Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

जखमी पेंटेड स्टॉर्कचे पक्षिमित्राने वाचविले प्राण
राशीन, २९ मे/वार्ताहर

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील प्राथमिक शिक्षक व पक्षिमित्र देवराम बोरुडे यांनी

 

जखमी पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक) पक्ष्याला पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविले.
हे पक्षी जानेवारीत येथे वास्तव्यास येतात. वटवृक्षावर घरटी करतात. त्यात पिल्लांना जन्म देऊन ती मोठी होईपर्यंत येथेच थांबतात. पावसाळा सुरू झाल्यावर जूनमध्ये परत जातात.
दर वर्षी उन्हाळ्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडतो. या वादळात पिल्ले खाली पडतात. खाली पडलेले पिल्लू कुत्री व मांजर यांची शिकार बनते. येथील पक्षिमित्र बोरुडे हे दर वर्षी अशा पिल्लांना वाचवतात. गावकरी झाडावरून पडलेले पक्ष्याचे पिल्लू बोरुडे यांच्याकडे देतात. त्या पिल्लांना ते वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत यांच्याकडे देतात किंवा जास्तच आजारी किंवा जखमी असल्यास दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करून ८ ते १० दिवस काळजी घेऊन ती पिल्ले आकाशात उडून जातात.
नुकतेच विकास बाळू ससाणे व सोमनाथ गोरख पवार या विद्यार्थ्यांनी पेंटेड स्टॉर्क पक्ष्याचे पिल्लू बोरुडे यांच्याकडे आणून दिले. हे पिल्लू जास्त जखमी असल्याने त्यांनी त्याला पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात राजेश शिर्के यांच्या स्वाधीन केले. डॉ. गौरव परदेशी यांनी त्याच्यावर उपचार केले. या पक्ष्याबरोबरच येथे ग्रे हेरॉन (राखी बगळा) या पक्ष्याचीही वीण वसाहत आहे. हे दोन्ही प्रकारचे पक्षी उंदिर, मासे, खेकडे, बेडूक, टय़ुबी फ्लेक्स, कीटक खातात. त्यामुळे हे पक्षी पर्यावरणाचे रक्षक आहेत, असे बोरुडे यांनी सांगितले.