Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

जि. प. कर्मचाऱ्यांचे सोमवारी बोंबाबोंब आंदोलन
नगर, २९ मे/प्रतिनिधी

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी जि.

 

प. कर्मचारी युनियन सोमवारी (दि. १) काळी फीत लावून बोंबाबोंब आंदोलन करणार आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सोपानराव मुळे यांनी ही माहिती दिली.
निवेदनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के व सचिव एम. पी. कचरे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देण्याचे आदेश काढले. मात्र, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, स्थानिक पूरक भत्ता जुन्या दरानेच मंजूर केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम जास्तीत जास्त ३ टप्प्यांत अदा करावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शैक्षणिक भत्ता, अपंग कर्मचाऱ्यांसाठीचा विशेष भत्ता मिळावा, केंद्राप्रमाणे स्त्री कर्मचाऱ्यांना प्रसूती व बाळाच्या काळजीसाठी रजा मिळावी, सरेंडर रजेचा लाभ पूर्वीप्रमाणे मिळावा, २८ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित मिळावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात जि. प. कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.