Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

जमिनीच्या वादातून दलित कुटुंबास मारहाण
भांबोऱ्यात १९जणांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’
कर्जत, २९ मे/वार्ताहर
तालुक्यातील भांबोरे येथे शिवाजी पोपट रंधवे या तरुणास व त्याच्या कुटुंबाला जातीवाचक

 

शिवीगाळ व जबर मारहाण करून त्यांचे राहते छप्पर पेटवून दिले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी या प्रकरणी १९जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी पोपट रंधवे व बापू बाजीराव गिरी यांच्यात जमिनीवरून वाद आहे. हा वाद न्यायालयात गेला आहे. मात्र, आज साडेदहा वाजता शिवाजी पोपट रंधवे (वय २३), सुभाष रंधवे, सुरेश रंधवे हे त्यांच्या राहत्या छपरात बसले होते. तिथे बापू बाजीराव गिरी, सुदाम बाजीराव गिरी, पिंटू गिरी, मारुती गोसावी, विजय गोसावी, राजेंद्र गोसावी, नवनाथ गोसावी, बापू गोसावी, राजेंद्र भारती, पोपट भारती व इतर असे एकूण १९जण हातात काठय़ा व कुऱ्हाड घेऊन आले. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत शिवाजी रंधवे, सुभाष रंधवे व सुरेश रंधवे यांना आमच्याविरुद्ध कोर्टात केलेली केस काढून घ्या, असे म्हणून जबर मारहाण केली. त्यानंतर छप्पर पेटवून दिले. या आगीत काही कोंबडय़ा व अन्नधान्य असा २० हजारांचा ऐवज जळाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
रंधवे कुटुंबास मारहाण करणाऱ्या १९जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कर्जत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक केलेली नव्हती.