Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

अखेर निघोजमध्ये अतिक्रमण हटविले
पंचवीस दुकाने काढली
निघोज, २९ मे/वार्ताहर
येथील एसटी बसस्थानक परिसरातील २५ अतिक्रमित दुकाने सार्वजनिक बांधकाम खात्याने

 

काढली. या कारवाईने दुकाने थाटणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेली पंधरा ते सोळा वर्षांपासून सार्वजनिक बांधकामच्या जागेवर हे अतिक्रमण झाले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही कारवाई चालू होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी बारभाई, विलास ठुबे, तहसीलदार गोविंद शिंदे, नायब तहसीलदार शेटे, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सुरेश चिंचोडीकर यांच्या नेतृत्वाखाली २५जणांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
जागा माझीच आहे, असे सांगून या दुकानदारांकडून काही लोक भाडे वसूल करीत होते. अनामत रक्कम दहा ते पंधरा हजार रुपये, तसेच पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाडे वसूल केले जात होते. ही जागा कोणाची याबद्दल हे दुकानदार अनभिज्ञ होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या सर्वच अनधिकृत दुकानदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली. त्या वेळी या जागेचे गौडबंगाल समजले. परंतु ही जागा आपलीच आहे. कुणीही येणार नाही, असे खोटे सांगून ही भाडेवसुली सुरू होती. ‘लोकसत्ता’ने हा प्रकार उजेडात आणून लक्ष वेधले होते.
आज सकाळी आठ वाजता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या दुकानदारांना पूर्वसूचना दिली आणि दुकाने हटवण्यात आली. आणखीन काही दिवसांची मुदत द्या, अशी विनंती या दुकानदारांनी केली. मात्र, तीन नोटिसा दिल्या असून, आता मुदतवाढ नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मग मात्र काही तासांची मुदत या दुकानदारांनी मागितली. नंतर मजुरांच्या साहाय्याने दुकानातील सामान हलविण्यात आले. या दुकानदारांनी ही दुकाने पक्क्य़ा बांधकामात बांधली नसली, तरी किमती पत्रे, प्लायवूड आणि फर्निचर असल्याने मोठय़ा प्रमाणात त्यांचे नुकसान झाले.
सरपंच गीताराम कवाद आणि सदस्यांनी ही अतिक्रमणे काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच ग्रामपंचायतीचा ठरावही संबंधित खात्याला दिला होता. काही महिन्यांपूर्वी येथील भैरवनाथ दूध संस्थेचे रस्त्यावरील अतिक्रमण स्वत तोडून सरपंच कवाद यांनी काढले होते. ग्रामस्थांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले. ‘भैरवनाथ’चे कवाद यांनी गावातील इतर अतिक्रमणे काढण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर कवाद यांनी हे आव्हान स्वीकारून बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे संबंधित खात्याला हटविण्यास भाग पाडले, अशी चर्चा आहे. आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने अशी धाडसी भूमिका घेतली नाही. आजच्या कारवाईत पारनेर-शिरूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. निघोज ग्रामीण पतसंस्थेच्या कंपाऊंडसह २५ दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. पुढील कारवाईत कान्हूरपठार पतसंस्थेच्या नवीन इमारतीचा काही भाग, तसेच पंचवीस ते तीस दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. आळेफाटा ते शिरूर या रस्त्यावर अलिकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे काढणे गरजेचे होते.