Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
माझ्या पावणेतीन वर्षांच्या मुलीने मला खेळता खेळता अचानक विचारलं, ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’ अचानक विचारलेल्या आणि अनपेक्षित अशा या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं, असा प्रश्न मला पडला. पालक म्हणून अनेक कसोटीचे प्रसंग आपल्यासमोर नेहमीच येतात आणि या प्रसंगांना सामोरं जाण्याचं कौशल्य हळूहळू आपल्यामध्ये येतं. मुलं जशी घडत असतात तसाच आपल्याही पालक म्हणून जडणघडणीतला हा एक टप्पा असतो. ‘चिंता म्हणजे काय’, असा वेगळाच प्रश्न मुलीने विचारल्यावर मला अर्थातच आश्चर्यमिश्रित कौतुक वाटलं, पण नुसतं कौतुक करून चालणार नव्हतं. तीन वषार्ंच्या मुलाने एखादा प्रश्न विचारला तर त्याचं

 

उत्तर मिळवल्याशिवाय पालकांना सोडेल तर ते मूल कुठलं! तिच्या प्रश्नाचं नुसतं कौतुक न करता किंवा ‘काय गं, कसले कसले प्रश्न विचारतेस’, असं झटकून न टाकता, उत्तर देणं किंवा आम्ही दोघींनी ते उत्तर शोधणं गरजेचं होतं. तिच्या प्रश्नाने आणि त्याचं उत्तर देण्याच्या आमच्या प्रयत्नाने काही गोष्टी जाणवल्या- तिचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, तिला समजेल असं उत्तर दिलं पाहिजे, उत्तर माहीत नसेल तर माहीत नाही, हे मान्य केलं पाहिजे, प्रश्नाचं उत्तर सांगताना तिच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला चालना दिली पाहिजे!
तिच्या जन्मानंतरच्या या पावणेतीन वर्षांत अशा काय गोष्टी झाल्या, ज्यामुळे तिचं बालपण आणि आमचं पालकपण समृद्ध झालं? अशा अनेक गोष्टी आठवल्या, पण लख्खपणे डोळ्यांसमोर आली ती आमची एक सुट्टीतली ट्रिप.
मी आणि माझा नवरा प्रवास करण्याचे, विविध ठिकाणी जाण्याचे शौकीन आहोत, हा शौक आमच्या मुलीलाही जडल्याचं आम्हाला जाणवलं ते आमच्या नऊ दिवसांच्या ट्रिपमध्ये. ती अडीच वर्षांची असताना आम्ही तिघं अरुणाचल प्रदेशमध्ये फिरायला गेलो होतो. आई आणि बाबा सतत नऊ दिवस सोबत, त्यांना ऑफिस किंवा ऑफिसचं काम नाही आणि त्यांचा सगळा वेळ आणि लक्ष आपल्यासाठी आहे, याचा मोठाच आनंद आमच्या मुलीला झाला आणि त्याचे अनेक सकारात्मक परिणाम आम्हाला यथावकाश जाणवले.
आम्ही सुट्टीचं प्लानिंग सुरू केलं, तेव्हा तिला समजणाऱ्या गोष्टी तिला सांगितल्या. उदा. ‘‘आपण इटानगरला प्रशांत काकाकडे जायचंय’’ यावर अर्थातच प्रश्न येणार- ‘आपण कसं जायचं? कारने की ट्रेनने?’ यावर आम्ही म्हटलं, ‘‘आधी गुवाहाटीला विमानाने आणि मग पुढे हेलिकॉप्टरने.’’ मग विचारणा, ‘‘विमानाने म्हणजे हेलिकॉप्टर ना?’’ तात्पर्य काय, तर हेलिकॉप्टर हे एक प्रवासाचं साधन आहे, ही संकल्पना फार प्रयत्न न करता मुलीला समजला!
ट्रिपसाठी सामानाची बांधाबांध सुरू झाल्यावर ‘तुला कुठले कपडे घ्यायचे?’ असा प्रश्न विचारल्यामुळे आपलं मत महत्त्वाचं आहे, याची तिला जाणीव झाली आणि तिने स्वत:ची बॅग, कपडे, खेळणी ठरवली. आम्हीही तिला झेपेल, अशी छोटी बॅग आणि तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही गोष्टी त्यात भरल्या. ट्रिपचं प्लानिंग आणि काही प्रमाणात स्वावलंबन तिने तिच्या आणि आमच्याही नकळत आत्मसात केलं.
नऊ दिवसांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी गेलो, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या माणसांना भेटलो, खूप प्रवास केला आणि या सगळ्यात आमच्या मुलीला सामील करून घेतलं. तिला अनेक गोष्टी पाहता आल्या, अनुभवता आल्या. मी आणि माझा नवरा दोघंही नोकरी करणारे. आमच्या नोकरीचा भाग म्हणून मुलीला आजी-आजोबांसोबत ठेवून आम्हाला वारंवार बाहेरगावी जावं लागतं. अर्थातच दररोज फार मर्यादित वेळ आम्ही मुलीला देऊ शकतो. त्यातही ऑफिसमधून आल्यावर इतर सर्व पालकांप्रमाणे आम्हीही थकलेले, त्रासलेले असतो. मुलगीही दिवसभर आई-बाबा मिळत नसल्यामुळे त्यांचं घरात पाऊल पडल्याबरोबर त्यांचा ताबा घ्यायला तयार असते. आपण आपल्या मुलीला थोडाच वेळ देतो, याची रुखरुख मनात असते. ऑफिसची टेन्शन्स घरात बाहेर पडू नयेत, याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि हाताशी असणारा थोडा वेळ क्वॉलिटी टाइम म्हणून वापरण्याची आणि ढी१ऋ१ेंल्लूी अल्ल७्री३८ असते. याउपर पालकत्वाच्या- आदर्श पालकत्वाच्या कल्पना आपल्या डोक्यावर स्वार असतातच. परिणाम? मुलीचा विचित्र हट्टीपणा आणि आपली चिडचिड आणि घुसमट! आमच्यासाठी ही कोंडी ट्रिपच्या निमित्ताने सुटली. आपले आई-बाबा आपल्याबरोबर, आपल्यासाठी आहेत, हा विश्वास तिला वाटला. त्यांचे मित्र- मैत्रिणी आपलेही काका- मावश्या आहेत, या काका-मावश्यांची मुलं ही आपली (आपल्या आई-बाबांच्या मित्रांसारखी) मित्रमंडळी आहेत, हे जाणवलं. सर्वसाधारणत: ज्या गोष्टी खाण्यासाठी घरात कुरकुर व्हायची, त्याही गोष्टीट्रिपमध्ये आनंदाने खाल्ल्या गेल्या. ट्रिपहून परत आल्यापासून मुलीचा हट्टीपणा कमी झाला. नेहमीच्या अनेक गोष्टी ती सहजपणे आणि आनंदाने करू लागली.
मी मानसशास्त्र हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे अर्थातच पालकत्वाच्या काही कल्पना कायम माझ्या डोक्यात असतात, पण आपले विचार, कल्पना आपल्यालाच पुन्हा तपासायला लावतं ते आपलंच मूल! माझ्याही मुलीने, पालकत्वाच्या माझ्या संकल्पना मोडीत काढल्या. अनेक नवीन अ‍ॅप्रोचेस मला तिनेच शिकवले. गंमत काय असते की, माझ्यासारखी सुशिक्षित आई मुलीबरोबरच्या प्रत्येक संवादात तिला चांगलं शिकवायचंय, तिचं व्यक्तिमत्त्व चांगलं विकसित झालं पाहिजे’, अशा विचारांच्या प्रभावाखाली असते. हे अयोग्य आहे, असं मी म्हणणार नाही. पण यामध्ये कधी कधी केवळ ‘मजेसाठी मजा’ मुलांना करता येत नाही. आमच्या मुलीच्या बाबतीत ही भर तिचा बाबा आणि तिचा आवडता श्रीकांत काका भरून काढतो. श्रीकांत काकाने तिला लहान असताना तोंडातून ‘फुर्रऽऽ’ आवाज काढायला शिकवलं, तेव्हा तिला बोलता येत नव्हतं. पण जेव्हा आमच्या संभाषणात श्रीकांतचं नाव यायचं किंवा श्रीकांत काका समोर यायचा तेव्हा तिचं ‘फुर्रऽऽ’ असायचंच. तिच्या ‘फुर्रऽऽ’मुळे आम्ही सगळेजण जे हसायचो आणि आम्हाला हसवल्याचा जो आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकायचा तेच तिच्या निरागस बालपणातले आणि आमच्या पालकत्वातले सोनेरी क्षण आहेत.
तोंडाने चित्रविचित्र आवाज काढणे, वेगवेगळ्या पद्धतीने चालणे, अशा आपल्याला अनावश्यक वाटणाऱ्या अनेक गोष्टी करायला लहान मुलांना फारच मजा येते. त्यामुळे मुलांनी शैक्षणिक खेळणी घेऊनच खेळावं किंवा ‘खेळण्यांनी फक्त खेळावं’, ‘खेळण्यांची मोडतोड करू नये’, या आपल्या अपेक्षा ‘मोठय़ा माणसांच्या’ दृष्टिकोनातून बरोबर असतात, पण मुलांचं कुतूहल, जिज्ञासा याला या दृष्टिकोनाचं बंधन नसतंच. आमच्या मुलीला खडू, पेन्सिल, वॉटर कलर, पोस्टर कलर असा खजिना सापडला आणि आमच्या जमिनीपासून भिंतीपर्यंत रंगकाम सुरू झालं. मुलीने छान रंगकाम करावं, रंगकामाची पुस्तकं आणली आहेत त्यातच रंगवावं, या माझ्या अपेक्षा तिने सुरुवातीलाच हाणून पाडल्या. कुठचाही पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर रंगाचे फराटे काढायचे, याचा तिला जो आनंद होतो; त्यामुळे माझा सगळा अभिनिवेष गळून पडतो. भिंतीवर रंगकाम करण्याचा टप्पा सर्व मुलांच्या आयुष्यात येतोच आणि माझ्या मुलीच्या बाबतीत मी पाहिलं की, हाही टप्पा लवकरच सरतो. रंगकामाचा आवाका पिंपळाच्या पानापासून ते आंबा खाऊन माखलेल्या हातांचे ठसे पांढऱ्याशुभ्र बेडशीटवर उमटवण्यापर्यंत असतो. अशा वेळी पहिली- उत्स्फूर्त प्रतिक्रिया ओरडण्याची, फटका लगावण्याचीच असते आणि तसा फटका लगावतोही. पण तिच्या बालसुलभ कुतुहलापोटीच ती असे उपद्व्याप करते, हे आम्ही समजून घेतो. आणि या समजुतीची जागा कौतुकमिश्रित आनंद केव्हा घेतो, हे आम्हालाही कळत नाही.
मोबाईल फोन, लॅपटॉप याचं नवीन पिढीला नावीन्य नाही, पण या टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा, हे त्यांना बरोबर कळतं. आई-बाबांनी ऑफिसमधून फोन केला तर त्यांच्याशी फोनवर बोलायचं नाही कारण त्यांनी लवकर घरी येऊन प्रत्यक्ष बोलावं, ही अपेक्षा! याउलट नेहमी सोबत असणारे आजी-आजोबा गावाला गेल्यानंतर त्यांच्याशी तासन्तास फोनवर बोलायचं!
कुठल्याही मध्यमवर्गीय, सुशिक्षित, मराठी पालकांचं आणि मुलांचं भावविश्व असतं, त्यापेक्षा आमचं भावविश्व फारसं वेगळं नाही. इतर सगळी मुलं करतात तसेच उपद्व्याप, खोडय़ा आमची मुलगीही करते. आम्हालाही कधी या खोडय़ांचा राग येतो, आमचीही चिडचिड होते, पण अशा खोडय़ा करणारं निरागस, उत्स्फूर्त आणि उन्मुक्त बालपण कायमस्वरूपी थोडंच टिकणार आहे? आईने मांडीवर घेऊनच झोपवावं किंवा बाबाने उचलूनच घ्यावं, असे हट्ट करण्याचे आणि ते पुरवण्याचे दिवस किती पटपट सरतात हे जाणवतं, तेव्हा मुलीचे हट्ट, उपद्व्याप यांच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो आणि तिचं बालपण आणि आमचं पालकपण आनंदमय होत जातं!
सुप्रिया देवस्थळी- कोलते
योगेश कोलते