Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

पण बोलणर आहे! - चटक
एका स्नेह्य़ांकडे गेले होते. स्नेही उच्चभ्रू, आर्थिक सुस्थितीतले, देशपरदेश सतत लीलया फिरणारे असे होते. त्यांचं घरही तेवढंच अद्ययावत होतं. चहापान सुरू झालं. तेवढय़ात त्यांचा तरुण मुलगा बाहेरून आला. मला वाटलं तोही चहानाश्त्याला आमच्याबरोबर येऊन बसेल. तसं झालं नाही. त्यानं एकदाच ओझरतं ‘हॅलो’ म्हणून स्वत:चा चहाचा कप, खाण्याची बशी उचलली आणि म्हणाला, ‘‘आई, मी माझ्या खोलीत बसतोय गं.’’
‘‘बस हं. आणखी काही लागलं तर सांग. मी आणून देते.’’
आईनं उत्साहानं म्हटलं. मुलगा अदृश्य झाला. मला वाटलं मी परकी असल्याने बिचारा संकोचला असेल. म्हणून गेले, ‘‘मी असल्यामुळे त्याला आत जावं लागलं का?’’
‘‘नाही नाही. खाणं-पिणं तो त्याच्या रूममध्येच घेतो. त्याला तशी प्रायव्हसी आवडते. लकिली, आम्हीपण ती देऊ शकलो..’’
‘‘चांगलं आहे ना. त्याचं तुमच्याशी काही काम असलं तर.. म्हणजे मी गेल्यावर..’’

 

‘‘तुम्ही बसा हो. त्याचं आता माझ्याशी काही काम नसणार. आता तो त्याचे एक्झरसायझेस करेल.’’
‘‘जिममध्ये जाऊन?’’
‘‘नाही. त्याच्या रूममध्ये त्याची व्यायामाची सगळी इक्विपमेंट्स आहेत. आठवडय़ातून दोन वेळा त्याचा ट्रेनर आमच्या घरी येतो. एरवी तो आपला आपण व्ॉट्स, कार्डियो वगैरे भरतो.’’
‘‘अरेवा! एवढी आवड आहे वाटतं?’’
‘‘आवड आहेच. पण त्यानं सगळ्या सोयीही तशाच करून घेतल्या आहेत. रूममध्ये ए.सी. आहे. अद्ययावत संगीत आहे. टीव्ही लावतोच तो समोर. चालू असतो तासचे तास!’’ त्यांनी हौसेनं सांगितलं. त्यांच्या आर्थिक सुस्थितीचे ते पुरावे होतेच हौसेने सांगण्यासारखे. फक्त या सगळ्या ‘माझं स्वतंत्र’, ‘एकटय़ाचं माझं’ या नादात हा तरुण मुलगा त्यांच्या घराचा, त्यांच्या जगण्याचा भाग किती होत असेल याबद्दल शंका वाटत होती.
व्यक्तीची प्रायव्हसी-स्पेस, स्वतंत्र अवकाश ही मूळची पाश्चिमात्य कल्पना, आता आपल्याकडे चांगलीच रूजली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, तिला तिचं आयुष्य आहे. त्यात इतरांनी नाक खुपसू नये, वयाच्या- नात्याच्या अधिकारातून घुसखोरी करू नये, स्वत: जगावं- दुसऱ्याला जगू द्यावं, हे मूल्य चांगलंच आहे. वेगवेगळ्या कारणांनी आपल्याकडे ते काहीसं उशिराने आलं हेही खरं आहे. मग ती शेतीप्रधान समाजरचना असो, एकत्र कुटुंब असो, जातनिहाय वसाहती असोत, पुरुषप्रधानता आणि तिच्या पोटी स्त्रियांचं- मुलांचं दुय्यमपण असो, कूळ-वंश-घराणं या कल्पनांचा पगडा असो, आर्थिक- वैचारिक बंदिस्तता असो. या साऱ्याचा परिणाम एवढा नक्की झाला की एकेका व्यक्तीचं स्वातंत्र्य- स्वायत्तता यांना फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. वयाने-नात्याने- पैशाने लहान असणाऱ्या व्यक्तीला तर सदैव गृहीत धरलं गेलं. त्यांना काय समजतं, त्यांना काय विचारायचं आहे, त्यांचं आयुष्य आपणच हाकलं पाहिजे, असा भाव प्रौढांच्या मनात आला. इतका की वयाने, नात्याने लहान असणाऱ्या अनेक व्यक्तींना आयुष्यभर ‘प्रौढ’ होताच आलं नाही. ही परिस्थिती रम्य होती असं कोणीच म्हणणार नाही. उलट आजही सगळी जोखडं झुगारून जो तो स्वतंत्र- स्वायत्त होण्याच्या मागे लागलेला आहे. पूर्वीच्या तुलनेत लवकर पैसे मिळवायला लागणं, लवकर आहारविहाराचं स्वातंत्र्य मिळवणं आता शक्यही आहे.
करताकरता अनेकांचं जगणं हे ‘मी.. माझं.. माझ्यासाठी.. माझ्यापुरतं..!’ अशा ध्रुवपदाचं गाणं झालेलं आहे. कशानं कोणाच्या स्वातंत्र्यावर घाला पडेल, कशानं कोणाच्या स्वायत्ततेमध्ये घुसखोरी होईल हे कळणं कठीण झालेलं आहे. तो धोका पत्करण्यापेक्षा त्या फंदात पडणं नको म्हणून माणसं दूरदूर, सुरक्षित अंतरावर राहायला लागलेली आहेत!
‘एकलेपणाची आग लागली हृदया’ असं एक गाणं पूर्वी प्रसिद्ध होतं. आता ‘एकलेपणाची चटक लागली हृदया’ अशी अनेकांची स्थिती आहे. विशेषत: आर्थिक सुस्थितीतल्या पुढच्या पिढय़ांच्या प्रतिनिधींची! अगदी लहान वयापासून त्यांना आपापल्या गोष्टी, आपापल्या पद्धतीने, आपापल्या खासगी अवकाशात करणं आवडू लागलंय. घरून तशा शक्यता-सुविधा मिळू लागलेल्या आहेत. स्वत:चं स्वतंत्र कपाट, स्वत:चं टेबलखुर्ची, स्वत:ची खोली, स्वत:चं वाहन, स्वत:चा टीव्ही, स्वत:चा फोन, स्वत:चा ब्लॉग, स्वत:चा जिम, स्वत:चा पर्सनल ट्रेनर अशी चढती कमान आहे.
दुपारचं थोडावेळ आडवं व्हायलाही खोली बंद करण्याची प्रथा सुरू झाली आहे. अगदी लहान मुलांनाही आता कपडे बदलायला स्वतंत्र खोली लागते. आपल्या खोलीत इतरांनी ये-जा करू नये, केलीच तर परवानगी विचारून करावी, अशा अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत.
म्हटलं तर सगळं छान आहे. भरभराटीचं आहे. पण यात परस्परसंवादाला जागा कुठे उरणार ते समजत नाही. केवळ टपालसेवा होती तेव्हा घराच्या दरवाजात दोन-चार पत्रं येऊन पडत. प्रत्येकाने पत्र अगदी उघडून वाचलं नाही तरी, कोणाला पत्र आलं, कोणाचं पत्र आलं, वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलले हे घरातल्या इतरांना मोघम तरी समजे. घरामध्ये एकच फोन असे. त्याचं कॉर्डलेस भावंडं येण्यापूर्वी त्या फोनपाशी उभं राहूनच बोलावं लागे. साहजिकच तरुण मुलगा कोणाशी तरी भांडून आलाय, किंवा तरुण मुलगी कोणाच्या तरी प्रेमात पडत्येय याची कुणकुण घरच्यांना लागे. घरातली माणसं आमनेसामने बसून जेवली तर आज कोण कमी जेवला, बाहेरून काहीबाही खाऊन आला होता वगैरे मुद्दे नोंदले जात. यातला एकेक मुद्दा फार महत्त्वाचा असेल असं नाही, पण एकत्रितपणे ते माणसांना एकमेकांचा ठावठिकाणा, ख्यालीखुशाली याच्या वार्ता निश्चितपणे पोचवत. सुखाच्या घडीला याचं महत्त्व असेल-नसेल. पण दु:ख- संकट-अडचणीच्या प्रसंगात तरी यातून निश्चितच एक आधारचक्र उपलब्ध होई.
सध्याच्या हौशी किंवा ऐच्छिक एकटेपणात हे आधारचक्र गमावलं जातंय, ही खरी मेख आहे. उमेदीच्या वयात सुखाच्या- यशाच्या लाटेवर असताना त्याचं महत्त्व कळत नाही. पुढे आकस्मिक अडचण आली आणि मनातून त्याचं खूप महत्त्व जाणवलं-पटलं तरी ऐनवेळी ते निर्माण होत नाही. आमच्या जीवनाच्या उमद्या टप्प्यावर आम्ही यथेच्छ मनमानी करू, सर्वाना खडय़ासारखं दूर ठेवू आणि आमच्या हळव्या- दुबळ्या- दुखऱ्या क्षणांना इतर सर्वानी धाव घ्यावी, तीही स्वत:हून घ्यावी, जरुरीपुरती मदत करून पुन्हा रीतसर दूर व्हावं अशा अपेक्षा करू, ही एवढी कसरत कशी जमू शकेल, हा खरा प्रश्न आहे. ती जमत नाही म्हणून तर तरुणपणी वैफल्य येतं. मनोविकार जडतात. व्यसनं लागतात. अपवादाने आत्महत्येपर्यंत मजल मारली जाते. ‘माझ्यासाठी रडणारं कोणी नाही’, ‘मला सल्ला द्यायला कोणी नव्हतं’, ‘नातीबिती सब झूट! जगात कोणी कोणाचं नसतं.’ अशी वाक्यं अवेळी-अस्थानी ऐकायला मिळतात. अशी करुणरम्य वाक्यं बोलणाऱ्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करून पाहायला हरकत नाही की ‘आपल्यासाठी कोणी नाही’ हे एकवेळ मानलं तरी ‘आपण कोणासाठी कधी होतो का?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्यापाशी आहे का? ‘जशास तसे’ हा फक्त जंगलचा कायदा नसतो, समाजजीवनाचाही असतो, हेच खरं!
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com