Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

सीनापात्रातील वीटभट्टय़ाकाढण्यास मुदत देण्याची मागणी
प्रशासन अतिक्रमण हटविण्यावर ठाम
नगर, २९ मे/प्रतिनिधी

सीना नदीच्या पात्रात असलेल्या वीटभट्टय़ा काढून घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी, अशी

 

मागणी वीटभट्टीमालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. प्रशासनाने मात्र यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.
आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली वीटभट्टीमालकांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. सीना नदीच्या पात्रात गेल्या ४०-५० वर्षांपासून वीटभट्टय़ा आहेत. त्यावर सुमारे हजार-बाराशे मजूर उपजिविका करतात. वीटभट्टय़ा हटविल्या तर या गरीब मजुरांच्या पोटावर मारल्यासारखे होईल. बरेच वीटभट्टीमालक स्वतच्याच जागेत व्यवसाय करीत आहेत. वीटभट्टीमालकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता यापूर्वी वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान करण्यात आले, अशी तक्रार करण्यात आली.
प्रशासनाने अतिक्रमण विरोधी विभाग व भूसंपादन यांच्याकडून सीना नदीच्या पात्राचे मोजमाप करून खुणा निश्चित कराव्यात, तसेच वीटभट्टीमालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तथापि, जिल्हा प्रशासनाने त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. सीनापात्रातील वीटभट्टय़ांचे अतिक्रमण हटविण्यावर प्रशासन ठाम आहे. आज महापालिका व महसूल विभागानेही अतिक्रमण हटविण्याची जय्यत तयारी केली होती. मात्र, वीटभट्टीमालकांचे शिष्टमंडळ भेटल्याने आज तरी कारवाई होऊ शकली नाही. शिष्टमंडळात शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, प्रकाश भागानगरे, मनोज चव्हाण, अनिल बोरुडे आदींचा समावेश होता.