Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

१३ आरोपींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
नगर तालुका दूध संघ अपहार
नगर, २९ मे/प्रतिनिधी
नगर तालुका दूध संघातील २ कोटींच्या अपहार प्रकरणातील १३ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी

 

आज न्यायालयात अर्ज दिला. या अर्जांवर युक्तिवाद झाला, परंतु निर्णय झाला नाही. न्यायालय तो उद्या (शनिवारी) देण्याची शक्यता आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात आरोपी असलेले दूध संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष बापू कोठुळे, संचालक माजी खासदार दादापाटील शेळके, दादा चितळकर, रामदास शेळके, किसन बेरड, संजय जगताप, किसन मगर, केशव अडसुरे, भीमराज लांडगे, बाळासाहेब बोठे, गोवर्धन शिंदे, सुमन पालवे, तुळसाबाई काळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांमार्फत अर्ज सादर केले.
आरोपींचे वकील माणिक मोरे, संभाजी ताके, शेळके यांनी युक्तिवाद केला. या अपहारास तत्कालीन प्रशासन जबाबदार आहे. अपहाराबाबत कोणतीही माहिती संचालकांच्या बैठकीत देण्यात आली नव्हती. दि. २९ जुलै २००५ रोजी संचालकांची बैठक झाल्यानंतर शेवटची बैठक २४ नोव्हेंबर २००७ रोजी झाली. मधल्या काळात अपहार झाला असावा. त्यामुळे त्याला संचालक मंडळास जबाबदार धरणे योग्य नाही, असा युक्तिवाद वकील माणिक मोरे यांनी केला. न्यायालयाने लगेचच निर्णय दिला नाही. तो उद्या होण्याची शक्यता आहे.
नगर तालुका दूध संघात १ एप्रिल २००५ ते २४ नोव्हेंबर २००६ या काळात २ कोटी २ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद बुधवारी जिल्हा विशेष लेखा परीक्षक संजय पाटील यांनी तोफखाना ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच अधिकारी, संचालक अशा २२जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे नगर तालुक्यात मोठी खळबळ उडाली. हा दूध संघ सध्या बंद आहे.