Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

ललित - कुल्फी ते गोळा..
उन्हाचा कासरा केव्हा तुटला, कळलंच नाही. धावतच सुटला. यंदा त्याने लवकरच घाई केली. चैत्र सरला की हा पळायची वाट बघायचा. या वर्षी चैत्र लागून एकच दिवस उलटला आणि धापा टाकीतच तो सर्वाच्या मागे धावू लागला. लहान-थोर उन्हाने कसे कासावीस होतात, याची मजा हा उन्हाळा बघायचा. लाही लाही अंगाची, शरीराची. त्याला कोठे बांधावं? झाडा-झुडुपांच्या कारागृहात! पण ती आहेत तरी का पुरेशी? आम्हीच उजाड केले सर्व. त्यानं मिटावं कशात!
काथेमामाला असा विचार करायला वेळ नव्हता. पाटणच्या एका कानोल्यासारख्या गावातील काथेमामा. मुलांच्या परीक्षा झाल्या की, त्याचा कुल्फीचा डेरा दाखल व्हायचा कोकणात. शेतात बायको राबायची. भागायचं नाही, कर्ज अंगावर. आत्महत्या केली नाही एवढंच. कष्टाची तयारी होतीच. गेली दहा वर्षं तो या दोन महिन्यांत येतो. पाणी

 

पडलं की, जातो गावाकडे. उन्हाचा धबडगा असला तरी संसाराच्या धबडग्यात त्याला स्थान टिकवायचं होतं. लहानपणी हट्ट करणारा दिगू. आता विसावं लागलं. काथेमामांनी त्याच्या हातात गोळ्याची गाडी दिली. बर्फ आणायचा तो, पण दोन कोसावरून. मुलगा यायलाच तयार होईना.
‘‘आरं, कसं म्हणतोस! तिथं कोण नाय गळणारा गोळा घेऊन येत. तू चल बक्कळ मिळतात.’’
‘‘समदं कापडं लाल हुत्यात- मी नाय.’’
‘‘नान्हा होतास, तवा तूच माझ्या मागे लागत हुतास ना! आता कष्ट करायला मागे बघतूस होय रं!’’
चार आण्याची लिमलेटची गोळी हातावर टेकवीत समजूत घालावी, तशी समजूत घालून झाली.
पत्र्याच्या त्या खोलीत एक चूल, भाकरीसाठी तवा, परात, कुल्फीसाठी भांडी, मटका, झोपायला वाकळ. बसं एवढाच संसार. नदीवर जायचं, आंघोळीला पाणी तरी होतं का नदीवर? डबकी सारी आटलेली. अंगावर पाणी घ्यायचं. आतले कपडे डोक्यावर वाळवत खोलीकडे यायचं. मग दिगूने जायचं.
घरात फक्त विस्तवच. यंदा जास्तच तापलं. झाडांमुळे थंडावा असतो, पण त्याचा उपयोगच नाही. चुलीपुढं दिगू भाकऱ्या थापायला बसला.
मामा दोघांच्या धंद्याची तयारी करायचा. काठय़ा, बर्फ, दूध साखर, पावडरी. गोळ्याचा लाल-हिरवा पाक.
दिगूला या दोन महिन्याचा कंटाळाच येई. चूल पेटवताना आईची आठवण यायची. पण बापाच्या काळ्या, एक पंजा नसलेल्या वेदनेपुढे त्या अविरत कष्टाचा पाढा सोसण्यापुढं त्याची नजर स्थिर व्हायची. ‘‘बहीण, भाऊ आनंदाने टिपरीचा डाव खेळत असतील. शेवग्याच्या झाडाला दोर बांधला असेल. धाकटीनं पाळणा केला असेल बाहुलीचा. आपण पण त्यात होतो ना. आता मात्र बापासाठी कष्ट करायला हवेत.’’
काथेमामा घामाच्या वळणाकडे लक्ष न देता मन लावून अभंग गुणगुणत कुल्फीचे त्रिकोण भरत होता.
दिगूचं आज काही भाकरीत लक्ष लागत नव्हतं. दातात काही अडकल्याचं निमित्त करून बाहेर आला तो. झुडुपाच्या सालीचं कोरणं करून दातात घालू लागला.
‘‘आरं तिथं हायेत लाकडं. बाहेर कशाला जातूया!’’
‘‘किती साधा सरळ हा! प्रत्येक गोष्टीत काळजी घेतो.’’
भराभर परात हालली. अकराच्या पुढे दोघांना निघावंच लागे. दिवस लोटल्यावर परत येतील दोघे. गाडी निघाली. कुल्फीचा डेरा डोक्यावर. पोरांच्या घोळक्यानं कामाचा बाजार होई. झाडाखाली थांबलं, तरी पोरांना पत्ता लागायचा. त्यातल्या त्यात केसांचं बोचकं करून आलेल्या पोरींना आधी गोळा द्यायचा. उगीच घरची आठवण म्हणून. काथेमामा वरच्या पाटाला जायचे. दिगू खालच्या पाटाने पण रायआवळ्याच्या गल्लीत बाप-लेक दोघंही भेटायचे. भाकरी खायच्या निमित्ताने. निवांत टेकायचे. मामा शर्ट काढून झाडाला टांगायचे. पांढरी टोपी झटकून काढायच. जमलेला घाम खाली पडण्यासाठी. पण रंगीत बनियनमधून घामाचा रस गळायचा. उन्हात हिंडून काथेमामा वयापेक्षा जास्तच वयस्क दिसायचा. दिगू पण रंगीत झालेला शर्ट काढायचा. बर्फ धरून बोटांवर रेघा उमटायच्या. लाल पिवळ्या रेघा- आक्रसलेली बोटं. उन्हात ताणून धरायचा. वाटेत मिळालेली कैरी किंवा लाल तिखट कांदा आणि भाकरी. बाकी कोरडय़ाला काही नाही. तेव्हा दिगूला ताटात सांडलेल्या पातळ कालवणाची आठवण यायची. घरची. बापासमोर बोलायची सोय नव्हती. एकदाच आठवण काढली तर बालपण मांडलं डोळ्यांसमोर.
‘‘पोरा, भाकर तरी बघतूस, मी बापासंग जायचो. दुसऱ्याच्या शेतावर. फकस्त कस्ट. दिवसाला यक भाकर मिळायची. बापाचं कस्ट पाहून त्यालाच द्यायचो.
‘‘का बरं’’.
‘‘मला तवापासूनच त्याच्याकडे बघवायचं नाही. मालक देईल, त्यात काय काय पुरवायचं? इकडे-तिकडे मागून मी पोट भरायचो.’’
दिगूवर ती वेळ नव्हती आलेली. दिगूला ते ऐकवलंच नाही. पुढय़ातले कष्ट उपसण्यासाठी त्याची मानसिकता तयार झाली होती. दिगूने पटापट पाण्याबरोबर भाकरी संपवली. बाटली रिकामी केली. एरवी पाणी लागतं कोमट, पण थोडा बर्फाचा तुकडा जवळ केला की, काथे मामांना पण भाकरी खायला मजा यायची.
दिगू गाडीच्या खाली बांधलेली घंटी वाजवत निघाला. निवडुंगीच्या भागात आल्यावर त्याला प्रश्न पडायचा. या भागात निवडुंग कसा? एकीकडे लाल-पिवळी रंगांची फुले पांघरलेली उंच डेरेदार झाडे. दिगूला हा भाग आवडायचा. त्याच्या प्रश्नांना उत्तरे तरी कोण देणार?
घंटी वाजवत निघाला. बराच बर्फ बाकी होता. नाही संपला तर नुकसानच. बापाला काय वाटेल? बापाचाच विचार करीत सावलीने गाडी पुढे ओढू लागला. त्याच्या कष्टाचा विचार करण्याची वृत्ती तेवढय़ा शिक्षणाने त्याच्यात आली होती. बोरीच्या पाठीमागे लंगडणारी चारू राहायची. दिगूची घंटी वाजली की, आपल्या धाकटय़ा शेंबडय़ा भावाला काखोटीला मारत ती तळपत्या उन्हात गाडीपर्यंत यायची. बोरीच्या झाडाची झिरपणारी सावली त्यातही गाडी बराच वेळ उभी राहायची. चारू कशीतरी उभी राहत रुपयाचा गोळा खायची, मधूनच भावाला चाटवायची.
मामा आता वरच्या आळीत थोरल्या वाडय़ावर यायचा. तोच तो घामेजलेला सदरा-पाझरणारा घाम घेऊन वाडय़ातल्या मुंबईच्या पाहुण्यांना कुल्फी द्यायचा. २०-२२ कुल्फी खपायची. या पंधरा दिवसांत जरा जास्तच दूध लागायचं. पण मामाने कष्टाचा विचार केला नाही. मामाचीच कुल्फी खायची अशी सक्त ताकीद मुलांना होती. जेवणं आटोपल्यावर झोपाळ्याचा कुंई कुंई आवाज पेंगुळल्यावर मामा यायचा.
पेंगुळलेल्या डोळ्यांनी कुल्फी खाल्ली की, पोरांना दमटावीत, झोपवत मोठी पण खायची. मामाला पण निवांतपणे बसावंसं वाटायचं खरं. झोपाळा कसला, सारवलेलं घर कसलं? धंद्याच्या निमित्ताने पत्राच कामाला आला आणि तेच घर. पण त्याच घरात तयार झालेली कुल्फी भल्या मोठय़ा वाडय़ातील माणसं खातात, याचं अप्रूप त्याला होतं. एक डगाभर पाणी आणण्यासाठी करावे लागणारे कष्ट तो विसरून जायचा. लहानपणी पाठ झालेले अभंग त्याच्या कामी आले. तुकाराम तर आवडता. त्याही परिस्थितीत मामा ‘आनंदाचे डोही’ विसरला नव्हता.
दररोज सव्वाशेच्या आसपास गल्ला मोजताना दिगूला शाळा आठवायची. भावाच्या शिक्षणाची मनोराज्य बांधायचा तो. आपल्यालाही पुढे शिकायचं आहे ,हे तो विसरू शकत नव्हता.
पुन्हा एकदा बापलेक कुंभारवाडय़ापाशी एकत्र भेटले. शेवटच्या राहिलेल्या कुल्फ्या स्वस्तात तर फुकटात वाटण्यासाठी तो इकडे येई. दिगूच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानेही शेवटचा राहिलेला बर्फ इथेच संपवायचा असं ठरवलं होतं. ना कधी मामाने दिगूला शिकवलं, ना दिगूने असा धर्म करायचा, म्हणून कधी बापाची परवानगी मागितली तरी दोघांतला हा दानाचा धागा दोघांना जवळ आणत होता.
मामा दिगूचं मोठं पण कुल्फीच्या टोपलीतून, अभंगांच्या स्वरातून, या दानातून बांधत होता. भविष्यातल्या इमारतीचा पाया होऊ पाहात होता. इकडे दिगू आज गल्ला जास्त जमला की काय, म्हणून चाचपडत होता.
उन्हाच्या गोणी भरभर उसवत होत्या. दिवसभर दोघांनीही त्याची तमा केली नाही. दिगूचे हात, शर्ट लाल हिरवे निळे झाले होते. सप्तरंग फक्त. त्यातच तो उद्याची स्वप्न पाहात होता. स्वत:ला समजावीत होता. ‘‘काहिली तर होणारच. सांजच्याला थंडावा असतोच की’’ अशी समाधानी वृत्ती दिगूला मोठं करीत होती.
आता उन्हानं दम तोडला होता. आजच्या दिसाला बास, असं म्हणत त्याने एका क्षणात अभाळात बदलाव आणला.
‘‘आरं’’ दिगूने आभाळाकडे पाहिलं. ‘‘आज येतूस की काय?’’ मनाशी संवाद साधत गालात हसत, गाडीवरून झिरपणाऱ्या बर्फाचं थेंब थेंब पाणी मातीत कशी नक्षी करत जातंय, यावर ध्यान ठेवत दिगू आपली गाडी जोरजोरात पळवत होता.
दीपाली कात्रे