Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

प्रतिसाद
ना आनंद ना असूया!
माझ्या लाडक्या लेकी,
‘आनंद की असूया’ हा छोटासा लेख (९ मे) लिहून तुझ्या मनातील प्रश्न नव्हे वैचारिक गोंधळ तू मोकळेपणाने मांडलास याचा आनंदच आहे. पण तुझी सध्याची जीवनशैली पाहून माझ्या मनात ना आनंद ना असूया! कधी कधी तर याचसाठी केला होता का अट्टहास, असेही मनात येते.
तुझ्या मनातील एकेका गोष्टीबद्दलच बोलते. तुझं जरा ‘गडबडलेलं घरव्यवस्थापन’ हीच पहिली गोष्ट घे. ‘गडबडलेलं’ हा तुझा शब्द! मला जरा नवाच वाटतो. तू म्हणतेस की एक आठवडा घरातील सगळ्यांसाठी खूप कामाचा होता. ठीक आहे!

 

मग एवढं काम असताना घरात पुस्तकं अन् कॅसेटस् पसरवायला कोण मोकळं होतं? त्याचा वापर कोणी केला? तू कदाचित म्हणशील की त्या कामाच्याच कॅसेट्स् होत्या! पण कामाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी नीट ठेवायला नकोत?
घर म्हटलं ना, की ते घरात राहणाऱ्या सगळ्यांचं असतं. म्हणून एकानं पसरलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं, हे तत्त्व म्हणून आम्ही म्हणजे घरातील स्त्री व पुरुष यांनी मान्य केलं होतं! त्यामुळे आवरायची जबाबदारी कुणा एकाचीच असते, हे योग्य नाहीच! पण तूच सांगतेस की नवरा आणि मुलगा उद्योगाला गेल्यावर तू घर जरा ठाकठीक केलं! का ग बाई? तूच का? तरी तुम्हाला स्वातंत्र्य, नोकरांची मदत वगैरे वगैरे आहे. घरातील अव्यवस्थेबद्दल तुला कुणी जबाबदार धरत नाही. ठीकच आहे! पण दुसरं कुणी ती जबाबदारी घेतं का? की ती गैरव्यवस्था तुझीच वाट पाहात बसते? आणि सांगू? मला खरंच मनापासून वाटतं की फ्रीजमध्ये काय काय आहे, कपडे धुतले गेले की नाही, याकडे जर कुणीच लक्ष देणार नसेल आणि त्याही पुढे जाऊन त्याचं समर्थन होणार असेल, तर खरंच तुझी असूया कशी वाटेल गं? कीव येते कीव!
अगं पोरी, तुझ्या संसारात गैरव्यवस्था आहे आणि तरी कुणालाच त्याचा त्रास होत नाही, कोणीच कोणाकडून ती गैरव्यवस्था सावरण्याची अपेक्षा करीत नाही, याचा आनंद कसा होईल गं? अगं त्या गैरव्यवस्थेत म्हणजे कचऱ्यापसाऱ्यात तू सुखात आहेस असं कसं गं वाटणार? चिखलात बसणारी म्हैस आणि आपण यात काहीच फरक नाही? ती पण सुखात आणि मी पण सुखात! शाब्बास!
दुसरी गोष्ट दोन घास खाण्याची! अमाप पैसा मिळवूनसुद्धा घरात बनविलेलं, सात्त्विक, आरोग्यदायक (चविष्ट असं मुद्दाम म्हटलेलं नाही कारण हल्ली घरात काही चविष्ट बनतं यावरच तुमचा विश्वास नाही.) अन्न तुझ्या घरातील तुझ्यासकट कुणालाच मिळत नसेल, तर तुम्ही सुखात आहात, असं कसं मानू?
पुढे तू एकदम स्वातंत्र्याचीच गोष्ट काढलीस! ‘बंधनात सुख’ असं मानणाऱ्या आम्ही नोकरदार स्त्रियासुद्धा तुमच्याहून जास्त स्वातंत्र्य उपभोगत होतो! ऐक जरा! आधीच तुम्ही सदैव कामाच्या ताणाखाली असता आणि त्यातून वेळ मिळेल तेव्हा तो वेळ नवराबायकोने एकमेकांसाठी द्यायचा की आपापल्या मित्रांसाठी? आणि महागडय़ा साडीची गोष्टच सोड. आम्हीही महागडी साडी थोडे नियोजन करून घेत होतो. आता तू ती उगीच घेतेस ना, (म्हणजे नेसायचे नाव नाही!) तेव्हा असूया सोड, अजून तुला पुरेशी समज आली नाही, असंच मला वाटतं. पाहुणे आल्यावर बाहेरून जेवण आणलंस. ठीक आहे! नोकरीनंतरची दमणूक आणि कंटाळा माझ्याही ओळखीचे आहेत. पण याबद्दल असूया? कशासाठी? अगं पाहुणे येणार असले की आम्ही पण काही पदार्थ बाहेरून मागवत होतो, पण साधा भातही घरी करायचा आळस मला समजू शकत नाही आणि गरम भाताऐवजी तो हॉटेलातील भात तुम्ही खाता ना, तेव्हा खरंच तुमची कीव येते!
ताज्या, घरच्या अन्नाची आम्हाला कायमच मोहिनी पडलेली, तर बाहेरच्या अन्नाची चटक तुम्हाला लागलेली! (लहानपणी घरचंच अन्न खाऊन मोठे झालात, तरीही!)
अगदी मनातलं बोलायचं तर आमचं ध्येयच होतं की नोकरी उत्तम रीतीने करून पैसा मिळवायचा आणि मुलांना उत्तम रीतीने शिकवायचं! पण उत्तम रीतीने शिक्षण मिळवलेल्या तुम्हा मुलामुलींचे वागणे पाहिले की तुमच्या संसाराचे आणि पैसे कमावण्याचे उद्दिष्ट काय, हा प्रश्न मला पडतो. मुलांना जन्म द्यायचा तो एक थ्रिल म्हणून किंवा नाइलाज म्हणून! आणि त्यांना वाढवायची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलायची! करिअर सांभाळून साइड बाय साइड जमेल तशी मुलं वाढवायची आहेत नं तुम्हाला!
तुमच्या यशाचे कौतुक केवळ तुमच्या लठ्ठ पगारामुळे होतंय, हे कसं विसरतेस? इतर सगळे कौतुक करतात पण आई नाही, असाही सल तू व्यक्त करतेस! पण एक लक्षात घे, आईच तुमच्याशी स्पष्ट बोलू शकते! सासू तसं बोलली तर तिला दोष देऊन तुम्ही मोकळ्या होणार! म्हणून हल्ली सासवा त्या फंदातच पडत नाहीत!
तुला असंही वाटतं की आईच्या अनुभवाचा आता फारसा उपयोग नाही.. तुझ्यासारख्या हुशार मुलीने असं म्हणावं याचं मात्र वाईट वाटलं आणि क्षणभर असंही वाटलं की तुला असं वाटणं हे माझं अपयश! (आम्ही शामच्या आईचाच वारसा सांगणाऱ्या ना!) पण क्षणभरच! लगेच लक्षात आलं की ऑफिसात मोठमोठय़ा जबाबदाऱ्या पेलणारी तू इथे मात्र वैचारिक गोंधळात सापडली आहेस! मुलगी म्हणूनही आणि आई म्हणूनही!
तेव्हा हे माझ्या लाडक्या नातीच्या माते, मला वाटतं कोणत्यातरी गंडानं तुला ग्रासलंय. म्युच्युअल फंडात तुझ्या लेकीने गुंतवणूक केली तर छानच की! पण तूच तिला गुंतवणुकीत समतोल ठेवायला सांग! बघ ती ऐकते की नाही? आणि तिची नोकरी, तिचा पैसा, त्याचा विनियोग करण्याच्या तिच्या तऱ्हा या तुला इतक्या अपरिचित आहेत? खरं नाही वाटत! खरी गोष्ट आहे हरवलेल्या संवादाची! तिच्याशी संवाद साध. मुलीच्या सोयीने तुझ्या भूमिका बदलू नकोस. तू तिची आई आहेस, आईच राहा. श्यामच्या आईचे दिवस कधी संपत नसतात. पण तुम्हा आयांनी तेवढी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बदलत्या काळाचे भान ठेवूनच वागायला हवे. मुलांना स्वातंत्र्य देणे म्हणजे त्यांच्या जीवनातून आपण बाजूला होणे नव्हे! हे एकदा ठरवलंस की निश्चिंत होशील, माझ्यासारखी! वेळ पडल्यास मुलीला चार शब्द ऐकव. काय हरकत आहे? आणि ‘मदर्स डे’ची कल्पना छान आहे. पण वेळात वेळ काढून आधी पसारे आवरू द्या. मग मजा करायला आपण मोकळ्या!
तुझी आई,
- सुमती फाटक, पुणे

संग्रही ठेवण्याजोगी पुरवणी
‘चतुरंग’ची ‘मदर्स डे’ पुरवणी अप्रतिम होती. लेख पुन: पुन्हा वाचताना नवनवीन अर्थ उलगडत गेले आणि त्याचे संदर्भ आपल्या रोजच्या जगण्यात कोठे तरी येतात असे वाटले.
अरुणा ढेरे यांच्या लेखनातून एक वेगळीच आनंददायी अनुभूती मिळते. ‘आई म्हणजे..’ या लेखाने फारच आनंद दिला. मनीषा सबनीस यांच्या ‘आनंद की असूया’ या लेखातील विचार मात्र फारसे पटले नाहीत. आईला लेकीविषयी असूया कशाला असेल? एक मात्र खरे, या पिढीचे धावते आयुष्य, मिळणारे स्वातंत्र्य पाहून धास्ती मात्र वाटते. सुनेविषयी मात्र थोडी फार असूया वाटते. ती तिला मिळणाऱ्या (घरातून) स्वातंत्र्यामुळे आणि त्यांच्या कुणालाही न विचारता घेत असलेल्या निर्णयामुळे आहे, असे वाटते.
‘पण बोलायचे आहे..’मध्ये मंगला गोडबोले यांनी फार चांगला मुद्दा मांडला आहे. पुस्तकांच्या किंमती फार वाढल्या आहेत, असं आपण सहज म्हणून जातो. पण पण हाच प्रश्न सिनेमा, कपडे, फार काय, रोजच्याच गरजेच्या व चैनीच्या वस्तू खरेदी करताना विचारतो का?
- रागिणी किणीकर

इतके स्वातंत्र्यही नसे थोडके!
‘चतुरंग’मध्ये (१६ मे) प्रसिद्ध झालेले मुकुंद टाकसाळे यांचे पत्र वाचले. त्यात त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत, जो प्रश्न विचारला आहे, त्याला उत्तर म्हणून हा पत्रप्रपंच.
सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या ठिकाणी तसा समानता हा शब्द दुर्मिळच. मराठा समाजातील माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. पण त्यांच्या घरात समानता क्वचित दिसून येते. आणि जरी ती दिसून आली अथवा एखाद्या नवऱ्याने (नोकरी करणाऱ्या) बायकोला मदत केली तरी त्याला नावे ठेवली जातात.
मी याबाबतीत मात्र नशीबवान ठरले. मी कराडची. माझे बाबा हाजी शमशुद्दीन अब्दुल्ला इनामदार हे सरकारी नोकरीत होते. त्यांनी माझ्यात व माझ्या भावात कधी भेदभाव केला नाही. एखादी माहिती वा ज्ञान देताना ते दोघांनाही देत. मला लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी नव्हती. म्हणून मी हिंदी, मराठी विषयांच्या शिकवण्या घेतल्या. मी कविता करते, त्या संमेलनांमधून सादरही करते. या सर्व धबडग्यात माझ्या नवऱ्याचा पाठिंबा नसला तरी विरोधही नाही. त्यामुळेच मी हे सर्व करू शकते. माझ्या मुलांना वाढविताना दोघांमध्येही समानतेचं बीज रोवण्याचा मी प्रयत्न करतेय. मुस्लिम कुटुंबात राहूनही मला मिळालेला इतपत पाठिंबा म्हणजे हेही नसे थोडके असेच म्हणाावे लागेल.
- फरझाना डांगे, अंधेरी.

असेही काही सच्चे जनसेवक
‘चतुरंग’मधील (१६ मे) ‘बेपर्वाईचे ठसे’ हे सदर वाचून मलाही आलेला अनुभव लिहावासा वाटला. या निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष (Presiding officer- PRO) म्हणून मला नेमले होते. २९ मे रोजी मला नियुक्त केलेल्या माहीम येथील मकरंद सहनिवास या सहकारी वसाहतीच्या दोन मतदान केंद्रापैकी एका केंद्रावर दुपारी एक वाजता माझ्या चमूबरोबर (ज्यात मी सोडून बाकी चार महिला होत्या)मी गेलो. ही केंद्रे सोसायटीच्या आवारातील गॅरेज किंवा हॉलमध्ये उभारावयाची होती. मतदान केंद्रासाठीची रचना करताना आम्हा सर्वाना कडकडून भूक लागली. बरोबरच्या एकदोघी जणी बाहेर जाऊन नाश्ता करून आल्या. त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता आम्ही टपरीवरून चहा मागविला. नंतर आम्ही सर्व मतदान केंद्राच्या तयारीत गढून गेलो. साडेसहाच्या सुमारास बाजूच्याच ज्युतिका या इमारतीमधील उमा दामले या वयस्क बाई आमची तयारी बघायला आल्या. त्यांनी आम्हा सर्वाना सांगितले की, ‘कुणालाही कसलीही मदत लागली तरी नि:संकोचपणे माझ्याकडे या. हे केंद्र संस्थेच्या हॉलमध्ये असल्यामुळे व तेथे कसलीच (पाणी, टॉयलेट) व्यवस्था नीट नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी येण्यास सांगितले. त्यांच्या या सहकार्यामुळे माझ्या सोबतच्या महिलांना हायसे वाटले. नंतर तासाभराने दामले काकू पुन्हा आल्या त्या आमच्यासाठी चहा, नाश्ता घेऊनच. रात्री त्यांनी आमच्यासाठी व डय़ूटीवरील पोलिसांसाठी फळे पाठविली. दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी आम्ही सर्व मतदान केंद्रावर व्यग्र असताना त्यांनी चहा, नाश्ता (सकाळी व संध्याकाळी) पाठविला. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना फक्त पिण्याचे पाणी (बिसलरी) पुरविले होते. बोलण्याच्या ओघात याच दामले काकू म्हणाल्या की, गेली ४० वर्षे मतदानाच्या वेळी अशीच मदत त्या करत आहेत. दामले काकूंना मतदान केंद्रावरील आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच निवडणूक आयोगाला ही नम्र विनंती की, त्यांनी मतदान केंद्राच्या आसपास काही खानपान सेवा व मुख्यत्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहांची सोय आहे की नाही, हे पाहूनच केंद्र निवडावे.
- एक मतदान केंद्राध्यक्ष