Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

पर्यावरणरक्षणात पुढाकार
'man's needs & not his greeds can be supported by the earth?' महात्मा गांधीजींचा हा विचार अमलात आणणे हे आता प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्य बनले आहे. येत्या शुक्रवारी जागतिक पर्यटन दिन. पर्यावरणाची सद्यस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत सुयोग्य बदल करणे अत्यावश्यक आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे बदलत्या जीवनशैलीनुसार पाण्याचा अतिरेकी वापर वाढलाय. आंघोळीसाठी शॉवरचा अमर्याद वापर, ब्रश करताना किंवा दाढी करताना बेसिनचा नळ सतत चालू ठेवणे, गाडय़ा, खिडक्या, टेरेस व जिने धुण्यासाठी पाइप लावून पाणी वापरणे, वाहत्या नळाखाली भांडी धुणे इ. मुळे बहुतांश कुटुंबांतून पाण्याचा अतिरेकी वापर होत आहे. दिल्ली व मुंबईसारख्या मोठय़ा शहरात पाण्याचा दरदिवशी दरडोई वापर

 

अनुक्रमे २४० व २०० लीटर आहे. वॉिशग मशीनचा वापर आठवडय़ातून दोन-तीनदा मर्यादित ठेवणे, कमीत कमी पाण्यात घराची व भांडय़ांची साफसफाई करण्यास मोलकरणीला शिकवणे, स्वयंपाकघरातील किंवा धुण्याचे वापरलेले पाणी झाडांना वापरणे, नळाचे वॉशर खराब झाल्यास ताबडतोब बदलून घेणे, घरातील मंडळींचे कमीत कमी पाण्याचा वापर करण्यासाठी मन वळवणे इ.चा अवलंब करून पाण्याची बचत करता येते. अभ्यासान्ती असे आढळते की, दात घासल्यावर तोंड धुताना बेसिनच्या नळाचा वापर करण्याऐवजी एक ग्लास पाणी वापरल्यास २५ हजार लीटर पाणी दरडोई दरवर्षी वाचेल. दाढीसाठी बेसिनचा नळ चालू ठेवण्याऐवजी जर एक मग पाणी वापरले, तर दरडोई दरवर्षी एक हजार लीटर पाण्याची बचत होईल. अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये टाकीतून पाणी वाहणे व पाईपमधून गळती होणे यामुळे बरेचसे पाणी रोज नेमाने वाया जाते. अशा प्रकारे पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
ग्रामीण भागात तर रोजच अनेक महिलांना उन्हातान्हात, पावसापाण्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यासाठी स्त्रियांनी एकत्र येऊन पाणी व्यवस्थापनासाठी आग्रही असायला हवे. तलाव बांधून त्यात पाणी साठवणे, पाझर तलाव बांधणे, स्वयंपाकघरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करणे इ.चा पाठपुरावा ग्रामीण महिलांनी करायलाच हवा. सात वर्षे हंडाभर पाण्यासाठी पायपीट कराव्या लागणाऱ्या वाघा गावातील लोकांनी ५५ नाल्यांवर बांध घातले, पंधरा वनराई बंधारे घातले, घरोघरी शोष खड्डे केले. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवला. हे उदाहरण अनुकरणीय आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात वीजटंचाईचे संकट आहे. पाण्याअभावी आवश्यक तेवढी वीजनिर्मिती होत नाही, त्यासाठी वीज बचतीसाठी प्रयत्नशील राहणे शक्य आहे. दिवाळीच्या किंवा इतर सणासमारंभांना विजेच्या दिव्याऐवजी पणत्यांची आरास करणे, प्रत्येक खोलीत आवश्यक तेवढाच व तेव्हाच लाईट वापरणे, पारंपरिक बल्बऐवजी सी.एफ.एल. बल्बचा वापर करणे, फ्रीजमध्ये अन्न ठेवताना ते नॉर्मल तापमानाला आल्यावरच ठेवणे, फ्रीजमधून अन्न काढून नॉर्मल तापमानाला आणून गरम करणे इ. मुळे विजेची खूप बचत होते.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, दिल्ली यांनी प्रयोगांती सिद्ध करून दाखवलंय की, शक्य तेथे योग्य काळजी घेऊन ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न केल्यास ३० टक्के ऊर्जा बचत होऊ शकते.
स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक ती सामग्री, चिरलेल्या भाज्या, निवडलेले तांदूळ, वाटण इ. तयार नसल्यास ऊर्जेचा अपव्यय होतो. बऱ्याच महिलांना गॅस पेटलेला असल्यास एक भांडे उतरवून दुसरे भांडे तापत ठेवण्याची सवय असते. भांडे तापायला ठेवून कांदा चिरणे, भाज्या धुवायला घेणे, भज्यांचे पीठ तयार करणे इ. अशाप्रकारे भांडे मंद गॅसवर तापत ठेवून केल्यास प्रत्येक तासाला ८० पैशांचा गॅस वाया जातो, हे प्रयोगांनी सिद्ध झाले आहे.
गॅस वापरण्याच्या पद्धतीवरही बचत अवलंबून असते. स्वयंपाकाच्या गॅसच्या शेगडय़ांमध्ये छोटे व मोठे बर्नर असतात. छोटय़ा बर्नरचा वापर जास्त केल्यास ऊर्जा बचत होते. प्रयोगांनी सिद्ध झालंय की छोटय़ा बर्नरवर बटाटे उकडल्यास सात ते दहा टक्के गॅस कमी लागतो, पण सात मिनिटे वेळ मात्र जास्त लागतो. त्यामुळे निदान फारशी घाई नसेल तेव्हा छोटय़ा बर्नरचाच वापर करावा. एखाद्या द्रवपदार्थाला उकळी आल्यास छोटी ज्योतही ते उकळत ठेवण्यास व पदार्थ शिजण्यास आवश्यक उष्णता निर्माण करते. त्यामुळे द्रवपदार्थाला उकळी आल्यास तो छोटय़ा शेगडीवर ठेवता येतो. भांडय़ाचा व्यास २५ सें. मी. पेक्षा कमी असल्यास छोटय़ा बर्नरवर बारीक गॅस करून भांडे ठेवले तरी चालते. गॅसचे बर्नर साफ ठेवणे महत्त्वाचे असते. त्यात अडकलेला कचरा जाळ्यात ऊर्जा खर्च होते व पदार्थाला मिळणारी उष्णता कमी होते. त्यासाठी बर्नरवर द्रवपदार्थ ऊतू न जाऊ देण्याची काळजी घ्यायलाच हवी. गॅस पेटवतानासुद्धा अनेक जण गॅसचे बटण आधी फिरवतात व नंतर लायटरचा उपयोग करतात. त्यामुळेही प्रत्येक वेळेस गॅस वाया जातो.
स्वयंपाक करण्याच्या पद्धतीचा अभ्यास बरेच काही सांगून जातो. अस्वच्छ भांडय़ांचा वापर केल्यास १० टक्के ऊर्जा अधिक वापरली जाते. अस्वच्छ भांडय़ांना तापायला वेळ लागतो, कारण त्यातील किरण उष्णतेच्या वहनास प्रतिबंध करतात. उदा. कुकरचा तळ नेहमीच स्वच्छ असावा. झाकण न ठेवता पदार्थ शिजवल्याने पदार्थाची उष्णता कमी होते व ऊर्जा अधिक खर्च होते. पालेभाज्यांचा रंग फिका होतो म्हणून किंवा पदार्थ बेचव होतो म्हणून अनेक महिला झाकण ठेवून अन्न शिजवत नाहीत. पदार्थ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजत घातल्यास तो नरम होतो व शिजायला ऊर्जा कमी लागते. पदार्थ शिजवताना निष्काळजीपणे किंवा घाईगर्दीने पाणी जास्त टाकल्यास ते आटवण्यात ऊर्जा वाया जाते. बऱ्याच महिलांना बटाटे किंवा अंडी उकडण्यासाठी भरमसाट पाणी घालण्याची सवय असते. त्याऐवजी आधी बटाटे किंवा अंडी पातेल्यात टाकून नंतर बेताचेच पाणी ओतावे.
अमर्याद वृक्षतोड पर्यावरणाला घातक आहे. खेडोपाडीच्या तर त्याचे फारच घातक परिणाम दिसतात, कारण त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन विहिरीतील पाण्याची पातळी खाली जाते व पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. शहरी महिलांनी लाकडाचा कमीत कमी वापर होण्यावर भर द्यायला हवा. घरातील फर्निचरच्या खरेदीत काच, लोखंड, रबर, अ‍ॅक्रेलिक इ.चा वापर असलेल्या फर्निचरचा विचार केल्यास लाकडाची मागणी कमी होऊन वृक्षतोडीला आळा बसेल. ग्रामीण भागात इंधनासाठी वृक्षतोड मोठय़ा प्रमाणावर होते व धुरामुळे स्त्रियांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे ग्रामीण स्त्रियांनी सौरचुलीचा वापर करण्यावर भर दिल्यास वृक्षतोड कमी होईल व धुरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणालाही आळा बसेल.
प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पर्सेस, चपला, पिशव्या, फरच्या टोप्या, कोट, सापाच्या कातडीचे पट्टे इ. वस्तूंच्या वापराचा मोह टाळून त्याला पर्यायी व पर्यावरणास घातक नसलेल्या वस्तूंचा वापर स्त्रियांनी करून कुटुंबियांनाही शिकवल्यास जैववैविधतेचा ऱ्हास थांबवण्यास मदत होईल. विघटन होणारा कचरा व विघटन न होणारा कचरा वेगवेगळा ठेवण्याची प्रथा प्रत्येकजण घरी पाळू शकतात. स्वयंपाकघरातील कचरा, म्हणजे भाज्यांचे शेषभाग, फळांच्या साली, कोंडा, किडलेले धान्य, नासलेले व खरकटे अन्न, चहाचा चोथा इ. कचरा साठवून त्यात गांडूळ सोडून गांडूळ खत तयार करता येते. स्वत:च्या घराजवळ किंवा सोसायटीच्या आवारात खड्डा बनवून सर्वाना तेथे विघटन होणारा कचरा टाकायला सांगितल्यास तयार झालेले खत झाडांना वापरता येते. विघटन न होणारा कचरा म्हणजे प्लास्टिकच्या जुन्या तुटक्या वस्तू, धातूच्या निकामी वस्तू, कॉम्प्युटरचे निकामी भाग, जुने फोन इ. जमा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी भंगारवाल्याला देता येते. पार्टीप्रसंगी किंवा पर्यटनस्थळी खाद्यवस्तूंचे वाटप करण्यासाठी थर्माकोलच्या प्लेट्स, वाटय़ा, प्लास्टिकचे ग्लास, कागदी हातरुमाल इ.न वापरता कागदी प्लेटस्, स्टीलचे ग्लास, कापडाचे नॅपकिन व पिशव्या यांचा वापर करून प्रदूषणाला आळा घालता येतो. किमान पर्यटनस्थळी निर्माण होणारा विघटन न होणारा कचरा तेथेच पडू न देता पिशवीत भरून आणण्याची तसदी तरी घेता येईल.
क्लोरोफ्ल्युरोकार्बन म्हणजे सीएफसी वायू फ्रीज, एसी, मशीन व स्प्रे यांमधून मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडतो. फ्रीजच्या दाराची सतत उघडझाप झाल्याने हा वायू वातावरणात सोडला जातो. ज्या वस्तू फ्रीजमधून काढायच्या, त्या एकदाच बाहेर काढून व त्याच वेळी वस्तू आत ठेवून फ्रीजची कमीत कमी उघडझाप होण्याची जबाबदारी महिला घेऊ शकतात.
सणवार साजरीकरणात बदल करूनही पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यात महिला पुढाकार घेऊ शकतात. वटसावित्री, हरतालिका, गणेशोत्सव, रंगपंचमी, होळी इ. उत्सव साजरे करताना पर्यावरणाला अनुकूल बदल करण्यात स्त्रियांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यापेक्षा अनेकांना सावली देणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या वडाच्या वृक्षांची रोपे लावणे, हरतालिकेला पत्रीसाठी झाडाची पाने न तोडणे, दसऱ्याला आपटय़ाची पाने न देता झाडांची रोपे एकमेकांना देणे, घरोघरी गणपती बसवण्याऐवजी संपूर्ण सोसायटीत किंवा गल्लीत एकच गणपती बसविणे व त्याचे हौदात विसर्जन करणे, गणपतीच्या आराशीकरिता थर्माकोल व प्लॅस्टिक न वापरता रंगीत कागद, लोकर, फुले, वापरणे, होळी न पेटवता त्या दिवशी वृक्षारोपण करणे, रंगपंचमीला गुलाल आणि कृत्रिम रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करणे इ. बदल करता येतील.
पर्यावरणाचा ऱ्हासाला आळा घालण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी मनात आणले तर स्त्रिया बरेच काही करू शकतात. आज दारूबंदी गावोगावी होत आहे, स्त्रिया धीट बनत आहेत, शिक्षणाने त्यांच्यात जागरूकता वाढलीय, आत्मविश्वास वाढलाय, प्रत्येकीने आपले घर व नजीकचा परिसर म्हणजे सोसायटी किंवा आजूबाजूची घरे अशा आपापल्या आवाक्यातील परिसरात तरी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. पर्यावरण दिनी असा निश्चय प्रत्येकीने केला पाहिजे.
शैलजा सांगळे