Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

वाळवणी वैविध्य

वाचकांनी पाठविलेल्या वाळवणांच्या आणखी काही पाककृती..
भोपळ्याचे सांडगे
साहित्य : भोपळा, पातळ पोहे, कुरमुरे, टोमॅटो, तिखट, मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, तीळ, हळद
कृती : गोल भोपळा किसून घ्यावा, नंतर पोहे भिजवावे. त्यात कुरमुरे, भोपळ्याचा कीस, तिखट, मीठ, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हळद, तीळ टाकून सर्व एकजीव करून त्याचे सांडगे करून उन्हात वाळवावे. तळून रुचकर लागतात.
- सविता सुधीर मेत्रेवार,यवतमाळ

कुटाच्या मिरच्या
साहित्य : दही, आठ चमचे धणे, चार चमचे मोहरी, एक चमचा बडीशेप, एक चमचा मेथी, दोन चमचे हळद, दोन चमचे आमचूर पावडर, एक चमचा हिंग, मीठ
कृती : धणे, मोहरी, मेथी, बडिशेप सर्व साहित्य एकत्र करून मिनिटभर भाजा. त्यात हळद, हिंग व आमचूर पावडर मिसळून

 

मिक्सरमधून दळून पूड करा. तीन भाग दळलेला मसाला आणि दोन भाग मीठ असे प्रमाण घेऊन त्यात वाटल्यास दही घातले नाही तर चालेल. हा सर्व एकत्र करून मसाला करा. जाड सालीच्या हिरव्या मिरच्यांना चीर देऊन त्यात भरा व २-३ उन्हे देऊन खडखडीत वाळवा. या मिरच्या तेल लावून तळाव्यात.
- जयबाला पवार

फणसाचे वडे
साहित्य : अर्धवट पिकलेले गरे, मीठ, हिंग, हिरव्या मिरच्या
कृती : कच्चा फणस घेऊन त्याचे बारीक तुकडे करून वाफवून घ्यावेत. गार झाल्यावर त्यात तिखट, मीठ घालून चांगले मळावे. नंतर केळीच्या पानाला थोडंसं तेल लावून त्यावर वडे थापावेत. उन्हात वाळवावेत. आयत्या वेळी तळावेत.

खुसखुशीत पेंडवडय़ा
साहित्य : बाजरीचे जाडसर दळलेले, भरडलेले पीठ. पाच-सहा हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ व जिरे.
कृती : वरील साहित्य कालवून एकजीव करावे. तळहाताला थोडे तेल लावून लहान लहान जाडसर पेंडच्या वडय़ा थापाव्यात. पोळपाटावर थोडे पीठ पसरून या २०-२५ वडय़ा उन्हात ठेवून सुकवाव्यात. नंतर एका डब्यात भरून ठेवाव्यात. जेवतेवेळी या पेंडवडय़ा भाजून अगर तळून घ्याव्यात.
- खुर्शीद शेख जुन्नरकर, अंधेरी, मुंबई

भेंडीचे वडे
साहित्य : मोठी कोकणी काकडी, पाव किलो भेंडी (मोठी चालेल), १०० ग्रॅम जाडय़ा मिरच्या
कृती : काकडीची साल काढून मोठय़ा फोडी कराव्यात. भेंडी गोल कापावी. मिरच्यांचे बारीक तुकडे करावे. मीठ घालून सर्व एकत्र परातीत कालवावे. नंतर प्लास्टिकवर हाताने वडे थापावेत. हे वडे वाळल्यानंतर तळावेत, हे वडे कुरकुरीत होतात आणि उपवासाला चालतात.
- सुहासिनी देशपांडे, मुंबई.

वनौषधी सुपारी
साहित्य : एक वाटी तुळशीची पाने, एक वाटी ओव्याची पाने, एक वाटी पुदिन्याची पाने, पाच - सहा विडय़ाची पाने, आठ - दहा लवंगा, २५ ग्रॅम बडीशेप, २५ ग्रॅम बाळंतशोपा, २५ ग्रॅम धणेडाळाची पूड, १०-१२ वेलची, एक चमचा ज्येष्ठमध पावडर, दोन चमचे आवळा पावडर, चवीपुरते सैंधव
कृती : तुळशीची पाने, ओव्याची पाने, पुदिन्याची पाने व विडय़ाची पाने उन्हात वाळवा. कडकडीत वाळल्यावर त्याची बारीक पूड करा. नंतर बडीशेप, बाळंतशोपा, धणे पावडर, वेलची हे सर्व शेकवून घ्या व मिक्सरवर बारीक करा. लवंगा व सैंधव चवीपुरते घाला. उन्हात कडकडीत वाळलेल्या पानांची पावडर, ज्येष्ठमध पावडर, आवळा पावडर व वरील सर्व साहित्य एकत्र करून काचेच्या बरणीत भरून ठेवा. रोज जेवण झाल्यावर एक चमचा ही वनौषधी सुपारी खा.
टीप : ही सुपारी विशेषत: बाळंतिणीच्या प्रकृतीला योग्य ठरते.
- विमल खाचणे, पुणे.

तळणीच्या मिरच्या
साहित्य : सहा-सात हिरव्या फुगीर मिरच्या, पाच-सहा चमचे धणे पावडर, एक चमचा मेथीची पावडर (भाजून घेणे), एक चमचा मोहरी पावडर, हिंग, मीठ, दोन चमचे लिंबाचा रस.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करावे. सांडगी मिरचीला उभा छेद देऊन त्यात वरील साहित्य भरावे व कडक उन्हामध्ये वाळवावे.
- प्रभा ताटके, पुणे

झटपट कुरडया
बाजारात (गव्हाच्या रव्याचे) दलियाचे पाकीट मिळते. त्याचा तिखट सांजा किंवा खीर बनवतात. या दलियाच्या कुरडया किंवा शिजवलेला चीक छान बनतो.
साहित्य: एक वाटी दलिया, मीठ, तुरटी, पाणी
कृती : एक वाटी (१०० ग्रॅम) दलिया भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी त्याचा आंबूस वास येतो. असे झाल्यास कुरडया करण्यास ते तयार आहे, असे समजावे. ते आंबले नाही, तर आणखी एक दिवस त्याचे एकदा पाणी काढून पुन्हा भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी काढून त्यात दोन वाटय़ा पाणी घालून हाताने व्यवस्थित कुस्करून (मिक्सरवरही हे करता येईल.)प्लास्टिकच्या गाळणीने गाळून घ्यावे. असेच पुन्हा दोन वाटय़ा पाणी टाकून पुन्हा गाळणीने गाळून घ्यावे. आता दलिया हाताला मोकळा लागतो. गाळून घेतलेले सत्त्व एकसारखे ढवळून घ्यावे.
जाड बुडाच्या पातेल्यात अथवा हिंडालियमच्या कढईत अर्धी वाटी पाणी, त्यात आवश्यकतेनुसार थोडे मीठ, अर्धी चिमुट तुरटी पावडर घालून ते पाणी उकळावे. उकळी आली की त्या पाण्यात गव्हाचे सत्त्व टाकून चांगले हलवून झाकण ठेवावे. ताटलीवर थोडे पाणी ठेवावे. पाच ते दहा मिनिटांनी झाकण काढून पुन्हा चांगले हलवून गॅस बंद करावा. सोऱ्याने कुरडया घालाव्या. (मध्यम आकाराच्या सहा ते सात कुरडया होतात.) कडकडीत वाळवून हवे तेव्हा तळाव्यात.
- नंदा पाठक, पुणे.

ज्वारीच्या पापडय़ा
साहित्य : चार वाटय़ा ज्वारीचे पीठ, दोन वाटय़ा आंबट ताक, एक चमचा जिरे, सैंधव (रुचीनुसार)
एक किलो ज्वारी दळायला देताना त्यात एक वाटी तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ टाकून दळून आणावी. रात्री आंबट ताकात पीठ भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सैंधव आणि जिरे घालावे. त्यात पाणी घालून ते शिजवावे. प्लास्टिकच्या कागदावर गोल पापडय़ा पळीने घालाव्यात. सायंकाळी कागद तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी पापडय़ा उलटून टाकाव्यात. उन्हात वाळवाव्यात. तिसऱ्या दिवशीही ऊन द्यावे. खडबडीत होईपर्यंत वाळवाव्यात.

सरगुंडे
गावठी आंब्याच्या रसात सरगुंडे घालून खातात. विदर्भात खेडेगावांत सरगुंडे, आंब्याचा रस याचे जेवण म्हणजे मेजवानी मानली जाते.
साहित्य : एक वाटी शेवयाचा रवा, साखर, मीठ चवीप्रमाणे, टूथपिक्स
कृती : रवा पाण्याने घट्ट भिजवावा. भिजवताना त्यात मीठ, साखर घालावी. दोन तासांनी दूधपाणी घालून तो मऊ करून घ्यावा. शेवयाप्रमाणे सूत बारीक काढावे. टूथपीकवर हे सूत गुंडाळावे व सुकत घरातच ठेवावे. एका तासाने ते वाळून स्प्रिंगसारखे निघतील हे सरगुंडे. गावठी न्यूडल्स म्हणा हवं तर. असे हे सरगुंडे गरम पाण्यात तेल, मीठ व साखर घालून उकळावेत.
चाळणीत काढून थंड पाणी ओतावे. गावठी आंब्याच्या रसात घालून खावेत. सरगुंडे दिसतात छान. आम्ही लहान असताना धांडय़ाच्या बारीक काडय़ा करून त्यावर शेवयाचे सूत गुंडाळून व मोठे मोठे सरगुंडे तयार करीत.
- अनुराधा गलगलीकर, नागपूर.

मिरचीचे सांडगे
साहित्य- २०० ग्रॅम हिरवी मिरची, एक वाटी भिजवलेला साबुदाणा, एक टेबल स्पून मेथी पावडर, एक टीस्पून हिंगपूड, दोन टीस्पून हळद, एक टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धी वाटी तीळ, एक टेबलस्पून जिरे, चवीपुरते मीठ.
कृती- प्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन चार-पाच तास भिजत ठेवा. मीठ घालून मिरची जाडसर वाटा. वरील सर्व साहित्य एकत्र करून त्याचे प्लास्टिक कागदावर छोटे छोटे सांडगे घालून कडक उन्हात वाळवावेत.
दही-पोहे, आंबा-डाळ यांसारख्या पदार्थात तिखटाऐवजी मिरचीचे सांडगे तळून वापरता येतात. तसेच तोंडी लावणे म्हणूनही पावसाळ्यात चांगले लागतात.

पोहे कोथिंबीर पापडी
साहित्य- दोन वाटी पातळ पोहे, दोन वाटी चिरलेली कोिथबीर, पाऊण वाटी साबूदाणा, दोन चमचे पापडखार, थोडे पांढरे तीळ, तेल, मीठ इत्यादी.
कृती - आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेले साबुदाणे घेणे. त्यात पाण्यात घालून लगेच काढलेले पातळ पोहे मिसळून त्यात पापडखार, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे तेल, मीठ हे सर्व साहित्य घालून हाताने चांगले मळून घेणे, या मिश्रणाचे छोटे गोळे करणे. नंतर पोळपाटावर तेल लावलेला प्लास्टिक कागद ठेवून त्यावर छोटा गोळा ठेवून त्याला जरा दाबून वरूनही प्लास्टिक कागद ठेवून पुरीच्या आकाराप्रमाणे चांगले पातळ लाटून घेणे. अशा प्रकारे पापडय़ा लाटून या पापडय़ा प्रथम घरातच ५-६ तास सुकवणे नंतर त्या पापडय़ा ३-४ दिवस कडकडीत उन्हात वाळवाव्यात. या पापडय़ा वर्षभर टिकतात.
- संजय देऊलकर, घाटकोपर

चवदार चिकवडय़ा
साहित्य- दीड वाटी साबुदाणा, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, चवीनुसार मीठ, एक चहाचा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, तीन-चार हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबिर.
कृती- दीड वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवावा. दुसऱ्या दिवशी दोन वाटय़ा पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, जिरे पावडर, हिरव्या मिरच्यांचा जाड सर ठेचा. कांद्याचा व टोमॅटोचा गाळून घेतलेला रस त्या पाण्यात घालावा. कोथिंबिरीची हिरवी छोटी पाने त्यात घालावी. साबुदाणा घालून चिक शिजवावा. पारदर्शक (ट्रान्सपरंट) झाला की प्लास्टिक पेपरवर चमच्याने गोल गोल पापडय़ा घालाव्या किंवा अगदी पातळसर पसरावा. या पापडय़ा थोडय़ाशा सुकल्यावर कात्रीने कापून त्याचे लांबट चौकोनी तुकडे करावेत व त्यांची पोकळ गुंडाळी करावी. कडक उन्हात वाळवून या ‘स्टिक्स’ तेलात तळून खाव्यात. चटक-मटक अशा या चिकवडय़ा चवदार लागतात.
- शीला राजपाठक, कळवा

तांदुळाच्या पापडय़ा

साहित्य- तांदूळ, मीठ, हिंग (आवडीनुसार)
कृती- तीन दिवस तांदूळ भिजत घालावेत. नंतर ते उपसून कुटावे आणि चाळणीने चाळावे (मैद्याच्या चाळणीने चाळावे). जरा दाट होईपर्यंत त्यात पाणी घालावे. त्यात मीठ घालावे. हल्ली तयार पीठ तांदुळाचे मिळते. ते एक वाटी पिठाला चार वाटय़ा पाणी व मीठ घालून दाट शिजवावे. नंतर स्वच्छ धोतरावर, प्लास्टिकच्या कागदावर पळीने त्या पापडय़ा पसराव्यात. त्या खडखडीत वाळल्यावर बंद डब्यात झाकण लावून ठेवाव्यात. पावसाळ्यात आयत्या वेळी तळाव्यात. किंवा शोभेसाठीही त्यांचा उपयोग करता येतो. या पापडय़ा ओल्या असताना निरनिराळे पाना-फुलांचे आकार देऊन त्यात खायचा हिरवा, नेहमीचा पिवळा रंग घालून तो कापून ठेवावा. वाळल्यावर पाना-फुलांचे आकार कापावेत, तारेने बांधून गुच्छ तयार करावा व उलटा धरून बाजूने तळावा व फुलदाणीत हा गुच्छ ठेवता येईल.
- लक्ष्मी पाटणकर, रायगड

भुसवडय़ा
साहित्य- एक वाटी गहू, अर्धी वाटी ज्वारीचा भरडा, पाऊण इंच आले, तीन मध्यम तिखट मिरच्या, चवीनुसार मीठ
कृती- गहू तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावे. रोज रात्री त्यातील पाणी काढून दुसरे घालणे. तिसऱ्या दिवशी गहू मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून जाडसर दळून घ्यावा. गव्हाचा चोथा पिळून गव्हाचा रस बाजूला करावा. पुन्हा थोडे पाणी घेऊन चोथा त्यात धुऊन घ्यावा. गव्हात ज्वारीचा भरडा, मिरची, आले यांची गोळी घालून ते मिश्रण गॅसवर शिजवावे. वाफ आली की, हे मिश्रण खाली उतरवून त्यात मीठ घालावे. मिश्रण मळून त्याचे गोल चप्पट गोळे करून ते उन्हात वाळवावे. ते वाळल्यावर गरम तेलात खुसखुशीत तळावेत. या भुसवडय़ा पापड-कुरडय़ाप्रमाणे चवदार लागतात.
शीला प्रधान, घाटकोपर