Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
धावण्याच्या व्यायामाचं मला फार वेड आहे. गेली १५ वर्षे मी आठवडय़ाला एकूण चार दिवस पाच मैल धावायला जात असे. नंतर मी विक्रीक्षेत्रातील एक यशस्वी प्रतिनिधी या नात्याने व्यवसाय खूप वाढवला होता आणि कामाच्या स्वरूपामुळे मला खूप प्रवास करावा लागत असे. लेक आँतेरिओजवळ माझं वास्तव्य होते व तिथून न्यूयॉर्क, पश्चिम पेनसिल्वानिया व पूर्व ओहायो या राज्यांमध्ये मला कामानिमित्ताने जावे लागत असे. वर्षांला साधारणत: ३५ हजार मैल मोटारीने माझा प्रवास होत असे. कारण तिथे जाऊन मला संभाव्य ग्राहकांची भेट घ्यावी लागत असे. अतिशय जोशपूर्ण असं आयुष्य मी जगत होतो. माझ्या पायांना सतत भोवरा लागलेला असे.
काही वर्षांपूर्वी माझ्या डाव्या डोळ्यात हलकीशी ठुसठुस होण्यास सुरुवात झाली होती. पण अनेक महिने उलटल्यावरही बरं होण्याचं लक्षण दिसेना म्हणून शेवटी मी डॉक्टरांना दाखवण्याचं ठरवलं. डोळ्याच्या मागच्या बाजूस लहानशी गाठ एक्सरेमध्ये

 

सापडली. नुसती बघून तरी ती कॅन्सरची गाठ वाटत नव्हती, पण तरीही शल्यविशारदाचं म्हणणं होतं की, शक्य तेवढय़ा लवकरात लवकर ती काढून टाकणंच योग्य होतं.
नाताळच्या सणाच्या वेळी माझा प्रवास जरा कमी प्रमाणात होत असे, म्हणून १९ डिसेंबरला ऑपरेशनची तारीख पक्की करण्यास मी सांगितलं. ऑपरेशन करून घ्यावंच, असं मला तीव्रतेने वाटत होतं अशातला भाग नव्हता, पण ऑपरेशननंतर पूर्ण बरं वाटेपर्यंत माझी पत्नी बार्बरा व १९ वर्षांचा डेनिस, १७ वर्षांची बॅरी व १२ वर्षांचा चक अशा तीन मुलांच्या सहवासात तो काळ घालवता यावा, एवढीच माझी अपेक्षा होती.
ऑपरेशननंतर मी जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा मला समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. आजुबाजूला चालू असलेल्या संभाषणाचा बोध होत नव्हता. एखादं लहानसं स्वप्न पडल्यासारखंच मला वाटत होतं. मी त्या हॉस्पिटलमध्ये हरवून गेलोय, कोणीच माझ्या मदतीलाही येत नाहीय, असा अर्धवट भास होत होता. ‘जागा हो, जेरी जागा हो’ मी स्वत:लाच उद्देशून म्हणत होतो. हे तर फार भयंकर स्वप्न आहे. पण सत्य परिस्थिती अशी होती की, मुळात मला स्वप्नंबिप्नं काही पडत नव्हतं.
ऑपरेशनच्या मध्येच मेंदूतून रक्तपुरवठा करणारी शीर तुटली होती. खरं तर ते ऑपरेशन तसं फारसं अवघड नव्हतंच, पण माझ्या बाबतीतच काहीतरी मोठी चूक घडली होती. माझ्या मेंदूमधील पेशींवर सूज येऊ लागली. दुसऱ्या दिवशी माझ्या डाव्या कानशिलापाशी समोरच्या बाजूला पक्षाघाताचा झटका आला होता व त्यामुळे माझी वाचाच नष्ट झाली होती. मला बोलता येत नसल्यामुळे व चेहऱ्यावरती कमालीची भीती दाटून आल्यामुळे ते बघून माझ्या मुलीला काहीतरी शंका आली.
माझ्या मेंदूला सूज येणं चालूच होतं. संध्याकाळी मला पक्षाघाताचा दुसरा झटका आला व त्यात माझी दोन्ही डोळ्यांतील दृष्टी गेली. तातडीने दुसऱ्या ऑपरेशनची तयारी केली गेली. पक्षाघातामुळे मेंदूचा मृत झालेला लहानसा भाग काढून टाकून सूज पसरवण्यास जागा करून देणे, एवढंच डॉक्टरांच्या हातात उरलं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर माझ्या पत्नीला म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या परीने सर्व काही केलं आहे, बाकी आता परमेश्वराच्या हाती.’’ पक्षाघातामुळे माझं शरीर पूर्णपणे लुळं पडू शकतं, माझी वाचा व दृष्टी कायमची जाऊ शकेल, असं त्यांनी बार्बराला स्पष्टपणे सांगितलं.
त्यानंतर न्यूयॉर्क राज्यातील रॉचेस्टर गावातील ‘सेंट मेरीज ब्रेन इंज्युरी रिहॅबिलिटेशन युनिट’ या हॉस्पिटलमध्ये तीन महिने मला ठेवण्यात आलं होतं. त्या वेळी माझी नव्याने बायको-मुलांशी ओळख करून दिली गेली. पण ते कोण होते, याची मला कल्पनाच येत नव्हती. एकदा मला मुद्दामच माझ्या घरी घेऊन गेले, पण तिथे गेल्यावर मी थरथरू लागलो व बायकोला विचारत होतो की, आम्ही कोणत्या जागी आहोत? मी तिथली एकही गोष्ट ओळखू शकलो नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल मला परत एकदा नव्याने माहिती दिली गेली होती.
‘सेंट मेरीज’ या हॉस्पिटलमधलं वास्तव्य संपल्यानंतर एक वर्ष मी त्या हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत उपचारासाठी जात होतो. तिथले कर्मचारी, सगळे डॉक्टर्स, माझ्या घरची मित्रमंडळी यांच्या प्रचंड सहकार्यामुळे मी दैनंदिन दिनचर्येमधील एकेक काम शिकू लागलो. त्या काळात मी तिथे नेहमी लांब केस व लांब दाढी वाढलेला आणि लाल पांढऱ्या रंगाचे कपडे घालणारा एक माणूस बघत असे. त्याचे हात नेहमी लांब पसरलेले असत व त्याच्या छातीवरती मध्यभागी चमकणाऱ्या हृदयाची आकृती काढलेली दिसत असे. अशा त्या चित्रविचित्र माणसाकडे निरखून बघण्याचा माझा आवडता छंदच होऊन बसला होता. त्या वेळी मला त्याची जाणीव नव्हती की, तो माणूस मला माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसत होता व मी तर दृष्टी गमावलेली होती.
माझ्या उपचारांच्या मधल्या वेळाच्या सुट्टीमध्ये मी नेहमी चालण्याच्या मशीनच्या आधारे फिरत असे. हळूहळू माझ्या शरीरामध्ये धावण्याची ऊर्मी परत एकदा निर्माण होऊ लागत होती. पण जवळजवळ पूर्ण दृष्टिहीनतेमुळे तसं काही करण्यापासून मला परावृत्तच केलं जात होतं. एकदा प्रार्थनेच्या वेळी माझ्या अश्रूंचा बांध फुटला व परत कधी मी धावू शकणार नाही, या विचाराने कासावीस होऊन उठलो होतो. अचानकपणे माझ्या पायावरती कोणाच्या तरी ऊबदार हाताचा स्पर्श मला जाणवला व कानावर शब्द आले. ‘तू नक्कीच परत धावू शकणार आहेस.’
त्या अद्भुत शब्दांवर निग्रहाने पूर्ण श्रद्धा ठेवून मी हळूहळू खोलीतल्या खोलीतच चालण्याच्या मशीनच्या मदतीने धावण्याची कला नेटाने अंगी बाणवू लागलो. फेब्रुवारी १९९६ चा काळ होता तो. हळूहळू सराव करत शेवटी मार्च महिन्यात मी घराबाहेर धावण्यात तरबेज होऊ लागलो. खाली पडून मला लागू नये किंवा मी कुठेतरी भलतीकडे जाऊन हरवू नये, अशी माझ्या घरचे काळजी घेत असत. जवळजवळ एका वर्षांच्या कालावधीनंतर मी परत घराबाहेर-मोकळ्या मैदानात धावू लागलो होतो आणि माझं शरीरही बऱ्यापैकी मला साथ देत होतं. मी जेव्हा आमच्या घराजवळच्या मोठय़ा तलावापर्यंत पोहोचू शकलो, तेव्हा अत्यानंदाने ओरडलो होतो- ‘‘हॅलो, हॅलो लेक आँतेरिओ, मी आलोय म्हटलं - मी जेरी सुलिवन!’’
वाढत वाढत मी एका आठवडय़ात एकूण २० मैल धावायला लागलो होतो. माझ्या मित्रांनी मला ‘सेंट पॅट्रिक्स डे फाईव्ह माइल्स रन’ या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी नेले होते. किती अपूर्वाईचा क्षण होता तो! मी पुन्हा एकदा धावू शकत होतो. म्हणजे मला जणू जीवनपुनप्र्राप्तीचाच आनंद झाला होता.
त्यानंतरचं ध्येय होतं - मोटार चालवण्याचं. मी जवळजवळ पन्नास टक्के दृष्टी गमावलेली होती आणि तरीही परत मोटार चालवण्यास शिकलो. गाडी चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाचणी परीक्षेतही मी उत्तीर्ण झालो. माझ्या सासूबाईंनी मला एक छोटीशी भेट दिली- मोटारीत चिकटवून ठेवण्यासाठी एक धार्मिक स्टिकर. त्या स्टिकरवर एका माणसाचा फोटो होता. लांब केसांचा व लांबलचक दाढी वाढवलेला एक माणूस व त्याच्या अंगावरती लाल-पांढऱ्या रंगाचे कपडे आणि त्याच्या छातीच्या मध्यभागी चमकणाऱ्या हृदयाची आकृती! मी बरा होत असताना मला वारंवार दिसणारा तोच तो माणूस!
या कर्मधर्मसंयोगाला काय म्हणायचं, हे मला समजत नाही. पण श्रद्धेमध्ये किती अभूतपूर्व शक्ती, सामथ्र्य असतं, हे मात्र मला माहिती आहे.
मूळ कथा - जेरी सुलिवन
One Step at a Time
स्वैरानुवाद : उषा महाजन
sayhi2usha@rediffmail.com