Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

सूर्यशेगडीशी सोयरीक
सोलर कुकर वापरण्यच्या काही कल्पना.. स्वत: प्रयोग करून सिध्द केलेल्या..
आम्ही ८५ साली पुण्यात स्वत:चे घर बांधले आणि तिथे राहायला गेलो. तिथे स्वत:ची गच्चीही होती. लगेचच मी ‘सूर्यशेगडी’ घेतली. तेव्हा ही शेगडी खरेदी करण्यासाठी सरकारची सवलत योजनाही होती. ही शेगडी कशी वापरायची, याबाबत लेखी स्वरूपात काहीच माहिती उपलब्ध नव्हती. त्यात स्वयंपाक होतो, रवा, शेंगदाणे भाजता येतात, अशी जुजबी माहिती मैत्रिणीकडून मिळाली, पण मग मी गप्प बसले नाही. माझ्या पायाभूत ज्ञानाच्या आधारे स्वत:चे डोके व कल्पकता वापरून वेगवेगळे प्रयोग करत गेले. स्वयंपाकातील कोणताही पदार्थ पहिल्यांदा करताना अगदी थोडय़ा प्रमाणात करण्याचा माझा स्वभाव. याला अनुसरून ‘सूर्यशेगडी’ वापरताना मी काही प्रयोग केले.
सुरुवातीला वरण, भात, भाजी, रवा भाजणे, शेंगदाणे भाजणे हे तर केलेच. तो एप्रिल-मे महिना म्हणजे मुरंब्याच्या कैऱ्यांचा

 

सीझन होता. एक कैरी किसली. त्यात प्रमाणाप्रमाणे साखर घालून ‘सूर्यशेगडी’च्या विशिष्ट डब्यात ठेवून कुकर लावला. संध्याकाळी पाहिले तर मुरंबा करपून गेलेला. टाकूनच दिला, पण दुसऱ्यांदा करताना त्यात मी कैरी, साखर व प्रमाणात पाणीही घातले तर मुरंबा छान जमला.
आमच्या कोकणात ‘कणगरं’ नावाचे कंद मिळतात, ते चुलीच्या गरम राखेत (निंबरात) पुरून ठेवतात. काही तासांनंतर ते भाजले जातात. आईने पुण्याला माझ्याकडे कणगरं पाठवली. आता ती भाजायची कशी? मी सूर्यशेगडीत भाजायला टाकली. छान भाजून मिळाली.
सोलर कुकरमध्ये खरवस करून पाहिला. तोही खूप छान जमला. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेपर्यंत रोज दहा वाजता सोलर कुकर लावून दुपारी साडेबारा ते एक पर्यंत दुपारचा स्वयंपाक होत असे. त्यानंतर संध्याकाळची भाजी किंवा काही उकडून ठेवण्यासाठी मी दुसऱ्यांदा कुकर लावत असे.
रटरट उकळणारी भाजी पाहताना अगर काच उघडताना, अंगावर वाफ येते तेव्हा, हात भाजतो तेव्हा जाणवत राहते की सौरऊर्जा किती भयंकर! वापरत नाही तोपर्यंत ती किती वाया जात असते. सोलर कुकरमुळे इंधनबचत तर होतेच, शिवाय गृहिणीचे श्रम वाचतात. याशिवाय तो वापरताना केलेल्या प्रयोगांमुळे मला रोज आनंद मिळायचा. सोलर कुकर वापरताना वेळेचा अंदाज आपल्यालाच घ्यावा लागतो. रोज वापरत गेलो की तो येतो. खोबरे किसून भाजायचे, पण किसायला वेळ नसेल तर मी अख्ख्या कवडच भाजून ठेवते. प्रयोग करत करत मी खालील पद्धतीने सोलर कुकर वापरत असते-
‘भाजणे’ या अंतर्गत आपण कोणकोणते पदार्थ कशा पद्धतीने भाजू शकतो ते पाहा-
रताळी, कांदे, कणगरं काळ्या डब्यात ठेवून भाजू शकतो. स्वयंपाकात वाटण म्हणून वापरताना भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याच्या पेस्टसाठी वेगळ्या डब्यात अख्खे कांदे व दुसऱ्या डब्यात सुके खोबरे भाजत ठेवावे.
काळ्या मसाला बनवण्यासाठी सर्व घटक तेल लावून भाजावे.
शेंगदाणे, रवा, भाजणीचे घटक वेगवेगळे ठेवून भाजावेत.
आमच्याकडे भाजका मसाला केला जातो. त्यासाठी धणे, जिरे, मोहोरी, ओबडधोबड कुटलेली हळकुंडे, लवंग, मिरे वेगवेगळ्या डब्यात टाकून भाजता येतात.
मुगाच्या डाळीचे लाडू करण्यासाठी मुगाची डाळ खमंग भाजली जाते.
गव्हाच्या जाडसर दळलेल्या कणकेचे लाडू करण्यासाठी या कणकेला तूप चोळून व त्यातच खसखस घालून कणीक भाजता येते.
सोलर कुकरमध्ये केक छान होतो. काळ्या डब्याला आतून तूप लावून मैदा भुरभुरवून केकचे मिश्रण ओतावे. डब्याचे झाकण लावून कडक उन्हाच्या वेळेस प्री-हीट केलेल्या कुकरमध्ये भाजण्यास ठेवावा. र कोबीचे भानोळे हा पदार्थ भाजता येतो.

उकडणे, वाफवणे, शिजविणे याबाबत सूचना-
कुकरच्या विशिष्ट डब्यात पाणी घालून त्यात अंडी, बटाटे, रताळी उकडता येतात.
पावभाजीसाठीच्या सगळ्या भाज्या उकडून घेवू शकता.
पालकची भाजी, डाळ, दाणे घालून शिजवून घेऊन नंतर आपण गॅसवर फोडणीत ते उकडलेले मिश्रण घालावे.
काळ्या डब्यात भिजलेली तुरीची डाळ पाणी, हळद, हिंग घालून वरणाची डाळ शिजते.
कडक उन्हाच्या वेळेस डब्यात धुतलेले तांदूळ व दुपटीपेक्षा थोडे कमी पाणी घालून भात करता येतो. डबल बॉयलर पद्धतीनेही मी भात करून पाहिला. मऊ भातही छान होतो. फक्त पाणी जास्त घालावे.
खिरीसाठी ‘दलिया’ धुऊन तुपावर परतून नंतर पाणी घालून शिजण्यासाठी ठेवावा. नंतर आपल्या पद्धतीने खीर करावी.
कोणतीही कोरडी भाजी प्रथम गॅसवर आपल्या भांडय़ात फोडणीला टाकून नंतर त्यात आपले सर्व घटक टाकून ढवळून शिजण्यास ठेवावी. थोडा पाण्याचा हबका मारावा.
उपमा करता येतो.
पुरणपोळीसाठीची हरभरा डाळ दोन तास धुऊन ठेवून नंतर कुकरमध्ये डाळीमध्ये पाणी घालून शिजवून घेता येते.
सर्व रसभाज्याही करता येतात. गॅसवर फोडणीला टाकून त्यात मीठ मसाला, पेस्ट जे घटक पदार्थ टाकावयाचे असतील ते टाकून एक उकळी घेऊन नंतर काळ्या डब्यात ओतून शिजण्यासाठी ठेवावेत.
सर्व प्रकारच्या उसळी छान होतात.
चिकन रस्साही करता येतो.
दोन्ही पद्धतीने खरवस करता येतो. डबल बॉयलर पद्धतीने म्हणजे मोठय़ा काळ्या डब्यात पाणी घालावे व त्यात आपल्या डब्यात चीक, दूध, साखर, केशर, वेलची घालून साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण कडक उन्हाच्या वेळी ठेवून कुकरमध्ये ठेवावे.
याच पद्धतीने अळूवडी उकडता येते.
कुल्फीसाठी दूध साखर घालून उकळवण्यास ठेवावे. ते खमंग होते, पण फारसे आटत नाही.
ज्यांना ऊन असणारी ओपन टेरेस, गच्ची, गार्डन आहे त्यांना, अगर गावातील लोकांना ही शेगडी जरूर वापरता येईल. त्यामुळे श्रमाची, खर्चाची, वेळेची बचत होते. गॅसवर कोणताही पदार्थ भाजताना ढवळत राहावे लागते, पण सूर्यशेगडीत टाकले तर तो वेळ वाचतो.
सुचेता पावसकर