Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
स्त्रीआत्मचरित्रांच्या लाटेत, जाणिवांचा पूर्णतया भिन्न पट उलगडणारी दलित आत्मकथने आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्टय़ांनी ठळकपणे उठून दिसतात. माणसा-माणसांतील दरीचं भीषण वास्तव्य मांडणाऱ्या, दलित मनांमध्ये कोंडलेल्या कैक व्यथांना वाचा फोडणाऱ्या, खास करून स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन देणाऱ्या दोन आत्मकथनांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपल्याच समाजाचा एका मानसशास्त्रज्ञाच्या नजरेतून वेध घेणारे बेबी कांबळे लिखित ‘जिणं आमुचं’ आणि शिकण्याची आस बाळगत शिक्षणाधिकारी होण्यापर्यंतचा विस्मयकारक जीवनप्रवास चित्रित करणारे शांताबाई कांबळे लिखित ‘माज्या जल्माची चित्तरकथा’.
खरं तर ‘जिणं आमुचं’ ही कोणा एका व्यक्तीची कहाणी नाही, तर गावकुसाबाहेरचं, मागतेपणाचं लाचार जिणं जगणाऱ्या संपूर्ण समाजाचीच ती चित्तथरारक कहाणी आहे. हे आत्मकथन म्हणजे बेबीताईंनी आपल्या समाजाच्या दडपलेल्या भावभावनांची,

 

व्यथा-वेदनांची, जाणिवा-नेणिवांची मांडलेली कुंडली आणि उर्वरित समाजाच्या मानसिकतेचा केलेला पंचनामाच होय. हे करताना बेबीताईंची लेखणी कधी तप्त लाव्हा बनून तथाकथित उच्चवर्णीयांवर आग बरसते तर कधी तटस्थपणे स्वत:च्याच समाजाचे मूल्यमापन करते.
बेबीताईंचा जन्म त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे वडील ठेकेदार होते. मुलांची आबाळ होऊ नय,े म्हणून त्यांची आई माहेरीच असे. एका मुलाच्या जन्मानंतर त्यांना तीन मुली झाल्या, पण त्या जगल्या नाहीत. त्यानंतर बेबीताईंचा जन्म झाला. पण नवसासायासानं झालेली ही मुलगी वर्षभरातच एका आजारपणात थंडगार होऊ लागली. आजूबाजूला रडारड सुरू झाली. मुलीच्या आईला चक्कर येऊ लागली. म्हणून त्या छोटीला लवकर पुरण्याचे ठरते. दोन गडी कुदळ-खोरे घेऊन खड्डा खणू लागतात, पण आई मुलीला सोडायला तयार होत नाही. शेवटी त्या मातेची दया येऊन काही काळ थांबायचे ठरते. तोवर आजोबा पांडवप्रताप वाचू लागतात आणि एकाएकी अंग टाकलेल्या त्या छोटय़ा मुलीची पापणी हलू लागते. तिच्या नाकासमोर धरलेला कापूसही हलू लागतो. पुन्हा देवाला साकडं घातलं जातं. आता मुलीचं अंगही गरम वाटू लागतं आणि सर्वत्र आनंदीआनंद होतो. यावर बेबीताई म्हणतात-
‘‘ खरोखर माझा प्राण गेलेला असता तर मी जिवंत होणे कसे शक्य आहे? परंतु आमची अनेक तान्ही मुले अशीच अध्र्या निम्म्या अवस्थेत असताना गाडली गेलेली आहेत. अनेक दिवसांच्या आजारामुळे मुले थंड पडतात आणि रात्रीच्या अंधारात ती मेल्यागत वाटतात, हे यावरून स्पष्ट होते. देव-देवऋषी करून जर मुलाची हालचाल जाणवायला लागली की सगळे श्रेय गुडदेवांना मिळते आणि पुन्हा त्यांची पकड देवावर अधिक बसते. या अंधविश्वासानं जशी मी गाडली जात होते, तशा अनेक पिढय़ा गाडल्या गेल्या आहेत हेच खरे.’’
अशा रीतीने वीरच्या महारवाडय़ात बेबीताईंचा जन्म झाला. महारवाडा म्हणजे गावाबाहेरच्या उकिरडय़ाजवळची जागा. इथली घरं म्हणजे गवताकाडीनं शाकारलेल्या खोपटय़ा. त्याला छोटं दार. पावसात गळणारं, उन्हात तापणारं आणि धुळीच्या फुफाटय़ानं हैराण करणारं हे घर. आत गाडगी-मडकी, जातं, तवा आणि उलथणं. देवाचा देव्हारा हे त्यांचं मुख्य वैभव. एकेका घरात दहा-दहा बारा-बारा उघडी-नागडी मुलं. त्यातला मोठा मुलगा हा देवाला वाहिलेला पोतराज.
दैन्य आणि भूक यांची इथे कायमची वस्ती. आषाढाचे दिवस म्हणजे यांच्यासाठी सुखाची पर्वणी. त्यातले मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवसांमध्ये देवीच्या नैवेद्याच्या निमित्ताने चार चांगलेचुंगले घास पोटात जायचे हे दिवस. आषाढी अमावस्या म्हणजे देवीची जत्रा. मग बायकांच्या अंगात देवी येणं, देवीपुढे नाक घासणं, तिला हळदी-कुंकवाचा मळवट भरणं आणि रेडा वाहणं. देवीला नैवेद्य दाखवून झाला की, तिखटजाळ रश्श्यात त्या रेडय़ाचे मांस शिजवून पाहुणे मंडळींबरोबर मुलाबाळांनी त्यावर ताव मारत पुढच्या वर्षांपर्यंत अज्ञातवासात जीवन कंठायचं.
सगळ्या महारवाडय़ात बेबीताईंच्या आजोबांचंच घर तेवढं सुशिक्षित. ते पुण्या-मुंबईसारख्या शहरांमधून बटलरचं काम करायचे. त्यांना तेव्हा १६ रुपये पगार मिळत असे. सबंध गावात एवढा पगार मिळणारा कोणीच नव्हता. मग पोस्टमननं मनीऑर्डर आणली की, सगळं गाव चावडीवर गोळा व्हायचं. पोरांनी भाकरतुकडा संपवला की, भुकेल्या बाया आजीकडे यायच्या. मग उन्हात वाळलेले भाकरीचे तुकडे त्यांनी फस्त करावेत आणि तांब्याभर पाणी पिऊन घरी जावं. बाया-बापडय़ांनी चुलीसाठी सरपण म्हणून लाकडाच्या बिंडय़ा विकायला जाताना गावातल्या प्रत्येक माणसाच्या पाया पडावं. बामण आळीत ती बिंडं विकताना आधी परसदारी नेऊन त्याची शिग लावावी. मग विटाळ होऊ नये म्हणून महारणीनं प्रत्येक लाकूड, तिचा केस किंवा तिच्या वस्त्राचा दोरा त्याला लागला नाही ना, हे पाहून पुन्हा ती रास लावावी आणि पुढे येऊन छातीएवढय़ा उंच भिंतीवरून फेकलेली नाणी झेलावीत. गावातल्या लग्नात महारणीनं खराटा घेऊन अख्खा मांडव झाडावा आणि त्या बदल्यात उष्टय़ा-खरकटय़ा अन्नाच्या पाटय़ा चावडीवर घेऊन याव्यात. त्यावर सगळ्या महारांनी मिटक्या मारत आपली भूक शमवावी.
पुढे आजीची सावली सोडून बेबीताई फलटणला येतात. त्यांचे वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते. ते या अडाणी लोकांना वर्तमानपत्रे वाचून दाखवत. चावडीवर बाबासाहेबांच्या भाषणांवर चर्चा करीत. बेबीताईंवरही डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडला. आत्मचरित्राच्या अंतिम टप्प्यात शाळेतील सवर्ण मुलींबरोबर झालेल्या लढाईचे आणि फलटणमध्ये बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाचे वर्णन बेबीताई विलक्षण तन्मयतेने करतात. जनावराचं जिणं जगणाऱ्यांना माणसात आणणाऱ्या डॉ. आंबेडकरांबद्दलचा भक्तिभाव त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतो.
‘माज्या जल्माची चित्तरकथा’ ही शिक्षणासाठी घेतलेल्या ध्यासाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातल्या चढउतारांची आणि अस्पृश्य म्हणून आलेल्या अनुभवांची चित्तरकथा होय. मुळात दुसऱ्याची चाकरी करून अन्नासाठी वणवण करणाऱ्या शांताबाईंच्या, म्हणजेच लहानपणच्या नाजुकाच्या आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटून त्यांनी आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी जिवाचं रान करावं, हीच मोठी कौतुकाची गोष्ट. त्यातही अर्धपोटी राहत नेटाने शाळेत जाऊन शिष्यवृत्तीवर शिक्षण घेणारी त्यांची लाडकी नाजुका. मध्येच आई गेली तरी हिम्मत धरून सातवी पास होत आईचं स्वप्न पूर्ण करणारी त्यांची नाजा!
आजूबाजूला सर्वत्र भुकेचा आगडोंब, खपाटीला गेलेली पोटे आणि विझलेले डोळे. खाण्याचे फारच हाल झाले की, नाजुकालाही तिच्या भावंडांबरोबर चालत चार कोस दूर असलेल्या तिच्या थोरल्या बहिणीकडे जाऊन भूक भागवावी लागत असे. तशातच लेकीला मास्तर नवरा करण्याचं तिच्या आईचं आणखीन एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी कांबळे मास्तरशी नाजाचे लग्न लावून दिले जाते. पण बायको गरोदर असतानाच मास्तर मामाच्या मुलीबरोबर दुसरं लग्न करतात. सवतीबरोबरची भागिदारी सहन न करता ताठ मानेनं नाजा माहेरी निघून येते. शिक्षणानं तिला दिलेला हा पाठीचा ताठ कणा! त्यातच माघारी आलेल्या मुलीच्या मागे ठामपणाने उभे राहणाऱ्या, बायकोला न्यायला आलेल्या मास्तरला हाकलून लावणाऱ्या आणि मुलीच्या नोकरीसाठी तिच्या बरोबरीनं दगदग करणाऱ्या, तिच्यावर मायेची पाखर धरणाऱ्या नाजाच्या बापाची, तिच्या अप्पाची चित्तरकथाही वाचकांना हेलावून सोडते.
आत्मचरित्राच्या पूर्वार्धात आयुष्यातल्या या वणव्यांची व्यथा तर उत्तरार्धात बायको मेल्यानंतर माघारी न्यायला आलेल्या मास्तरांबरोबरची संसारकथा! शिक्षकी पेशातल्या बदल्या, बाळंतपणे आणि नातेवाईकांची उस्तवार करता करता प्रकृतीची हेळसांड होते, पण मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी करणे चालूच राहते. हे सव्यापसव्य करता करताच महार मुलांना शिक्षणाकडे वळवून प्रौढ शिक्षणवर्गही चालू ठेवले जातात. तरीही दलित समाजातल्या या पहिल्या शिक्षिकेला मात्र पाण्यासाठी दाही दिशा फिराव्या लागतात. कारण त्यावेळी महारांना सार्वजनिक विहिरींमधून पाणी नेण्याची केलेली बंदी! केवळ जातीवरून माणसाचं मोजमाप करणारी स्वतंत्र भारताची ही स्थिती आणि वाटय़ाला आलेले भोग निमूटपणे भोगणारी इथली अश्राप प्रजा! अर्थात डॉ. आंबेडकरांनी मात्र या मृतवत् झालेल्या समाजात प्राण फुंकून त्यांच्यात आत्मतेज निर्माण केले. त्यामुळेच पुढे ट्रेनिंग कॉलेजमध्ये मात्र अस्पृश्यतेच्या घटनेचा शांताबाईंनी घेतलेला समाचार त्या अगदी रंगवून सांगतात.
स्त्रीच्या नजरेतून सामाजिक दुभंगलेपणाचा परखड लेखाजोखा मांडणारी, प्रस्थापित समाजव्यवस्थेलाच जाब विचारणारी ही दोन पहिलीवहिली दलित आत्मकथने. या आत्मकथनांमुळे दलित स्त्रीच्या दु:खांबाबतचे मौन खऱ्या अर्थाने गळून पडले. दोन्ही आत्मकथनांमधील असह्य़ नरकयातना सोसणाऱ्या दलित वस्तीचे चित्रण वाचकांना मुळापासून हादरवून सोडते. ‘भूक’ हा या दोन्ही आत्मकथनांमधला समान धागा. भूक सोसता सोसता हळूहळू माणसाच्या पाठीचा कणा झिजतो, अन्नासाठी लाचार होताना तर तो पार लुळा पडतो. भूक, जी माणसाच्या ‘स्व’चा चुराडा करते, त्याच्या आत्माभिमानाचा पाचोळा करते, जिवाला लाचार, असहाय्य, अगतिक बनवून त्याच्यातला पशू जागृत करते. केवळ नरदेह प्राप्त झालेली ही बिनशेपटाची जनावरेच जणू! त्यांच्यातल्या नवजन्माचे सोहळेही भुकेनेच साजरे होतात. बाळ बाहेर आल्यानंतर रिकाम्या झालेल्या पोटातली आग विझवायला एखाद्या ओल्या बाळंतिणीला चोरून मक्याची कणसं खायला भाग पडावं आणि राष्ट्राचं भवितव्य असलेला तो कोवळा जीव डोळे उघडतानाच धूळमातीत निपचित पडावा. भारतीय समाजव्यवस्थेचा हा कलंकित इतिहास वाचताना आमच्या पांढरपेशा सुखवस्तू जगण्याची लाज वाटावी आणि आमचा अंतरात्मा खाड्कन जागा व्हावा, हेच या आत्मकथनांचे सारसंचित!
डॉ. उज्ज्वला करंडे
ujwala.karande@yahoo.com