Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

हक्काच्या शेती पाणीप्रश्नासाठी एकत्रित प्रयत्न करा - कोल्हे
राहाता, २९ मे/वार्ताहर

शहरी औद्योगिकीकरणामुळे गोदावरी कालव्याच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या या परिसराचे पाणी

 

कमी होत असून, हक्काच्या शेती पाणीप्रश्नासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. वेळ पडल्यास लढा उभारावा लागेल, असे प्रतिपादन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी केले.
पुणतांबे परिसरातील शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावी, यासाठी येथे कोपरगाव शेतकरी संघाच्या सहाव्या शाखेचा प्रारंभ झाला. त्या वेळी श्री. कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष गंगाधर चौधरी होते. या वेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नारायण कार्ले, उपाध्यक्ष शिवाजी लहारे, ‘संजीवनी’चे संचालक बाळासाहेब वक्ते, कैलास माळी, श्रीपत गवळी, माणिक वहाडणे उपस्थित होते.
श्री. कोल्हे म्हणाले की, या भागात मुख्य शेती व्यवसाय होता. उत्पन्नही चांगले होते. परंतु पाणी, शास्त्रशुद्ध शेती पद्धतीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नवनवीन योजना सुरू करण्याचा प्रयत्न असून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गोदावरी कालवे दुरुस्ती, हक्काचे पाणी यासाठी जलसंपदामंत्री अजित पवार, अर्थमंत्री दिलीप वळसे यांची भेट घेऊन पाठपुरावा करू. वेळ पडल्यास मोठा लढा उभारून शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही कोल्हे यांनी सांगितले. या वेळी वकील आर. एम. डोखे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव वहाडणे, सर्जेराव जाधव, ‘गणेश’चे संचालक भाऊसाहेब चौधरी, सोपान धनवटे, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष अंबादास देवकर यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धनंजय जाधव यांनी, तर सूत्रसंचालन सर्जेराव जाधव यांनी केले. शेतकरी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी आभार मानले.