Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

विविध

राहुलच्या ‘पंच’ची विरोधकांना धडकी!
नवी दिल्ली, २७ मे / वृत्तसंस्था

राहुल गांधीनी नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या प्रतिस्पध्र्याना ‘नॉक आऊट’ केल्याचे सर्वश्रुतच आहे. परंतु राजकारणाचा पट जिंकण्यासाठी फक्त राजकीय इच्छाशक्तीच पुरेशी नसते, याचा साक्षात्कार बहुदा आता राहुल गांधी यांना झालेला दिसतोय. त्यामुळे गेली दोन महिने राहुल भारताचे पहिले द्रोणाचार्यविजेते प्रशिक्षक ओमप्रकाश भारद्वाज यांच्याकडून बॉक्सिंगचे धडे घेत आहेत.

नेट-सेटबरोबर पीएच.डी. ग्राह्य़
व्याख्याता पात्रतेसाठी ‘एम.फिल.’ची सवलत रद्द

नवी दिल्ली, २७ मे/पीटीआय

एम.फिल. झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये व्याख्याता म्हणून रुजू होण्यासाठी देण्यात येणारी सवलत विद्यापीठ अनुदान आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे आता केवळ नेट-सेट आणि पीएच.डी. झालेले उमेदवारच प्राध्यापकी करू शकणार आहेत.

पंजाब हरियाणा शांत; रेल्वे रुळावर
चंदिगड, २७ मे / पी.टी.आय.

हिंसक आंदोलनामुळे होरपळून गेलेल्या पंजाब तसेच हरियाणातील नागरिकांची आजची सकाळ उजाडली ती शांततेच्या वातावरणात. गेले दोन दिवस ठप्प झालेली रेल्वेही रुळावर आल्याने विविध स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. काही भागात जारी करण्यात आलेली संचारबंदीही तात्पुरती उठविण्यात आल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य झाले.

अणुचाचणीनंतर उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्र चाचणी..
सोल, २७ मे/ए. एफ. पी.

दोनच दिवसांपूर्वी केलेल्या अणुचाचणीनंतर उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावरून पुन्हा क्षेपणास्त्राची चाचणी केली असल्याचे वृत्त दक्षिण कोरियाच्या योन्हाप वृत्त संस्थेने दिले आहे. जपानच्या समुद्रात काल रात्री उत्तर कोरियाने लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र सोडल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी येथे दिली. द. कोरियाचा गुप्तचर विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
साम्यवादी राज्यव्यवस्था असलेल्या उत्तर कोरियाने जमिनीवरून हवेत मारा करणारी लघु पल्ल्याच्या तीन क्षेपणास्त्रांची चाचणी केली. पहिले क्षेपणास्त्र अणुचाचणीच्या दिवशीच सोमवारी सोडण्यात आले व नंतरची दोन मंगळवारी डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांचा पल्ला १३० कि. मी. असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करी सूत्रांनी सांगितले. नजीकच्या वर्षांत उत्तर कोरियाने जपानचा समुद्र किंवा पिवळ्या समुद्रात अशा अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. दरम्यान, अणुचाचणीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून उत्तर कोरियावरील दबाव वाढवण्यासाठी जपानने या देशाला करण्यात येणारी निर्यात पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जपानकडून या देशाला होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण मुळातच कमी असल्याने उत्तर कोरियावर अर्थातच या निर्णयाचा विपरित परिणाम होण्याची शक्यता नाही. उत्तर कोरियाकडून जपानमध्ये होणारी आयात त्या देशाने यापूर्वीच थांबवलेली आहे.

माईक टायसनच्या कन्येचे अपघाती निधन
फिनिक्स (अमेरिका), २७ मे / ए. एफ. पी.

माजी हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन याची चार वर्षे वयाची कन्या एक्सोडस हिचे अपघाती निधन झाले. गेल्या सोमवारी घरातील ट्रेड मिलच्या (व्यायामाचे यंत्र) केबलचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला गेला होता. तिचा सात वर्षे वयाच्या भावाने हे पाहून आईला बोलाविले तिने एक्सोडसची फासातून मुक्तता केली आणि अ‍ॅम्बुलन्स बोलावून तिला रुग्णालयात नेले मात्र ती वाचली नाही. दुसऱ्या दिवशी तिचे निधन झाले. टायसनही फिनिक्समध्ये नव्हता, तो लास व्हेगासहून सोमवारी दुपारी आला.

राजस्थानात मिग-२१ विमान कोसळले; चालक सुखरूप
जोधपूर, २७ मे/पी.टी.आय.

भारतीय हवाई दलाचे ‘बायसन’ हे मिग-२१ लढाऊ विमान आज सकाळी जोधपूरजवळ कोसळले. सुदैवाने, चालक वेळीच बाहेर पडल्याने बचावला. लढाऊ विमानास अपघात होण्याची गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. जोधपूर तळावरून नेहमीच्या सरावासाठी या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. मात्र थोडय़ा वेळातच ते लुनी या खेडय़ाजवळ एका मोकळ्या मैदानात कोसळले. या दुर्घटनेत जमिनीवरील कोणासही दुखापत झाली नाही, असे पोलीस अधीक्षक कविराज यांनी सांगितले. गेल्या १५ मे रोजी जोधपूरजवळच मिग-२७ हे लढाऊ विमान कोसळले होते. त्याआधी ३० एप्रिल रोजी जैसलमेरनजीक सुखोई हे विमान कोसळले होते. आजच्या दुर्घटनेमुळे भारतीय हवाई दलाने या वर्षांत पाच विमाने गमावली आहेत.

आँग सान सुकी यांच्या तात्काळ सुटकेची मागणी
वॉशिंग्टन, २७ मे/पी.टी.आय.

ब्रह्मदेशातील स्वातंत्र्यवादी चळवळीच्या नेत्या नोबेल शांतता पुरस्कारविजेत्या आँग सान सुकी यांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. सुकी या २००३ पासून नजरकैदेत बंद आहेत. त्यांच्या सुटकेची मागणी जगातील ज्येष्ठ नेते आणि विचारवंतांच्या एका गटाने केली आहे.

संसदपटू, माजी राज्यपाल लोकनाथ मिश्रा यांचे निधन
भुवनेश्वर, २७ मे/पी.टी.आय.
ज्येष्ठ संसदपटू आणि आसामचे माजी राज्यपाल लोकनाथ मिश्रा यांचे आज येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पुत्र, बिजू जनता दलाचे पुरी येथील खासदार पिनाकी मिश्रा व एक मुलगी आहे.
लोकनाथ मिश्रा हे १९६० ते १९७८ या काळात सलग तीन टर्मसाठी राज्यसभेचे सदस्य होते. नव्वदच्या दशकात त्यांनी आसामचे राज्यपाल म्हणून काम सांभाळले होते.

कानपूरमध्ये आयएसआयच्या संशयित हस्तकास अटक
लखनौ, २७ मे/पीटीआय

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातल्या बिठूर भागातील मंधाना गावातून आयएसआयच्या एका संशयित हस्तकाला राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आज अटक केली. त्याच्याकडून अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित काही कागदपत्रांचाही समावेश आहे.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) ब्रिजलाल यांनी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव वकास अहमद उर्फ जाहिद उर्फ इब्राहिम आहे. १७ एप्रिल २००५ रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्याला उपस्थित राहाण्याचे बहाण्याने अहमद याने वाघा सीमेद्वारे भारतात प्रवेश केला. त्याने भारतामध्ये इब्राहिम या नावाने मतदार ओळखपत्र तसेच दोन बनावट ड्रायव्हिंग लायसन्सही मिळविली होती.