Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

दूध दरवाढ न केल्यास रस्त्यावर उतरू - डेरे
पारनेर, २९ मे/वार्ताहर

दूधदरासंदर्भातील राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य दूधउत्पादक दूध

 

व्यवसायापासून दूर झाला आहे. त्यामुळे राज्यात सुमारे ६ लाख लिटर दूध कमी झाले आहे. दुधाला प्रतिलिटर ६ रुपये दरवाढ द्यावी; अन्यथा दूधउत्पादक रस्त्यावर उतरतील, असा इशारा दूधउत्पादक कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जनावरांचा चारा, पशुखाद्य, औषधांचे दर गेल्या काही वर्षांंत दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनखर्चात मोठी वाढ झाली आहे. नगर येथील गोरक्ष पांजरपोळ संस्था व राहुरी कृषी विद्यापीठाने दूध उत्पादनखर्चाचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यानुसार दूध उत्पादनखर्च मजुरी वजा जाता प्रतिलिटर १६ रुपये पन्नास पैसे इतका येतो. सरकार मात्र प्रतिलिटर १० रुपये पन्नास पैसे दर देते.
वारंवार मागणी करूनही सरकार दुधाची दरवाढ करीत नाही. त्यामुळे दूधउत्पादकांनी दूध व्यवसायाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली. परिणामी राज्यात विशेषत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांत सुमारे सहा लाख लिटर दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
दुधाच्या मागणीतील तूट भरून काढण्यासाठी दुधात मोठय़ा प्रमाणावर भेसळ करण्यात येत असून, भेसळयुक्त दुधामुळे महानगरांतील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे डेरे यांनी लक्ष वेधले आहे.
दुधाची टंचाई जाणवू लागल्यावर खासगी दूध व्यावसायिकांनी दूधखरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया २० पैसे वाढ केली. त्यामुळे सहकारी दूध संघ व दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास सहकारी दूध संघ व सहकारी तत्त्वावरील दूध व्यवसायाचे कंबरडे मोडेल. सहकार बंद पडल्यास खासगी व्यावसायिकांची मनमानी सुरू होईल. परिणामी संपूर्ण राज्यातील दूधउत्पादक आर्थिक अडचणीत येऊन कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचे प्रकार वाढतील, असा इशारा डेरे यांनी दिला आहे. दुधाचे दर दुधामधील स्निग्धांश (फॅटस्) व स्निग्धेतर घटक (एसएनएफ) यावर आधारित न ठेवता दुधातील प्रोटिन्स व स्निग्धांश यावर ठरावावेत. त्यामुळे भेसळीला आळा बसेल, असे पत्रात म्हटले आहे. येत्या आठ दिवसांत दूध दरवाढीसंदर्भात निर्णय न झाल्यास दूधउत्पादक रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा डेरे यांनी पत्रात दिला आहे.