Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

कुकडी पाणीप्रश्नी आज पुन्हा ‘रास्ता रोको’
श्रीगोंदे, २९ मे/वार्ताहर

कुकडी कालव्यातून पिण्यासाठी कमी क्षमतेने पाणी सोडल्याने शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याचे

 

स्पष्ट झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पिंपळगाव जोगेतून येडगाव धरणात पाणी सोडावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून झालेले प्रयत्नही असफल ठरल्याने व येडगाव धरणातील पाणीसाठा जलद गतीने कमी होत असल्याचे पाहून उद्या (शनिवारी) पुन्हा एकदा आवर्तनासाठी लोणी व्यंकनाथ येथे रास्ता रोको आंदोलन शेतकरी करणार आहेत.
श्रीगोंद्यातील कुकडीखालील शेतकऱ्यांच्या वाढता आक्रमकपणा पाहून पाटबंधारे विभागाने केवळ कालव्यातून पाण्याचा शिडकावा लोकांवर मारण्याचा प्रयत्न केला. येडगावमधून आठ दिवसांपूर्वी पाणी कालव्यात सोडण्यात आले. मात्र, हे आवर्तन शेतीसाठी आहे की पिण्यासाठी, याची निश्चित खबर लोकांना संबंधितांनी लागू दिली नाही. मात्र, पाणी कालव्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्यावेळी वितरिकांचे दरवाजे उघडले, तरीही पाणी वितरिकांमध्ये जात नसल्याने हे पाणी केवळ पिण्यासाठी आहे, शेतीसाठी नाही हे शेतकऱ्यांना समजले.
कालव्यातील हे पाणी आज कि. मी. १५५पर्यंत गेले. अजून १० कि. मी. तालुक्यातील हद्द असून नंतर कर्जत तालुक्यात हे पाणी जाणार आहे. पण धरणामधील पाण्याची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. कारण येडगाव धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. पाणी सोडतेवेळी धरणात ५४० दशलक्ष घनफूट पाणी होते. आज २७० दशलक्ष घनफूट पाणी आहे. डिंबे धरणातून ६०० क्युसेकने सोडलेले पाणी येडगावमध्ये ४५० क्युसेकने पोहचते. मात्र, त्याच वेळी येडगावमधून कालव्यात ८०० क्युसेक पाणी सोडले जाते. आता येडगावमध्ये आरक्षित साठा ठेवावा लागणार असल्याने आवर्तन कुठल्याही क्षणी बंद करावे लागणार आहे.
आता सगळी परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने लोणी व्यंकनाथ येथील नगर-दौंड रस्त्यावर उद्या (शनिवारी) ९ वाजता पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. श्रीगोंदे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हिरवे व अमृत पितळे, माजी संचालक रावसाहेब काकडे, बेलवंडीचे माजी सरपंच दिलीप रासकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल, असे सांगण्यात आले.
बेणकेंपुढे हात टेकले
पिंपळगाव जोगेतील ५ टीएमसी अचल साठय़ातील पाणी येडगावमध्ये सोडावे, यासाठी कृष्णा खोरेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी आदेश केले. मात्र, उपाध्यक्ष वल्लभ बेणके मात्र हे पाणी सोडू नये, यासाठी अडून बसले. आजपर्यंत तरी सरकारनेही त्यांच्यापुढे हात टेकल्याचे दिसते.