Leading International Marathi News Daily
गुरुवार । २८ मे २००९

लँग्वेज कॉर्नर - ‘अडुसष्टची क्रांती आणि जर्मन ‘स्वदेश’
जर्मन भाषा, संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करून देणारं पाक्षिक सदर
मानवी मनाचे चलनवलन म्हणजे इंद्रियानुभव आणि प्रतिक्रिया याचं एक अनाहत आणि अखंड चाललेलं चक्र असं म्हणतात. म्हणजे असं बघा हं! स्पर्श, नाद, रुची, गंध आणि शब्द यांच्या माध्यमातून कुठलाही स्टीम्युलस किंवा झंकार मिळाला की आपल्यापैकी प्रत्येकाचे मन आपापल्या परीने त्याच्या प्रतिक्रिया मनात तयार करते आणि पुढची कृती नकळत त्यानुसार घडते. ‘एलांगोवन’ असे नाव घेतले की मनात उभी राहणारी कल्पनाचित्रे- केरळी शहाळीवाला- चैन्नईचा शास्त्रज्ञ’, ‘तामीळ अतिरेकी’ अशा वेगवेगळ्या परिमाणांची असू शकतात. आपल्या मेंदू नावाच्या सुपरकॉम्प्युटरमध्ये ज्या तऱ्हेच्या पूर्वानुभवांचे सॉफ्टवेअर असेल त्यानुसार ही कल्पनाचित्रे मनाच्या पडद्यावर उमटतात. त्यावर आपला कंट्रोल जवळजवळ नसतोच म्हणा नां! मग भले श्री. एलांगोवन मुंबईचे मध्यमवर्गीय कारकून का असेनात!
जसे व्यक्तींच्या बाबतीत घडते तसेच परक्या संस्कृतीच्या बाबतीतल्या कल्पनाचित्रांच्या बाबतीतही घडत असते. ‘जर्मनी’ म्हटले की भारतीय मनात ‘कुशल तंत्रज्ञ’ या इमेजबरोबरच ‘कणखर योद्धे’, ‘लष्करी बाणा’, ‘स्वदेशाभिमानी’, ‘कडवी

 

रणनीती’ अशी कल्पनाचित्रे उभी राहतात. दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात आपली पाठय़पुस्तके, प्रकाशित इतर पुस्तके आजूबाजूकडून ऐकलेली मते या सर्वानी मिळून तयार केलेले आणि ‘इन्स्टॉल’ केलेले सॉफ्टवेअर याला जबाबदार असते. नुसते इतकेच नव्हे तर बऱ्याच अंशी काही वेळा त्या त्या मानवसमूहाची भाषा ही या कल्पनाचित्रामध्ये विशिष्ट रंग भरण्यास नकळत कारणीभूत ठरते. फ्रेंच भाषेतली मखमली मुलायमता, स्पॅनिश/ इटालिअन भाषा ऐकताना जाणवलेले आर्जव त्यामानाने जर्मन भाषेतले ठाशीव उच्चार एकदम धडधडत जाणाऱ्या रणगाडय़ांची आठवण करून देतात. बरीचशी रुपके खरोखरीच युद्धजन्य आहेत. ‘आघाडीची फळी’ मधील फळी, ‘रणांगण’, ‘शत्रूला धूळ चारणे’, ‘आगेकूच’, ‘दारूगोळ्याचा स्फोट’ अशी अनेक रुपके विशेषत: बीझीनेस जर्मनमध्ये इतक्या सहजपणे वापरली जातात की त्याचा एकत्रित परिणाम ‘जर्मनी’ या कल्पनाचित्रावर नकळत होत असतो.
या सगळ्याचा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे गेल्या सदरात आपण अडुसष्टच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चळवळीचे जर्मन कुटुंब व्यवस्थेवर झालेले परिणाम पाहिले. तसेच मूलगामी परिणाम जर्मन लोकांच्या युद्धप्रणीत मानसिकतेवरही या क्रांतीने केले. या पाश्र्वभूमीवर भारतीय मनातील जर्मन संस्कृतीचे कल्पनाचित्र आपण पुन्हा पडताळून पाहणे जरुरीचे आहे.
१९६८ च्या विचारमंथनात संपूर्ण जर्मनीवर युद्धविरोधी विचारांची एकच लाट उसळली. ‘नॅशनॅलिस्ट’ हा शब्द एखाद्या शिवीसारखा झाला. (नाझी या शब्दात तो अंतर्भूत आहे म्हणून विशेष) देशप्रेम दाखविणे म्हणजे पुन्हा हिटलरच्या नाझी मार्गाने जाणे-असे काहीसे समीकरण झाले. त्यामुळे देशप्रेमाची सर्व प्रतीके, चिन्हे यावरही रोष आला. आपल्या देशाचा झेंडा फडकावणे, राष्ट्रगीत म्हणणे, जर्मनीत राहणाऱ्या तुर्की लोकांच्या सतत वाढत्या लोकसंख्येबाबत वक्तव्य करणे, जर्मन स्कायलाईन वर रोज उगवणाऱ्या नवीन मशीदींच्या संख्येवर नकारात्मक मत देणे हे एखाद्या ‘टॅबू’सारखे झाले. या चळवळीचा तीव्र रोष (हिरोशीमा- नागासाकी’मुळे) अणुशास्त्रावर आणि पर्यायाने अणुऊर्जेवरही वळला. आणि तो आजही अगदी तसाच आहे. जर्मन गणसंख्येने सरकारवर प्रचंड दबाव आणून देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यावर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. त्यानुसार फेज प्रोग्रॅममध्ये २०२० पर्यंत जर्मन भूमीवर अणुऊर्जा तयार होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. सर्व प्रकल्प मृत करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे.
इतकेच नव्हे तर इतर देशांनी केलेला अणुकचरा जर्मन भूमीवरून वाहून नेला जाता कामा नये, त्याची विल्हेवाट जर्मनीच्या सीमेच्या आसपास कुठेही केली जाता कामा नये यासाठी जर्मन नागरिक संस्था सारख्या डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतात. त्यासाठी अजूनही मोठमोठी आंदोलने होतात.
जर्मनीच्या हजारभर वर्षांच्या अस्तित्वात १९४५ नंतर प्रथम या देशाने लोकशाहीची मूळाक्षरे गिरवायला सुरुवात केली आणि गेल्या साठ-पासष्ट वर्षांत पद्धतशीरपणे सराव करून त्यात पारंगतताही मिळवली. हिटलरने जर्मनांना पाजलेल्या वंशश्रेष्ठत्वाच्या बाळकडूला विसरण्याचा मनोभावे प्रयत्न जर्मन मन या लोकशाहीच्या धडय़ात करू पाहते. त्यात ते कितपत यशस्वी ठरले हा मात्र चर्चेचा विषय आहे.
असो. पण जर्मन समाजपुरुषाच्या मानसिकेतवर अडुसष्टच्या क्रांतीने घडवलेले मूलगामी परिणाम किंवा १९६८ ची ही क्रांती कुठल्याही इतिहासाच्या पाठय़पुस्तकात वाचायला मिळत नाही. बऱ्याचशा भारतीयांसाठी जर्मनी म्हणजे- हीटलर व दुसरे महायुद्ध - याच अश्मशिल्पात जर्मन संस्कृतीचे कल्पनाचित्र अडकून राहिलेले दिसते. आपल्याकडे दुसऱ्या महायुद्धाचे बरेचसे उदात्तीकरणही केले गेले आहे. शिवाय ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने इंग्रजांना नाकी-नऊ आणणारा ‘जर्मन’ हा ही त्या मागे कदाचित विचार असावा. काहीही असो, परंतु व्यावसायिक प्रथम भेटीत चमकल्या, कौतुक भरल्या डोळ्यांनी भारतीय माणूस दुसऱ्या महायुद्धाचा, हिटलरचा उल्लेख करायला जातो आणि जर्मनांच्या भळभळणाऱ्या जखमेवर न कळत मीठ चोळतो. आपल्याकडे अजूनही अधूनमधून बेस्टसेलरच्या लिस्टवर झळकू पाहणारे हिटलरचे ‘माईन काम्फ’ हे पुस्तक विकणे हा जर्मनीमध्ये सर्वात गंभीर गुन्हा आहे व त्यावर सक्त बंदी आहे हे बिचाऱ्या भारतीयाला माहितही नसते. १९६८ ची क्रांती, त्यातले जर्मनीचे युद्धवैराग्य याची भारतीयांना काहीच कशी माहिती नाही? याचे आश्चर्य व उद्वेग जर्मन मनात दाटून येतो. अशा प्रसंगाचा हिमनग जर्मन आणि भारतीय व्यावसायिक संबंधांना न कळत पहिला हादरा देऊ शकतो.
आपण २२ जानेवारीच्या सदरात प्रथम परिचयातील संवादाच्या आचारसंहितेबद्दल वाचले होते. त्यातले पुढचे कलम म्हणजे १९३३ ते १९४५ या कालखंडाबद्दल जर्मनांशी प्रथम भेटीत चुकूनही न बोलणे. आजच्या जर्मन पिढीला हा सर्व काळ विसरण्याची घाई आहे. आणि माझ्या पूर्व पिढीने केलेल्या कृष्णकृत्यांच्या छायेपासून स्वत:ला सतत दूर ठेवण्याची पोटतिडीक ही आहे.
तेव्हा ‘जर्मन लोक’ हा शब्द ऐकताच आपल्या मनात ‘स्वदेस’ची गाणी वाजायला लागली तर तो टेपरेकॉर्डर त्वरित बंद करणे हे इष्ट.
‘स्वदेस’ ही संकल्पना प्रत्यक्ष जर्मन मनात ‘लव्ह आणि हेट’ या झंझावातात कशी सापडली आहे त्याचे दोन गमतीदार आणि हृद्य आविष्कार सांगून अडुसष्टच्या क्रांतीचे हे दुसरेपरिणामपर्व आवरते घेते आणि ११ जूनच्या सदरात या क्रांतीच्या तिसऱ्या परिणामपर्वाविषयी आपण वाचणार आहोत त्याचीही नांदी करते.
पहिला अनुभव आहे १९४२ साली जन्मलेल्या हार्टमूट नावाच्या मित्राने सांगितलेला. तो होता सहाएक वर्षांचा. एक दिवस दारावरची बेल वाजली. लहानगा हार्टमूट दाराकडे धावला. दारात एक केस पिंजारलेली, दाढी वाढलेली, कृश आणि कपडय़ाच्या चिंध्या झालेली भयंकर दिसणारी व्यक्ती उभी होती. हार्टमूट घाबरून आईच्या स्कर्टमागे लपला. बघतो तर आईने क्षणार्धात त्या भिकाऱ्यासारख्या व्यक्तीला कुशीत घेतले व हार्टमूटला सांगू लागली- अरे राजा! हे तुझे बाबा आहेत. आणि बरं का हो- हा आपला धाकटा हार्टमूट. पिता-पुत्रांची ही आयुष्यातली पहिली भेट होती. ‘वडील’ या मानसचित्राच्या कुठे आसपासही न बसणाऱ्या या ‘व्यक्ती’बरोबर- सख्ख्या वडिलांबरोबर नीतळ असे नाते प्रस्थापित व्हायला हार्टमूटला अनेक दशके लागली. मग जेवणाच्या टेबलावर वडील जर्मनीच्या देदीप्यमान परंपरांचे, इतिहासाचे, तंत्रनिष्ठतेचे कौतुक करीत. आजूबाजूच्या आपल्या भग्न, ध्वस्त, हतगात्र देशाचे त्यांना सतत वाईट वाटत राही. कुठे होता एकेकाळी आपला देश आणि आज ही काय अवस्था झाली आहे आपली! कुडकुडणाऱ्या मुलांच्या अंगावर पांघरूण नाही, खायला पुरेसे अन्न नाही. मुलांनो, तुम्हाला कडक मेहनतीशिवाय पर्याय नाही. अखंड काम करा. जगाला दाखवून द्या, जर्मनी असा लेचापेचा देश नाही. हार्टमूट आणि त्याची संपूर्ण पिढी हे ऐकत ऐकत मोठी झाली. सक्त मेहनत केली. भूतकाळाकडे वळूनही बघितले नाही. सर्व खंत अविरत कष्टात या पिढीने बुडवून विझवून टाकली जणू! राखेतून वर येण्याची ज्वाला तेवढी धगधगत ठेवली. म्हणताना १९५४ साल उजाडले. वर्ल्ड कप फुटबॉलच्या निमित्ताने जर्मनीच्या जखमी गरुडाने पुन्हा एकवार जगाच्या रंगमंचावर प्रवेश केला. फायनलपर्यंत मुसंडी मारली. निर्णायक मॅचचा दिवस उगवला. हार्टमूटच्या आठवणीत या दिवसाचे जर्मनीभर दाटलेले तणावग्रस्त क्षण जसेच्या तसे कोरले गेले आहेत. संपूर्ण राष्ट्र दारे-खिडक्या बंद करून, प्राण एकवटून रेडिओभोवती जमलेले. आणि तो निर्णायक क्षण आला. जर्मनीने वर्ल्ड कप जिंकून दाखवला. गावातील सर्व घरांच्या दारं-खिडक्या एकदम उघडल्या. सर्व शेजारीपाजारी रस्त्यावर आले. युद्धानंतर प्रथम मोकळं मोकळं हसू, खुला खुला श्वास, वळलेल्या मुठी ‘येस वुई डीड् इट्’चा इतक्या वर्षांनंतरचा मूड, हास्यविनोद, राष्ट्रबांधणीच्या स्वप्नातले पहिले पाऊल! क्रूर, युद्धखोर आणि पराभूत राष्ट्र म्हणून लज्जेने खाली गेलेले जर्मन मस्तक पुन्हा एकवार अभिमानाने वर पाहू लागले. १९५४ चा फुटबॉल वर्ल्ड कप ही नुसती सुरुवात होती. विज्ञान, निर्यात, उद्योगजगत् या नवीन शस्त्रांनी जर्मनीने दिमाखदारपणे जगाच्या मंचावर पुन्हा एकवार प्रवेश केला. आर्यवंशशुद्धी, शस्त्रबळ हे आधार दूर सारून जर्मन सेल्फ एस्टीम- आत्मबळाचा- वेलू गेल्या ६५ वर्षांंत तंत्रज्ञान आणि निर्यात क्षेत्रातला अग्रक्रम अशा वृक्षांना आधारून वर वर जात राहिला. हार्टमूटच्या मनातला देशप्रेमाचा हा मूक आविष्कार ३० वर्षांच्या मैत्रीनंतर एका क्षणी असा हळूवार प्रगट झाला.
एरवी मात्र अजूनही देशभक्तीपर वागावे-बोलावे की नाही, त्यामुळे जग आपल्याला पुन्हा एकदा ‘हिटलरचे वंशज’ असे लेबल तर लावणार नाही ना या आंतरिक संघर्षांत जर्मन मन सतत सापडलेले दिसते.
दोन की तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आंद्रिया नावाची माईन्स युनिव्हर्सिटीची एक तरुण प्रोफेसर आहे. एका प्रोजेक्टवर आम्ही एकत्र काम करतो. मुलाला शाळेतून आणण्याची आज तिची पाळी होती. म्हणून ‘आता जाऊन येते’ म्हणून गेली. आपल्या ‘फ्लोरिआन’ या सहा वर्षांच्या गोड मुलाला शाळेतून घेऊन आली. रागाने ही फणफणलेली! चेहरा लालबुंद, एक हळवा शब्द आणि जणू अश्रूंचा ढग बरसला असता. फ्लोरिआनच्या दोन्ही गालांवर जर्मनीचा झेंडा रंगवलेला. पोरगं नुसतं खूश होतं! आंद्रियाने टॉयलेटमध्ये नेऊन त्याला खसाखसा चेहरा धुवायला लावला. ‘हे तू असं का केलंस फ्लेरिआन?’ त्याचे दोन्ही हात धरून त्याला खडसावत आंद्रिया विचारत होती. ‘मम्मा टीचरनीच पेंट करून दिलं. कारण फुटबॉल बघताना मला झेंडा हवा होता आपल्या खिडकीवर लावायला, आणि तू नको म्हणालीस’.
‘टीचरची हिंमतच कशी झाली ही असली प्रतीके माझ्या मुलाच्या गालावर रंगवण्याची!’ आंद्रियाचा रोषाग्नी आता शाळेकडे वळला. तिने फोन लावला. तिचे हे असे विद्ध होणे- तेही अशा क्षुल्लक कारणासाठी!.. ते कळायला मला काही क्षण लागले. साधारण ३५-४० शीची आंद्रिया- खरंच की! ६८ च्या क्रांतीनंतरची ही पिढी. त्या विचारधारेवर भरण-पोषण झालेली. हार्टमूटच्या जनरेशनपेक्षा कितीतरी वेगळी. हिटलरच्या नॅशनॅलीझमचे खोगीर झटकू पाहणारी आणि आपल्या पिल्लांवर ही छाया पडू नये म्हणून कटाक्षाने जपणारी.
फ्लोरिआनच्या जनरेशनला देशभक्ती या संकल्पनेमागच्या अशा परस्परविरोधी भावनिक आंदोलनांना ओलांडून स्वत:ची आयडेंटिटी शोधायची आहे आणि ते खरंच खूप मोठं चॅलेंज आहे. तो जर्मन? की युरोपियन युनियनचा नागरिक? की ग्लोबल सिटिझन? ‘कोऽहम्’ची मानवी मनाची जपमाळ आपली चालूच! जर्मनी असो की भारत!

भाषावर्ग
आता १४ मेच्या सदरातील शब्दांचा उपयोग करून आपण छोटी-मोठी वाक्ये बनवू आणि शिकू!
1) Mein (माझे) Vater (वडील) ist (आहेत) Ingenieur (इंजिनीअर)
माईन् फाटर इस्ट एंजीन्यूअर.
2) Meine (माझी) Multer (आई) ist (आहे) Journalist (पत्रकार)
माईनऽ मुटर इस्ट योर्नालिस्ट.
3) Ich (मी/मला) habe (आहे) eine (एक) Schwester (बहीण)
इश्ख् हाबऽ आईनऽ श्वेस्टर
4) Meine (माझे) Grosseltern (आजी-आजोबा) leben (राहतात, असतात)
auf dem Land. (गावाकडे, लहान खेडय़ात/ गावात)
माईनऽ ग्रोस एल्टर्न लेबन आऊफ् देम् लांड.
5) Mein (माझे) Onkel (काका/मामा) lebt (असतात/ राहतात) im Ausland (परदेशात).
माईन ओंकल लेब्ट इम् आऊसलांड.
vaishalikar@web.de