Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 


राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे

भारतीय समाजाला स्त्री आणि राजकारण हे समीकरण काही नवं नाही. या समीकरणाने भारतीय समाजमनावर मोठा ठसा उमटविला आहे. आधीच्या पिढीतील राजकारणी महिलांनी भारतीयांच्या मनात आदराचे स्थान पटकावले आहे. वानगीदाखल नावं घ्यायची तर झाशीची राणी, चांदबीबी, अहिल्याबाई होळकर, जिजाबाई.. या स्त्रियांनी यशस्वीपणे राजकारण केलं आणि आदर्श धडेही घालून दिले, जे राजकीय मंडळींना आजही मार्गदर्शक ठरतील. तरीही मधल्या काळात स्त्री आणि राजकारण या समीकरणाकडे जरा

 

संशयानंच पाहिलं गेलं. शिक्षणाची कास धरत स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला, परंतु राजकारणाचं क्षेत्र त्यांच्यापासून काहीसं दूरच राहिलं. पुरुषी मानसिकता हेच त्यामागचं मूळ कारण होते.
७३ व्या घटनादुरुस्तीमुळे १९९३ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळालं. संसदेत हे बिल अद्याप पारीत झालेलं नाही. येत्या अधिवेशनात ते संमत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर संसदेतही महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढू शकेल.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंधराव्या लोकसभेत दहा-वीस नव्हे तर तब्बल ५९ महिला खासदार निवडून आल्या आहेत. देशभरात एकूण ५५६ महिला उमेदवार उभ्या होत्या. त्यातून ५९ जणी विजयी झाल्या. यात सर्वात जास्त कॉंग्रेसच्या म्हणजे २३ महिला खासदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीच्या १३, तर तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी याच्या प्रत्येकी चार महिला खासदार निवडून आल्या आहेत. जनता दल युनायटेड, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन महिला खासदार निवडून आल्या आहेत. तेलंगाणा राष्ट्रीय समिती, राष्ट्रीय लोक दल, शिवसेना, डीएमके याची प्रत्येकी एक महिला खासदार निवडली गेली आहे. देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त म्हणजे एकूण १३ महिला खासदार निवडून आल्या आहेत. तर पश्चिम बंगालमधून एकूण सात खासदार निवडून आल्या आहेत. आश्चर्य म्हणजे साक्षरतेत देशात सर्वात पुढे असलेल्या केरळमधून मात्र एकही महिला निवडून आलेली नाही. तमिळनाडूतूनही फक्त एकाच महिला खासदाराला निवडून येण्यात यश मिळाले आहे. महाराष्ट्रातून फक्त तीन खासदार निवडून आल्या आहेत. या तिन्ही महिला खासदार सुशिक्षित व तरुण आहेत.
मागील लोकसभांचा आढावा घेता चौदाव्या लोकसभेमध्ये एकूण ४५ महिला खासदार निवडून आल्या होत्या. तेराव्या लोकसभेत हीच संख्या ४९ इतकी होती. सहाव्या लोकसभेत (१९७७- ८०) महिला खासदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे ३.८ टक्के इतकीच होती. पहिल्या लोकसभा निवडणुकीत ती (१९५२-५७) ४.४ टक्के इतकी होती.
नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे मागच्या काही काळात लाकसभेत वयोवृद्ध महिला खासदारांची संख्या कमी होऊन, तरुण महिला खासदार अधिकाधिक पुढे येत आहेत. ४० वर्षांहून कमी वयोगटातील महिला खासदारांचे प्रमाण आहे २९.३० टक्के, ४० ते ६० वयोगटातील टक्केवारी ५६.९० टक्के, ६० वर्षांहून अधिक वयोगटातील महिला खासदारांची टक्केवारी १३.८० टक्के इतकी आहे.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठविणे, स्वत:च्या मतदार संघातील कळीचे मुद्दे सोडविण्याचे प्रयत्न करणे असे अनेक प्रष्टद्धr(२२४)्ना या महिला खासदारांच्या प्राधान्य यादीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंधराव्या लोकसभेत तरुण खासदार निवडून येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातही कौतुकाच्या ठरल्या आहेत त्या तरुण महिला खासदार. त्यातही विशेष कुतुहलाच्या ठरल्या आहेत त्या स्वबळावर निवडून आलेल्या महिला खासदार मीनाक्षी नटराजन. मौसम नूर, मिनाक्षी नटराजन, ज्योती मिर्धा, श्रुती चौधरी, सुप्रिया सुळे, प्रिया दत्त, अगंथा संगमा यांना राजकीय कौटुंबिक पाश्र्वभूमी आहे. तरीही या महिलांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. लोकसभेत केवळ शोभेची बाहुली म्हणून बसण्यात त्यांना रस नाही. देशातील अनेक प्रष्टद्धr(२२४)्नाांबाबत, त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीबाबत त्या आग्रही आहेत. एक व्यक्ती म्हणून आपल्याला स्वत:चा आवाज आहे, मते आहेत आणि ती मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे याबाबत त्या जागरूक आहेत.
मध्यप्रदेशातील मंदसौरमधूान निवडून आलेल्या मीनाक्षी नटराजन या राजकारणाची ओढ असलेल्या खासदार. त्या कायद्याच्या अभ्यासक आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच त्यांची जीवनशैली आहे. आपण खासदार झालो म्हणून स्वत:च्या मागेपुढे नुसता संरक्षकांचा गोतावळा ठेवण्यात त्यांना रस नाही. रिक्षा, बस अशा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं त्या पसंत करतात. लोकप्रतिनिधीने नम्र आणि सेवाभावी असावं, आणि जनतेनेही लोकप्रतिनिधींना ‘विशेष’ वागणूक देऊन उगाचच त्यांचे महत्त्व वाढवू नये असे त्यांना वाटते. त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली विद्यार्थी दशेतच. एनएसयुआय या कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘कोअर टीम’मध्ये समावेश केल्यानंतर मीनाक्षी नटराजन प्रकाशझोतात आल्या. मंदसौरमधून १९८४ पासून कॉंग्रेसचा एकही खासदार निवडून आला नव्हता. मीनाक्षी यांनी मात्र ही जागा कॉंग्रेसला मिळवून देण्याचा करिष्मा केला. त्यांनी म्हटल्यानुसार, मतदारसंघातील लोकांना मुबलक पाणी पुरविण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले ८० वर्षांचे भाजपाचे लक्ष्मीनारायण पांडे यांच्या विषयीही मीनाक्षी वावगे शब्द न उच्चारता आदराने बोलतात, त्यामुळे त्यांचा सुसंस्कृतपणा ठसठशीतपणे दिसतो. पांडे यांनीही निवडणूक प्रचारावेळी वैयक्तिक आरोप न करता विकास मुद्द्यांवर निवडणूक लढविली म्हणून त्यांच्या-माझ्यातील लढत ही आदर्श आणि चुरशीची होती, असे मीनाक्षी म्हणतात. बाब आमटे, अण्णा हजारे, सुंदरलाल बहुगुणा यांना त्या आदर्शस्थानी मानतात.
पश्चिम बंगालमधून निवडून आलेल्या मौसम नूर या अवघ्या २८ वर्षांच्या खासदार. येथील घनीखान घराण्यातल्या. घरची राजकीय पाश्र्वभूमी असली तरी कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे.
श्रुती चौधरी याकॉंग्रेसच्या नेत्या किरण चौधरी यांची मुलगी व बन्सीलाल यांची नात. अवघ्या ३३ वर्षांच्या. राजकारण हे जनसेवेचं उत्तम माध्यम आहे, त्यामुळे ते गांभीर्यानं करावं असं वकिली पेशातल्या श्रुती सांगतात.
बारामतीमधून निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत राजकारणात केवळ शरद पवार यांची मुलगी म्हणून न वावरता महिलांसाठी काम करतानाच शिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे.
वाशिम येथून खासदार म्हणून निवडून आलेल्या भावना गवळी यांनी सव्वीसाव्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक १९९९ मध्ये लढविली. राजकारणाच्या माध्यमातून आपण देशासाठी बरेच काही करू शकतो याची जाणीव त्यांना झाली. यंदा त्या पुनश्च निवडून आल्या आहेत.
भारतीय राजकारणात इंदिरा गांधी हे महत्त्वाचं नाव. (पुरुष राजकारण्यांच्या तुलनेतही उजवंच!) एक धडाडीच्या नेत्या म्हणून त्यांची ख्याती होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही दबदबा होता. राजकारणात आल्यावर त्यांनाही सुरूवातीला ‘गुंगी गुडिया’ असं विशेषण लावलं गेलं. पण कुठल्याही विरोधाला न जुमानता मुसद्दीपणे त्यांनी सत्ता स्वत:च्या हातात ठेवण्याचं धाडस दाखवलं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर बिथरलेल्या कॉंग्रेस पक्षामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. अगदी सहज चालून आलेल्या पंतप्रधानपदाला नकार देऊन भारतीय राजकारणात एक आदर्शच निर्माण केला. मीरा कुमार, नजमा हेपतुल्ला, ममता बॅनर्जी, वृंदा करात, सुषमा स्वराज, मायावती, जयललिता अशा काही स्त्रियांनी सध्याच्या भारतीय राजकारणावर स्वत:चा ठसा उमटविला आहे.
संसदेत महिलांना आरक्षण नसताना यंदा प्रथमच दहा टक्क्यांहून अधिक जागांवर महिला खासदार बसणार आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना स्त्री-मुक्ती संघटनेच्या नेत्या शारदा साठे म्हणाल्या की, स्वत:हून राजकारणात येऊन ५९ महिला खासदार निवडून आल्या आहेत. परतु ही संख्या आणखी वाढायला हवी. आज अनेक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर दिसतात. स्त्रियांची क्षमता वाढलेली आहे. या क्षमतेचं चीज राजकारणातही व्हायला हवं. त्यासाठी त्यांचा राजकीय पक्षांमधील सहभाग वाढायला हवा. भ्रष्टाचार, गुंडाराज म्हणजे राजकारण हे राजकारणाशी दृढ झालेलं समीकरण पुसून विधायक राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकण्यात महिला खासदार महत्त्वाचं योगदान देऊ शकतात. अधिकाधिक महिलांनी आता राजकारणाकडे करिअर या दृष्टीने पहायला हवं. राजकारण हाही एक अभ्यासाचा विषय आहे, हा विचार रूढ व्हायला हवा. राजकारणात महिलांना आरक्षण मिळाल्यास त्यांना अधिक संधी उपलब्ध होतील. गेली काही वष्रे संसदेत महिला विधेयक संमत होऊ शकले नाही, कारण महिलांच्या राजकारणातील प्रवेशाला समाजाचा नव्हे तर काही पुरूष लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. आता येत्या अधिवेशनात तरी हे विधेयक संमत होण्याची अपेक्षा करूया. सर्वसामान्य लोकांचा मात्र महिला प्रतिनिधींना विरोध नाही. अन्यथा इतक्या महिला निवडूनच आल्या नसत्या. स्त्रियांच्या राजकारणातील सहभागामुळे सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही बदल होऊ शकतो हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेत्यांनी सिद्ध केले आहेच.
लता दाभोळकर
latadabholkar@gmail.com