Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यातील मंदिरांसाठी परिसर विकास प्राधिकरण - विखे
राहाता, २९ मे/वार्ताहर

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या राज्यातील सर्वच धार्मिकस्थळांवर सरकारचे नियंत्रण

 

असावे, अशी सरकारची भूमिका असली, तरी यामध्ये मंदिर ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करतानाच भाविकांकडून येणाऱ्या निधीचा विनियोग मंदिर परिसर विकासासाठी व्हावा, याकरिता सर्व देवस्थानांनी परिसर विकास प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना आपण करणार असल्याची माहिती विधी व न्याय खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
विविध धार्मिकस्थळांमुळेच या राज्याचा सांस्कृतिक वारसा समृद्ध होण्यास मदत झाली आहे. हे राज्य वैचारिकदृष्टय़ा समृद्ध घडविण्यात संतांचे मोठे योगदान असल्याने राज्यातील प्रत्येक महसुली विभागात असलेल्या छोटय़ा-मोठय़ा धार्मिकस्थळांचा विकास प्राधान्याने करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे श्री. विखे म्हणाले.
धर्मादाय आयुक्तांच्या ८ विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच धार्मिकस्थळांची माहिती एकत्रित करण्याच्या कामाला आपण गती दिली आहे. आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या सर्वच धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांचे वाद तातडीने निकाली काढण्याची सूचना आपण केली आहे.
भाविकांकडून मिळणाऱ्या निधीचा उपयोग मंदिर परिसर विकास आणि भाविकांच्या सुविधांसाठी व्हावा ही अपेक्षा असते. परंतु विश्वस्तांकडून हे होत नसल्यानेच धार्मिकस्थळांची दुरवस्था वाढल्याचे चित्र आहे. म्हणूनच सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन याबाबत निश्चित असे धोरण येत्या महिनाभरात आपण ठरविणार असल्याचे श्री. विखे यांनी सांगितले.
मंदिर परिसर विकासासाठी स्थानिक संस्थांची मदत घेण्याबाबत विकास प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना आपण मंदिराच्या विश्वस्तांना करणार आहोत. शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी सोहळ्यास २०१८ साली शंभर वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या गुरुगद्दी सोहळ्याप्रमाणेच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. नांदेड येथे विकासकाम केलेल्या एजन्सीमार्फतच शिर्डी परिसरात कामाचा प्रारंभ गुरूपौर्णिमेला करण्याचा विचार असून, याबाबतचा प्रस्ताव संस्थानने तातडीने सरकारकडे पाठविण्याच्या सूचना आपण केल्याचे श्री. विखे यांनी सांगितले.