Leading International Marathi News Daily
गुरुवार । २८ मे २००९

यंग अचिव्हर्स - रग्बी हेच आयुष्य
कॅच इट.. थ्रो.. हिअर. पास द बॉल. जीव तोडून त्या सगळ्याजणी आपला खेळ उत्तम व्हावा या इष्र्येने रग्बीचा सराव करत होत्या. रग्बी हा भारतीय खेळ नाही. मुलींसाठी तर नाहीच नाही. हे दोन्ही समज खोडून काढण्याचा जणू चंगच या मुलींनी बांधला आहे. २९ आणि ३० जून रोजी थायलंड येथे होणाऱ्या आशियाई फेडरेशनच्या महिला रग्बी स्पर्धामध्ये भारतीय महिला संघ पहिल्यांदाच सहभागी होत आहे. विविध राज्यांतून आलेल्या या रग्बी टीमशी बोलताना त्यांचा निश्चय, त्यांचं खेळावरचं प्रेम प्रकर्षांने जाणवत होतं. मुंबई जिमखान्याच्या हिरवळीवर सध्या त्यांची जय्यत तयारी सुरु आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी फिजीहून उसाया हे कोच आले आहेत. या टीमने जिंकूनच परत यावं, एवढी एकच आपली अपेक्षा या सगळ्या खेळाडूंकडून आहे, असं त्यांनी ठासून सांगितलं.
काय आहे हा खेळ? यावर बोलताना सगळ्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि काय सांगू, काय नको असंच जणू त्यांना

 

झालं असल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेज वरुन जाणवलं. या खेळात प्रचंड शारीरिक क्षमता लागते. एकाग्रता आणि चपळता तर आवश्यकच आहे, पण ऐकण्याची क्षमताही अचूक असणं महत्त्वाचं आहे. या खेळाचं वेगळेपण म्हणजे, बॉलने खेळले जाणारे जे इतर खेळ आहेत, त्यात बॉल हा समोरच्या खेळाडूकडे पास केला जातो. इथे मात्र तो मागे पास करावा लागतो, ते जास्त कठीण आहे.
खेळाबद्दल अधिक माहिती देताना या टीमच्या व्यवस्थापक मोहिनी करकरे यांनी सांगितलं की, सात जणांची एक टीम व १५ जणांची एक टीम असते. सात मिनिटांचा हा खेळ असतो.
सध्या स्पर्धेसाठीचा सराव असल्याने सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा सराव सुरु आहे. इतर वेळी मात्र शाळा, कॉलेज करुन अडीच ते तीन तास सराव करतो, असं त्यांनी सांगितलं. या खेळात स्टॅमिना हा खूप महत्त्वाचा असल्याने स्प्रिंट मारण्यावर जास्त भर दिला जातो आणि त्याचबरोबर शरीराची ताकद वाढवण्यासाठीचे व्यायाम असतातच. शिवाय शिक्षा झाली तर मग जेवढय़ावेळा प्रशिक्षक सांगेल तेवढा वेळ धावणं आलंच! अर्थात हे सगळं शक्य आहे, प्रचंड मानसिक तयारी असेल तेव्हाच.
हा त्यांचा सराव सुरु असताना त्यांना स्वत:च्या चांगल्या बाजू आणि कमकुवत बाजू यांचीही चांगलीच जाण आहे. आमचा फिजिकल फिटनेस इतर देशातील खेळाडूंपेक्षा थोडा कमी आहे, पण ती कसर आम्ही आमच्या स्पीडने निश्चितच भरुन काढू शकू, असा विश्वास त्यांच्यातील एकीने व्यक्त केला.
मुंबई जिमखान्यात त्यांना सगळ्या सुविधा उत्तम प्रकारे पुरवल्या जात असल्या तरी त्या ज्या राज्यातून आल्या आहेत, तेथे मात्र प्रॅक्टीस साठी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे, रग्बी हा खेळ फारसा कोणाला माहित नसल्याने त्यासाठी मैदानेच उपलब्ध नाहीत. सगळी मैदाने क्रिकेट किंवा फुटबॉलसाठीच आहेत. आम्ही तर अनेकदा डोंगराळ भागातही खेळतो, असे एक- दोघींनी सांगितले. पण या सगळ्या गैरसोयींबद्दल त्यांची कोणाची काहीच तक्रार नाही. कारण.. त्यांचं त्यांच्या खेळावर प्रेम आहे. त्यातून त्यांना पुरेपुर समाधान मिळतय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातीय महिलांना या खेळाची ओळख करुन देण्याचं श्रेय त्यांचं आहे.
या टीममधील प्रत्येकीने ‘चक दे. इंडिया’ अर्थातच पाहिला होता. तो बघताना त्यांना त्यात आपलं प्रतिबिंब दिसत होतं. ‘चक दे’ सारखा सिनेमाने पहिल्यांदाच वुमेन हॉकीला जगासमोर आणलं आणि आम्ही ही आमच्या खेळाची ओ़ळख करुन देण्यात पहिले आहोत. हे साम्य मनाला जास्त भावलं’, अशी प्रतिक्रिया हरयाणा येथून आलेल्या नेहाने व्यक्त केली. मात्र सिनेमातील मुलींसारखं आम्ही भांडत नाही, हे ही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
क्रिकेट प्रमाणेच रग्बीलाही लोकप्रियता मिळावी, अशी त्यांना अपेक्षा आहे आणि सुरुवात तर झालीच आहे, लोक हा खेळ ओळखायला लागतील व त्यांना तो आवडेल हा आत्मविश्वासही.
दररोजच्या आयुष्यात खेळाडू असण्याचा फायदा होतो, यावर सगळ्यांनीच शिक्कामोर्तब केलं. आत्मविश्वास, स्टॅमिना, कोणत्याही परिस्थितीत तरुन जाऊ ही जाणीव काय असते ते खेळाडूलाच माहीत, असंच या रग्बी टीमच्या स्पीरीटमधून जाणवत होते. स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा.
नमिता देशपांडे

गेल्या गुरुवारच्या अंकात व्हिवाच्या पान क्रमांक चार वर ‘कन्फेशन रुम’ या सदरा अंतर्गत ‘एक खेळ जीवघेणा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखात तांत्रिक चुकांमुळे मजकूर चुकीच्या पद्धतीने छापला गेला होता. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
- संपादक