Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
जेजुरीला पहिल्यांदा गेले, तेव्हाची म्हणजे जवळजवळ ३०-३२ वर्षांपूर्वीची आठवण एका गाण्याची आहे. त्यानंतर अनेकदा जेजुरीला जाणं झालं. देवळाचा आणि गावाचा बदलता परिसर पुन्हा दिसत गेला. ते गाणं मात्र कानांनी पुन्हा ऐकण्याची वेळ आली नाही.
या बाई जेजुरी नगरात
कोऱ्या चंदनी महालात
म्हाळसा-बाणाई झुंजती
देखोनी म्हल्हारी हासती
नंतर वाचनाच्या ओघात हे गाणं कागदावर भेटलं. इतरही काही वाघ्यामुरळ्यांची गाणी ऐकायला-वाचायला मिळाली. उदा. खंडेरायासाठी त्याच्या लाडक्या राणीनं म्हणजे म्हाळसेनं घंगाळात आंघोळीचं पाणी काढलं आहे. साळी, डाळी आणि शेवया वेळल्या आहेत. देवाला तृप्त करण्याची सगळी तयारी आहे आणि मग मनातली खंत ती बोलून दाखवते आहे.
आला बानूला घेऊन, पुरविला हेत
सवतीला आणून ठेविली रंगम्हालात
सा म्हैने मजला न्हाई तुमचं दर्शन
का कठोर झाला बानूच्या नादानं?
खंडोबाच्या अवताराची कथा ज्यांना माहीत असेल, त्यांना या दोन्ही गाण्यांचा किंवा बानू-म्हाळसेच्या झगडय़ाची हकिकत सांगणाऱ्या इतरही गाण्यांचा अर्थ सहज समजेल. खंडोबा किंवा मल्हारी हा मूळचा शिवमहेश्वर आहे. अमृतमंथनाच्या वेळी

 

विष्णूनं घेतलेल्या मोहिनी रुपावर तो भाळला आणि त्यावेळी विष्णूनं पृथ्वीवर जन्म घेऊन शिवाबरोबर पत्नी म्हणून नांदण्याचं त्याला वचन दिलं. त्यानुसार शिव जेजुरी गडावर खंडोबा म्हणून आला आणि तिम्माशेट वाण्याच्या घरी म्हाळसा होऊन मोहिनीनं जन्म घेतला. दोघांचं थाटात लग्नही झालं.
असं स्वर्गात ठरलेलं लग्न! ते व्हावं, म्हणून स्वलरेक सोडून दोघंही देव पृथ्वीवर खाली आलेले. तरीसुद्धा खंडोबा बानू धनगरणीच्या प्रेमात पडला. तिच्यासाठी जेजुरी गड सोडून रानावनात फिरला. तिच्यासाठी वेश पालटून त्यानं तिची मेंढरं चारली आणि अखेर तिला घेऊन सरळ तो जेजुरी गडावर राहायला आला. म्हाळसेचा संताप अनावर झाला असला तर नवल नाही. बानूशी भांडायला, नव्हे तिला मारायलाही म्हाळसेनं कमी केलं नाही. बानूला तिनं हिणवलं, जातीवरून डिवचलं, स्वत: लग्नाची पहिली बायको असल्याचं ठणकावलं आणि तिच्या झिंज्या ओढून तिला महालाबाहेर हाकलण्याचाही तिनं प्रयत्न केला.
पण म्हाळसेचा प्रयत्न यशस्वी होणार कसा? बानूला तर खुद्द मल्हारीनं अगदी विनवण्या करून गडावर आणलं आहे. तो बानूच्या प्रेमात आहे. तो पुरुष आहे. राजा आहे. या दोघींवरही त्याचा अधिकार आहे. त्यामुळेच देवाची मनधरणी करण्यावाचून म्हाळसेला दुसरा पर्याय नाही. त्यानं आपल्या महालात यावं, यासाठी धडपडणं आणि जमेल तो प्रयत्न करून त्याची मर्जी राखणं, या पलीकडे ती काय करू शकते?
अर्थात बानूला मल्हारीनं स्वत: आणलं आहे. ती त्याला आवडलेली आहे, तोपर्यंत (आणि तोपर्यंतच) तिचं वर्चस्व म्हाळसेला मान्य करावं लागणारच. कौटुंबिक सत्ताकारणात आणि अर्थकारणात हिरीरीनं खेळत राहणारी प्यादी म्हणजे सवती आणि त्यांची संतती. (खेळवणारा त्यांचा दादला.)
किती जणींनी या परंपरामान्य प्रथेचे भले-बुरे परिणाम अनुभवले आहेत! ज्यावेळी या दु:खात वैयक्तिक शब्द देता येत नव्हता, तेव्हा रुक्मिणी-सत्यभामेच्या निमित्तानं किंवा रुक्मिणी-जनी-तुळशीच्या निमित्तानं बायकांनी आपलं मन मोकळं करत आतला दु:खभार थोडा हलका केला आहे. कृष्णाला म्हणजेच विठूला तुळस अतिप्रिय. दरवर्षी तुळशीचं लग्न देवाशी करण्याची प्रथा तर आजही आपल्याकडे आहेच. रुक्मिणीच्या मुखानं कितीक बायका सवत तुळशीशी भांडल्या आहेत. तिची उणीदुणी काढून बोलल्या आहेत. तिला हिणवून, टोचून बोलताना जणू त्यांच्या मनाची रग थोडी कमी झाली आहे.
तुळशी गं बाई,
तुला नाही नाक-डोळे
अशा सावळ्या रूपाला
कसे गोविंद भुलले?
तुळशी गं बाई
काय हे तुजं जिणं!
पांडुरंगा संगे-
वर्सावर्साला लगीन!
रुक्मिणी सुंदर आहे! संपन्न घरातून आलेली आहे! तुळशीला दर वर्षी लग्न करून पांडुरंगाबरोबरचा आपला संबंध समाजमान्य करून घेण्याची केविलवाणी धडपड करावी लागते, पण रुक्मिणी त्याची प्रतिष्ठित अशी पट्टराणी आहे. तुळशीचा अपमान करताना रुक्मिणी आपलं हे सगळं संचित शस्त्रासारखं वापरते.
मात्र अंतर्यामी तीही दु:खीच आहे. ज्याची पत्नी म्हणून ती समाजात मिरवते, सौभाग्य चिन्हं लेवून वावरते, तो बाह्य़त: तिचा असलेला नवरा पूर्णपणे तिचा नाही. तिनं त्याला सगळं देऊन टाकलं आहे. तो मात्र फक्त काही अंशीच तिचा आहे. ती त्याची एकमेव सहचरी नाही. रुक्मिणीच्या प्रतिष्ठेला या दु:खाचं मोठं भिरुड लागलेलं आहे.
जनीबाबत तर तिनं कितीदा तरी विठ्ठलाला छेडलं आहे आणि दरवेळी त्यानं तिला उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. कधी पोरकं पाखरू रात्री वस्तीला आलं होतं म्हणून सांगितलं आहे, तर कधी जनी फक्त दही-भाताची शिदोरी मला द्यायला आली होती, असं म्हटलं आहे.
रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
‘पोरकं पाखरू राती वस्तीला आलं हुतं?
रुक्मिण इचारते लपविता काय हरी?
माज्या जनीनं आणली दहीभाताची शिदोरी..
फार अस्वस्थ करतात दरवेळी या ओव्या, ही गाणी. शेवटी बानू आणि म्हाळसा काय किंवा रुक्मिणी आणि तुळशी काय, एकमेकींशी भांडणाऱ्या-तंडणाऱ्या, एकमेकींना ओरबाडू पाहणाऱ्या या बायका दु:ख भोगतात आणि त्यांना त्या दु:खाचा वाटेकरी बनवणारा पुरुष मात्र त्या दु:खापासून झटकून दूर असतो. तो तर स्वत:साठीच एकापेक्षा अधिक संबंध ठेवतो ना! त्याच्या सुखाचीच तर ती तजवीज असते ‘म्हाळसा-बाणाई झुंजती, देखोनी मल्हारी हासती’ असं उगाच नाही गाण्यात म्हटलं गेलं.
पुरुषाच्या जातीची ही लबाडी भिल्लांच्या एका गाण्यात अगदी आपोआप उघड होते पहा. गाणं रणधीर खरे यांनी गोळा केलेल्या संशोधनपूर्वक संपादित केलेल्या आणि उत्तम इंग्रजीत अनुवादलेल्या अनेक भिल्ल गीतांपैकी एक आहे. मराठी अनुवाद माझा. एक नवरा आपल्या बायकोशी अगदी प्रेमानं बोलतो आहे.

किती बारीक आणि सुंदर तुझी कंबर!
पाण्याच्या घागरी न् गवताचे भारे वाहणं
शेतातल्या पिकाची झोडपून मळणी करणं
सोसणार नाही गं तुला, सोसणार नाही.
किती कोवळे, पालवीसारखे तुझे हात!
उन्हानं कडक न् पावसात धारदार
कसा तू ओढशील पोहऱ्याचा दोर?
सोसणार नाही गं तुला, सोसणार नाही.
किती नितळ आणि नाजुक तुझे पाय!
मैल न् मैल चालणं, लाकडं गोळा करणं
आणि पुन्हा घराकडे पायपीट करत येणं
सोसणार नाही गं तुला, सोसणार नाही.
तू तर अश्शीच देखणी हवीस मला
अजिबात ताण न् कष्ट नकोत तुला
म्हणून मी आणीन एक बाईलच करून
उन्हा पावसात राहील जी घट्ट तग धरून
जी हंडे उचलील न् गवत कापील
शेतावरच्या धान्याची मळणीही करील
तुझा माझा स्वैपाक करील, तुझी-माझी पोरं वाढवील,
त्रास तुला कसलाच होणार नाही गं, होणार नाही.
या त्याच्या अत्यंत सोयिस्कर विधानांवर आता आणखी भाष्य करण्याची गरज तरी आहे का?
अरुणा ढेरे