं करू काय शकतो? आजूबाजूची परिस्थिती इतकी हताश करणारी आहे की, त्यावर आम्ही रोजच्या सामान्य जगण्यासाठी धडपड करणारे काय करू शकणार? मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मराठीचा मुद्दा घेऊन अनेक वर्षे लढत आहेत. त्यानिमित्ताने निदान दुकानावरच्या पाटय़ा तरी मराठी मध्ये झाल्या. हे काही कमी नाही. पण या दोन बलाढय़ हत्तींच्या टकरीत मराठी माणसाचे नक्की स्थान काय आहे? हा वेगळा विचारार्ह मुद्दा आहे आणि मराठी माणसांचा कैवार फक्त या दोन पक्षांनी का घ्यावा हा त्याच्याही पुढचा मुद्दा आहे. असो. याची चर्चा स्वयंघोषित राजकीय पंडितांवर सोडून देऊन आपण आपल्या जाहिरात विश्वातल्या मराठीबद्दल त्यातल्या मान्यवर लोकांचे काय म्हणणे आहे हे पाहू.
जाहिरात विश्वात नामांकित अशी अनेक मराठी माणसे आहेत. अभिनय देव आताच्या असंख्य जाहिराती बनवतो. त्याबद्दल अनेक पारितोषिकेही त्याने मिळवली आहेत. पण जरा मागे गेलं तर आणखी एक मान्यवर नाव म्हणजे गोपी कुकडे. अनेक वर्षांपूर्वी ओनिडाची ‘नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड’ ही कॅचलाईन असलेली जाहिरात करणारे गोपी कुकडे मराठीच्या अध:पतनाकडे थोडय़ा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातात. ‘हे असं का घडतंय याचा विचार करण्याआधी थोडा जाहिरात विश्वात घडलेल्या बदलांचा मागोवा घ्यायला पाहिजे. १९९५ नंतर जाहिरात विश्वात एक स्थित्यंतर आलं. ते असं की तोपर्यंत जाहिरात संस्थांना जाहिरात प्रदर्शित करताना त्यावर १५ टक्के कमिशन मिळत होतं आणि त्या बदल्यात त्या संस्था क्रिएटिव्ह काम फुकट करीत होत्या. ९५ नंतर टेलिव्हिजनचा हिस्सा जाहिरातींमध्ये एवढा वाढला की छापील जाहिराती नगण्य स्वरूपात उरल्या. टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या जाहिरातींची आठवण करून देण्यासाठी केवळ त्या वापरल्या जायला लागल्या. त्यामुळे बऱ्याचशा, जवळजवळ सगळ्याच जाहिरात संस्थांमधले भाषेचे विभाग बंद झाले. त्यामुळे मूळ इंग्रजीत किंवा हिंदीत बनलेल्या जाहिरातीचा मथितार्थ लक्षात घेऊन दुसऱ्या भाषांमध्ये त्याचे रूपांतर करण्याऐवजी त्याचे शब्दश: भाषांतर होऊ लागले. ते करणाऱ्या लेखकांशी चर्चा करणारा, त्यांना समजून घेणारा आणि त्यांच्या वतीने उत्पादकांशी बोलणारा दुवा जो भाषा विभागाचा प्रमुख असा कोणी उरलाच नाही. बरं, बहुतांशी उत्पादक, ग्राहक हे अमराठी असल्याने त्यांना केलेले भाषांतर योग्य आहे की अयोग्य हे मुळातच कळत नाही. ते लेखकावर विश्वास टाकतात. जाहिरात संस्था आता कमी कमिशनवर काम करू लागल्यामुळे त्यांनाही चांगले लेखक परवडेनासे झाले आणि मग या अशा अनेक सुमार बुद्धीच्या, माध्यमाची माहिती नसलेल्या कारकुनी मनोवृत्तीच्या लेखकांचा उदय झाला. त्यामुळे हे सगळे होते आहे.
आपल्या स्वत:च्या जाहिरातीची तळमळ वाटणे ही वृत्तीच नाहीशी झाली आहे. म्हणजे गोपी कुकडेंनीच केलेल्या ओनिडाची जाहिरात त्या वेळी ‘आवाज’च्या अंकात द्यायची होती तर त्यांनी ती इंग्रजीतून नाही दिली. मूळ इंग्रजीचे मराठी रूपांतर काय करता येईल यासाठी दोन दिवस विचार केला आणि मग त्यातून ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी मूळ मराठी कॉपी जन्माला आली. पण असं किती लोक करतात? कुकडे तर म्हणतात की, केवळ वाक्यांचे रूपांतर करून भागणार नाही तर कंपनीचा लोगोसुद्धा मराठीत असावा यासाठी मी प्रयत्न केले. पाहिजे तर मूळ इंग्रजी लोगोही छापा.. पण मराठीही छापा. आजकाल होतं असं की एखादी जाहिरात मूळ हिंदी किंवा इंग्रजीमध्ये तयार करण्याचे कंत्राट एखाद्या निर्मात्याला दिले जाते आणि मग त्यालाच आणखी चार-सहा भाषांत ती डब करून द्या असं सांगितलं जातं. मग डबिंग करताना मूळ उच्चारांमध्ये झालेल्या ओठांच्या हालचालींशी ताळमेळ राखण्यासाठी (त्याला लिपसिंक असे म्हणतात.) शक्यतोवर तेच किंवा तसेच शब्द वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आणि मग त्यातून ‘वाकडा आहे पण माझा आहे’. अशी कॉपी जन्माला येते. तुम्ही स्वत:शी म्हणून पहा. ‘टेढा’ आणि ‘वाकडा’ हे दोन शब्द म्हणताना ओठांच्या हालचाली साधारण सारख्याच होतात.
पण डबिंगसाठी हे करणेही चुकीचे आहे. कारण लोक अडाणी आहेत असे त्यामध्ये गृहित धरलेले आहे. उदाहरणार्थ शाहरूख खान जर मराठीमध्ये ‘तू स्प्राईट पी स्प्राईट’ असं म्हणत असेल तरी तो मराठी नाही. आणि हे मराठी तो बोललेला नाही हे मराठी प्रेक्षकांना माहीत आहे. शिवाय एका भाषेतून दुसऱ्या भाषेत डबिंग करताना ते शंभर टक्के लिपसिंक करता येणार नाही हे तर अगदीच उघड आहे. कारण मुळातच ते अनैसर्गिक आहे. मग असा अट्टहास करून त्यातून विकृत भाषा समोर आणण्यापेक्षा भाषा चांगली ठेवली आणि लिपसिंककडे दुर्लक्ष केलं तरी चालण्यासारखं आहे.
अनेक र्वष जाहिरात क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलेले, अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आणि आता निसर्गकवी म्हणून ख्यातनाम असलेले नलेश पाटील हाच मुद्दा मांडतात. ‘भाषेचे प्रदूषण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे इतर माध्यमेही तेवढीच किंबहुना त्याहून जास्त भ्रष्ट झालेली आहेत. वर्तमानपत्रांची भाषा इतकी खराब झालेली आहे की ज्यांनी लोकांसमोर उत्तम भाषा ठेवावी अशी अपेक्षा आहे तेच बुरूज ढासळत आहेत. ‘पावसाने सामन्यावर पाणी फेरले’ अशी भाषा जर मान्यवर मराठी वर्तमानपत्रात वापरली जात असेल तर मार्गदर्शक म्हणून लोकांनी पाहायचं कोणाकडे? समाजमन घडविण्याची जबाबदारी भाषिक वर्तमानपत्रांची नाही का? बरं झालंय असं की इतर लोकही भ्रष्ट भाषेचे आंधळे अनुकरण करू लागले आहेत. त्याला ते ‘आजच्या तरुणाची भाषा’ असं गोंडस लेबल लावतात. संदीप खरेसारखा उत्तम कवी जर मुद्दाम इंग्रजी शब्द काव्यात वापरून त्या भाषेला मार्लिश (मराठी इंग्लिशचा वर्णसंकर) म्हणत असेल तर मग आपण दुसरं काय म्हणणार? का भाषा एकमेकात मिसळायची. बर्गरला आतमध्ये श्रीखंड लावून खाल का? नाही. ती सरमिसळ नाही आवडणार ना? मग भाषेची का करायची? अशाने प्रमाण भाषाच बदलून जाते. भाषेच्या पावित्र्यासाठी आता आंदोलन करायची वेळ आलेली आहे. माझ्या ऑफिसातला शिपाई घरी फोन करून आपल्या आईला जर ‘ममी मला आज जरा लेट होणार आहे’ असं सांगत असेल तर मला वाटतं यामागे आपला न्यूनगंड आहे.
आपण या सगळ्यावर विचारमंथन करीत असताना गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’मध्येच बजाजची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यात ‘आता पिघळवणाऱ्या ऑफरसह’ असं म्हटलं आहे? ऑफर पिघळवणारी कशी असते? पण बजाज किंवा टेल्कोसारख्या पुण्यात असलेल्या कंपन्यांचे मीडिया एक्झिक्युटिव्ह अत्यंत दुराग्रही असायचे हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो. चैत्रा नावाच्या जाहिरात संस्थेसाठी मी अनेक वर्षांपूर्वी कॉपीरायटर म्हणून काम करत असे. त्यांच्याकडेच काम करताना मी लिहिलेल्या कोकच्या कॉपीला कॅगचे पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळेच असेल कदाचित पण ज्यावेळी बजाजकडून मी लिहिलेल्या कॉपीवर ‘क्लायंट्स सजेशन्स’ असं म्हणून जे काही बकवास सल्ले यायचे ते मी नाकारल्यावर चैत्राही बजाजला आमच्या लेखकाला हे पटत नाही आणि शेवटी उत्तरदायित्व आमचे असल्यामुळे आम्ही या सूचना नाकारत आहोत असं सांगत असे. योग्य सूचना स्वीकारायला हरकत नाही. पण गैरसमज निर्माण करणारी, चुकीचा अर्थ ध्वनित करणारी भाषा कशी काय स्वीकारायची?
‘पण हल्ली बहुधा असं नाही होत. क्लायंटने ही कॉपी अप्रूव्ह केली आहे, असं सांगून तीच आम्हाला बोलायला लावली जाते.’ स्वाती सुब्रमण्यम या आघाडीच्या डबिंग आर्टिस्टने तिची तक्रार मांडली. म्हणजे साबण गळणारा कसा असतो? विरघळणारा असू शकेल.. पण गळेल साबण? बाळ कुरतडकर मला एकदा म्हणाले होते, स्मूथ शेव असं का म्हणतो आपण? शेव दिवाळीला करतो.. रोज करतो ती दाढी नाही का? गुळगुळीत दाढी असं नाही का म्हणू शकत? त्यांचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. आम्हालाही ही भाषा बोलताना त्रास होतो. पण काही कॉपीरायटर आता असे आले आहेत की, ज्यांच्या स्वत:च्या मराठीच्या ज्ञानाबद्दल मला शंका आहे. पण ते लिहितात आणि कदाचित ते स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे उत्पादक त्यांची कॉपी मंजूर करतात. खूप त्रास होतो, पण काय करावं कळत नाही.’
चौगुले समूहाचे सीनियर मॅनेजर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स या पदावर काम करणारे विनोद पवार म्हणाले की, खरं तर ज्या जाहिराती महाराष्ट्रासाठी तयार करायच्या त्याचा विचारच मराठीतून केला गेला पाहिजे. जे उत्तरेकडच्या किंवा दक्षिणेकडच्या लोकांना पटेल ते आपल्या संस्कृतीत बसेल, रुचेल असं नाही. उदाहरणार्थ, आपण अमावास्या अशुभ मानतो, दक्षिणेत अमावास्या शुभ मानतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. बरं चांगल्या लोकांना घेऊन चांगल्या जाहिराती करणे, चांगली कॉपी लिहिणे हे फार खर्चिक नाही. उलट लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास करून तुम्ही जर जाहिरात लिहिलीत तर ती पटकन पोहोचते. आम्ही चौगुले सीमेंट अनेक वर्षांपूर्वी सगळ्यात प्रथम कागदाच्या पिशव्यांतून देणे सुरू केले. मुद्दा असा होता की, गोणीतून जे सीमेंट दिले जाते ते पावसाळी हवामानात ओल पकडते आणि त्याचा दगड होतो. आता पावसापासून संरक्षण हा मुद्दा होता. मग आम्ही कोकणामध्ये बांबूचं इरलं पावसात डोक्यावर घ्यायला वापरलं जातं. त्याचा उपयोग केला आणि सीमेंटची जाहिरात केली. लोकांना कॉपी वाचल्याशिवाय मुद्दा कळला. जाहिरातीमध्ये भाषा आणि त्यासोबत असलेलं चित्र हे दोन्ही बोलकं पाहिजे. दोन्हींपैकी एक जरी वाचकाने पाहिलं तरी त्याला जाहिरात कसली आहे हे कळलं पाहिजे.
या लेखाच्या निमित्ताने वाचकांची जी असहाय्यता समोर आली त्यावरून असं वाटलं की, काही तरी उपाय सुचविले पाहिजेत. आपण सगळे एकत्र येऊ या, आंदोलन करू या, असं म्हणणं ठीक आहे. पण प्रत्येकाला आपापले व्यवसाय असतात. कुणी निवृत्त झालेले असतील तर त्यांना शारीरिकदृष्टय़ा धावपळ करणे शक्य नसते. मग काय करायचं? आपला खारीचा वाटा कसा उचलायचा? काही गोष्टी घरबसल्या करता येतील. एक तर वर्तमानपत्रांना पत्र लिहा. ई-मेल करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. किंवा दुसरा एक उपाय वर्तमानपत्रातील भाषा बेंगरूळ झाली आहे, असं तुमचं मत असेल तर एक करा, रोजचा पेपर नीट वाचा. लाल पेनने त्यातल्या चुका रेखित करा आणि तो पेपर त्याच पेपरच्या ऑफिसला पाठवून द्या. एक पाच-दहा रुपये खर्च करा. एवढं करू शकता? रोज नका करू, आठवडय़ातून एकदा करा. जनमताचा रेटा माध्यमांना जाणवू द्या. मराठी चॅनेल्सकडे पत्र पाठवा. विशेषत: बातम्यांच्या चॅनेलमध्ये जी मराठी भाषा बोलली जाते त्याबद्दल दिवस, वेळ आणि निवेदक यांचा उल्लेख करून चुका दाखवा. अजूनही पोस्टकार्ड सरकारच्या कृपेने ५० पैशाला मिळते आहे. आपल्याला काहीच करता येणार नाही, असं समजू नका आणि भगतसिंग दुसऱ्याच्या घरी जन्माला येण्याची वाट पाहू नका. कुठला तरी राजकीय पक्ष आपल्यासाठी काही तरी करील या भ्रामक कल्पनेत रमण्यापेक्षा आपण आपला वाटा उचलू या. पटतंय?
asparanjape1@gmail.com