Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

टाकळी ढोकेश्वर पाणीयोजनेसाठी ६१ लाखांचा निधी वर्ग
पारनेर, २९ मे/वार्ताहर

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी ६१ लाखांचा निधी वर्ग झाल्याने

 

पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जि. प. उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सरपंच लता आल्हाट, उपसरपंच रावसाहेब झावरे, मोहन रांधवण, शिवाजी बेलकर, शाखा अभियंता कचरे, श्री. वानखेडे उपस्थित होते.
सन १९८७मध्ये टाकळी ढोकेश्वरला पाणीयोजना झाली. मात्र, योजना जुनी झाल्याने योजना सदोष असल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी झावरे यांच्या विशेष प्रयत्नातून भारत निर्माण योजनेंतर्गत १ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या मंजूर होऊनही काम पूर्ण करण्यास अडथळा ठरत होता. दरम्यान, ही योजना जि. प. पातळीवर होऊ शकत नसल्याने या योजनेसाठी जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झावरे यांनी तालुक्यात सर्वात मोठय़ा म्हणजे ६१ लाख रुपये खर्चाच्या योजनेचा प्रश्न मार्गी लावला.
या वेळी बैठकीमध्ये वासुंदे भारत निर्माण योजना पूर्ण झाली असली, तरी त्यामधील वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून योजना मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार आहे. शिवाय गेले अनेक महिने यशवंत ग्रामसमृद्धी अंतर्गत भूमिगत गटार योजनेतील चालू असलेले रेंगाळलेले काम ग्रामस्थांनी चर्चा करून एकमुखाने मार्ग काढला. आठ दिवसांत काम सुरू करणार आहे. संबंधित ठेकेदारास उपाध्यक्षांनी तंबी दिली.
दरम्यान, या वेळी बंधाऱ्याची उंची वाढविण्याचीही मागणी पूर्ण होऊन धुमाळ वस्तीवरील जुना गाव तलाव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे, असेही श्री. झावरे यांनी सांगितले.