Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २९ मे २००९

मनमोहन सिंग मंत्रिमंडळाचा विस्तार
विलासराव देशमुख यांच्याकडे अवजड उद्योग

नवी दिल्ली, २८ मे/खास प्रतिनिधी

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-युपीए सरकारमधील ५९ मंत्र्यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडल्यानंतर अनेकांची उत्सुकता लागून लाहिलेले खातेवाटपही आज रात्री जाहीर झाले. पंतप्रधानांनी ७९ सदस्यीय जम्बो मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले असून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे अवजड उद्योग खात्याचा परभार सोपविला आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे उर्जा तर मुरली देवरा यांच्याकडे पेट्रोलियम खाते दिले आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर हात उचलणाऱ्यांविरुद्ध हजारो हात उठतील
राज ठाकरे यांचा सणसणीत इशारा
मुंबई, २८ मे/ खास प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करून हजारो पानांचा इतिहास जिवंत करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती जो हात उचलला जाईल, त्या हाताचा बंदोबस्त करण्यासाठी हजारो हात उचलले जातील, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. शिवछत्रपतींचा पुतळा बसविण्यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या समितीवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटविण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर व विनायक मेटे यांनी प्रयत्न चालवले आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध नाही, पण अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे असावे - मेटे
मुंबई, २८ मे / खास प्रतिनिधी

मुंबईत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्षपद शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवावे. बाबासाहेबांची समितीवर निवड करण्यास आमचा विरोध नाही, असे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आज स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणासाठी जुलै महिन्यात राज्यभर उग्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. नियोजित स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नियुक्तीस काही मराठा संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

आता पेशावरमध्ये तीन बॉम्बस्फोट!
पाच ठार, १०० जखमी
इस्लामाबाद, २८ मे/पीटीआय
पाकिस्तानातील पेशावर शहर आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरले. त्यापैकी भरगर्दीच्या ठिकाणी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये पाच ठार व १०० जण जखमी झाले. पेशावर शहराबाहेर पोलिस चौकीला लक्ष्य करीत तिसरा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये किती हानी झाली याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या लाहोर येथील मुख्यालयाला लक्ष्य करीत अतिरेक्यांनी बुधवारी घडविलेल्या भीषण कारबॉम्बस्फोटात ३५ जण ठार झाले होते.

नाशिकजवळ वैमानिकरहित ‘सर्चर मार्क-१’ विमान कोसळले
नाशिक, २८ मे / प्रतिनिधी

देवळाली कॅम्पस्थित तोफखाना स्कूलमधील प्रशिक्षणादरम्यान ‘सर्चर मार्क- १’ हे वैमानिकरहित विमान आज सकाळी शहरालगतच्या वडनेर दुमाला भागात कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. विमानाच्या इंजिनात अचानक निर्माण झालेला तांत्रिक दोष या दुर्घटनेस कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना स्कुलने वर्तविला आहे. या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील वैमानिकरहित विमानांचे प्रशिक्षण तोफखाना स्कुलतर्फे दिले जाते.

चार लाख रुपयांत राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाची योजना!
संदीप प्रधान
मुंबई, २८ मे

चार लाख रुपये द्या आणि बालकाश्रम, बालसदन, अनाथालय घेऊन जा, अशी योजनाच राज्यातील आघाडी सरकारने आपल्या कार्यकर्त्यांकरिता राबविली होती, असे आता स्पष्ट होत आहे. एकदा का महिला व बालकल्याण विभागाने संस्था मंजूर केली की मग कार्यकर्त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न मिटला, अशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. महिला व बालकल्याण विभागातील काही अधिकारी बालकाश्रम, बालसदन आदी संस्था मंजूर करण्याकरिता पैशांची मागणी करतात हे सत्य आहे. त्याचप्रमाणे अशा संस्था पदरात पाडून घेतल्यावर अनुदानाच्या रुपाने मिळणाऱ्या पैशाचा स्वतच्या फायद्याकरिता वापर करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रात उदंड पीक आलेले आहे ही नाण्याची दुसरी बाजू आहे.

मुंबईत आणखी १० स्कायवॉक
मुंबई, २८ मे / प्रतिनिधी

मुंबई १० नवीन स्कायवॉक, वडाळा ट्रक टर्मिनस येथील रस्त्याचे कॉँक्रिटीकरण आणि एनसी फडके रोडवरील साईवाडी जंक्शन येथे उड्डाणपुल बांधण्यास एमएमआरडीएच्या समितीतर्फे मंजूरी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी आज या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. घाटकोपर (पू.), माहीम (पू. व प.), अंबरनाथ (पू. व प.), विक्रोळी (पू. व प.), महालक्ष्मी, खडा पारसी आणि शीव येथे हे स्कायवॉक बांधण्यात येणार आहेत. यासाठी २२२.५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या तीस वर्षांत वडाळा ट्रक टर्मिनस भागातील वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. ५.२ किमी लांबीच्या या रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करण्यासाठी ४१.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अमलीपदार्थाची कोटय़वधींची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
मुंबई, २८ मे / प्रतिनिधी

मुंबई सेंट्रल परिसरातून आज मुंबई पोलिसांनी २.१६४ किलो अंमलीपदार्थ जप्त केले. या अंमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २.११ कोटी आहे. याप्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.मोहम्मद रफीक शेख (४३), जेवीलाल जाट (३२) आणि दुर्गाशंकर गुज्जर (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून तिघेही राजस्थान येथील राहणारे आहेत. मारिया यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आज दुपारी काही लोक मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावर अंमलीपदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आला व तिघा आरोपींना अटक करण्यात आली. शेख याला २००४ मध्ये अंमलीपदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) दिल्ली येथे अटक केली होती व त्याप्रकरणी त्याला चार वर्षांचा तुरूंगवासही झाला होता. तर २००५ मध्ये एनसीबीने जाट यालाही अंमलीपदार्थाच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती.

ज्ञानदेव भोसले यांच्या मुलाला मिळणार एअर इंडियात नोकरी
मुंबई, २८ मे / प्रतिनिधी

डय़ुटीवर नसतानाही एअर इंडिया कार्गोवरील दरोडय़ात आपल्या प्राणांची पर्वा न करता दरोडेखोरांशी मुकाबला करताना मृत्युमुखी पडलेले पहारेकरी ज्ञानदेव भोसले यांच्या मुलाला आता अनुकंपा तत्वावर एअर इंडियात नोकरी मिळणार आहे. या संदर्भातील बातमी ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकात देण्यात आली होती. आज बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाकडून त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि भोसले यांच्या मुलाला एअर इंडियाच्या नोकरीत घेण्याचे आश्वासन भोसले कुटुंबीयांना देण्यात आले. एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरिवद जाधव यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भोसले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच भोसले यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर एअर इंडियात नोकरी देण्याबाबतचे ऑफर लेटरही त्यांनी कुटुंबीयांना दिले.

९१७ जिवंत काडतुसे जप्त;भंगार व्यावसायिकाला अटक
मुंबई, २८ मे / प्रतिनिधी
चोर बाजारातील राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाकडून मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी आज ९१७ जिवंत काडतुसे जप्त केले. याप्रकरणी भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी दिली. मकसूद अली खान (३१) असे या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. नागपाडा येथील ‘स्टार हॉटेल ऑफ यू पी’ येथे एक संशयित येणार असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला व खानला अटक केली. खानकडून अटकेच्या वेळी ५०० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तसेच त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी उर्वरित काडतुसे नळबाजारातील शौचालयाच्या छतावरून हस्तगत केली. ९एमएम, .२२, .३० आणि .३२ या पिस्तुलांची ही काडतुसे असून सर्व परदेशी बनावटीची असल्याचे मारिया यांनी सांगितले. खान याच्याकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात परदेशी बनावटीची जिवंत काडतुसे कुठून आली, त्याचे कोणत्या टोळीशी संबंध आहेत का, याचा तपास केला जात असल्याचेही मारिया यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी