Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

इंग्लिश मीडियम स्कूलची प्रवेश प्रक्रिया अपूर्ण
राहाता, २९ मे/वार्ताहर

संस्थान अधिकाऱ्यांची मनमानी, स्थानिक राजकीय हस्तक्षेप व चुकीच्या निकष पद्धतीमुळे

 

साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मीडियमची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावेल, अशी भीती संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी व्यक्त केली.
केवळ कुणाला नाराज करायचे नाही म्हणून प्रवेश देऊन वर्ग वाढविण्यात येत आहेत. मात्र, वाढलेल्या वर्गाना बसायला खोल्या नाहीत याचा विचार होत नाही, असे सांगून संस्थानच्या ढासळलेल्या प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करताना डॉ. गोंदकर म्हणाले की, गेल्या महिन्यात संस्थान रुग्णालयाच्या परिचारिकांना बढतीच्या ऑर्डर्स देण्यात आल्या. मात्र, त्यांना अद्यापही नियुक्तया देण्यात आलेल्या नाहीत. नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही महिना महिना खाते दिले जात नाही. मुळातच कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षा व कामच निश्चित नसावे, असे सांगून डॉ. गोंदकर यांनी व्यवस्थापन मंडळाच्या निर्णयानंतरही प्रशासन अंमलबजावणीत दिरंगाई करत असल्याचा आरोप केला. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या प्रसादालयाचे काम सदोष असून, आताच फरशा फुटायला सुरुवात झाली आहे. सदोष काम करणारा कॉन्ट्रॅक्टर व देखभाल करणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची मागणीही डॉ. गोंदकर यांनी केली. संस्थान प्रसादालयाला सध्या कर्मचाऱ्यांची गरज आहे.
साईबाबा संस्थानचे विश्वस्त व या मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे सध्या शालेय शिक्षण विभागाचे मंत्रिपद आहे. त्यांनी शिर्डीतील जिल्हा परिषद शाळा संस्थानकडे हस्तांतरित करून घ्यावी व संस्थानच्या शाळांनाही सरकारी अनुदान सुरू करावे, अशी मागणीही डॉ. गोंदकर यांनी केली आहे.