Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

दिल से - नौतपा आणि फुहार
‘दिल से’ लिहिले जात आहे- मध्य प्रदेशातील भोपाळमधून.. म्हणजेच ‘देश के दिल से’! मध्य प्रदेशातील समाज, संस्कृती आणि बदलत्या जीवनाचा वेध..
‘‘काय झाले? अलीकडे लेख नाही तुझा बऱ्याच दिवसांत? आणि भोपाळच्या पावसानंतर भोपाळची थंडी, भोपाळचे ऊन असे लेख नाही लिहिलेस ते?’’ फोनवर माझा मित्र मला विचारत होता. त्याच्या स्वरात मला चिडविण्याची सुप्त इच्छा आहे हे ओळखूनही अजिबात विचलित न होता मी म्हटले, ‘‘लिहीत आहे न पुढचा लेख - नौतपा आणि फुहार.’’ ‘नौतपा’ शब्दाला तो अडखळणार याची मला खात्री होती. झालेही तसेच. ‘‘नौतपा म्हणजे?’’ त्याने विचारले. मीदेखील हाच प्रश्न विचारला होता.
‘‘कम तपेगा नौतपा, आंधी बारीश के योग’. सकाळीच ‘दैनिक भास्कर’ नावाच्या इथल्या स्थानिक वर्तमानपत्रातली बातमी वाचता वाचता मी वळून ऑफिसमधल्या माझ्या सहकाऱ्यांना विचारले होते. ‘‘ये नौतपा क्या होता है?’’ गप्पांचा अड्डा

 

जमण्याची जरा जरी शक्यता निर्माण झाली तर दाणा-चाऱ्याभोवती भरारा पाखरे जमा व्हावीत, तसे इथे लोक भोवती येऊन बसतात. कुणाला कसलीच घाई नाही की, काही टोक गाठण्याची हौसही नाही. मुंबईकर माणूस बिचारा बिछान्यात उठतो, तोच मुळी घराबाहेर जाण्याच्या धसक्याने. इथे सगळेच निवांत. भोपाळ आणि विशेषत: मध्य प्रदेशविषयी मी लिहीत आहे, याची एव्हाना सगळ्यांनाच कल्पना आहे. त्यामुळे मला माहिती पुरविणे हे ऑफिसच्या कामापेक्षाही महत्त्वाचे कार्य असल्याप्रमाणे माझे सहकारी माझ्याभोवती जमा झाले. ऑफिसमधील सकाळच्या पहिल्या चहा-कॉफीच्या कपासोबत ‘नौतपा’ची आणि त्या अनुषंगाने एकूण हवामानाची चर्चा सुरू झाली. ‘नौतपा’ म्हणजे पावसाआधी मे महिन्याच्या अखेरीस नऊ दिवस ऊन दर दिवशी चढत जाते. सूर्याच्या रोहिणी नक्षत्राच्या प्रवेशापासून नौतपाचे दिवस सुरू होतात. या दिवसातल्या तापमानानुसार पावसाचे भविष्य वर्तवण्याची इथे खूप जुनी परंपरा आहे. रोहिणी नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या सूर्याची किरणे पृथ्वीवर सरळ रेषेत पडल्यामुळे उष्णता खूप वाढत जाते. असं म्हणतात की, जितका ‘नौतपा’ तापेल तितका पाऊस चांगला होईल. नौतपाच्या शेवटच्या दिवशी बहुधा पाऊस पडतो. पेपरातील बातमीनुसार, ज्योतिषांच्या मते या वर्षी २५ मे पासून सुरू होणारा ‘नौतपा’ कमी तापेल. त्यातच बुधाच्या वक्री असण्यामुळे या काळात सोसाटय़ाच्या वादळ-वाऱ्यासहित पाऊस होईल, असाही अंदाज आहे. याचा परिणाम पावसावर होईल. ‘कमी तापणार नौतपा’ ही बातमी आगामी पाऊस चांगला नसण्याची नांदी आहे, हे सांगता सांगता भोपाळसह इतर ठिकाणच्या मे महिन्यामधील आँधी-तुफानच्या गोष्टी सुरू झाल्या.
ऑफिसमध्ये कानपूरवासीयांचा एक मोठा जथ्था. या लोकांना ऑफिसच्या मागच्या अंगणात राहण्याची सवय. म्हणजे बहुधा ते कंपाऊंडवरून उडी टाकून ऑफिसमध्ये पोचत असावेत. ‘‘हमारे यहाँ काली आँधी आती है उन दिनों में। इतनी तेज काली हवा की घर पहुंचने में बडी दिक्कत हो जाती है।’’ (यात ‘दिक्कत’ म्हणजे पाच मिनिटांऐवजी पंधरा मिनिटे लागत असावीत त्यांना घरी पोचायला!) कानपूरवासीय ‘काली आँधी’बद्दल सांगू लागले. मे महिन्याच्या अखेरच्या दिवसात कानपूरच्या पट्टय़ात काळी रेत घोंघावते. इतका काळा कुट्ट अंधार दाटून येतो की, भर दिवसाही मोटारींचे दिवे लागतात. सगळ्या शहरभर काळी धूळ पसरते. सोसाटय़ाचा वारा सुटतो. ‘‘नौतपा हा शब्द कानपूर, लखनौ, दिल्ली या सगळ्या भोपाळच्या वरच्या पट्टय़ात वापरला जातो की, हा केवळ स्थानिक प्रकार आहे?’’ मी विचारलं, तर उत्तर मिळालं की, हा केवळ इथलाच शब्द आहे. आश्चर्य वाटलं, कानपूर पाठोपाठ आपापल्या शहरांतील आँधी-तुफानच्या हकिकती निघू लागताच सगळ्यांना कामाला हाकारून मीही कामाला लागले खरी, पण तसा नौतपा मनातून गेला नाही. हा शब्द मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला. नवीन शब्दापाठोपाठ सावलीसारखा नवा अर्थ मनात उमटतो. वाटले, हा शब्द किंवा ही संकल्पना इथेच या पट्टय़ात असण्याचे काय कारण? एकूणच नऊ आकडय़ात असे काय विशेष? ग्रह नऊ आहेत. नव्याचे दिवस नऊ असतात. नवरात्रीचे नऊ दिवस असतात. यांचा हा नौतपा तापतो तोही नऊ दिवसच. २७ मधून नऊच गेले तर बाकी शून्य उरते म्हणतात. नवाचे एक कोडेच आहे खरे!
उन्हाच्या झळांनी सध्या इथे पहाटही तापून उगवत आहे. दुपारी तर रस्त्यावर शुकशुकाट व्हावा, अशा उन्हाच्या ज्वाळा उठतात. कदाचित महाराष्ट्रात इतर ठिकाणी अजून ऋतुमानानुसार निसर्गाचे बदलणारे रूप नजरेस पडत असेलही, पण मुंबईमध्ये मात्र सगळेच ऋतू सपक एकसारखे झाले आहेत. भोपाळ म्हणजेही काही पश्चिम देशांमधील ठिकाण नव्हे की ‘फॉल’ म्हणताच सगळी धरती नारिंगी व्हावी आणि ‘समर’ म्हणताच रंगीबेरंगी फुलांनी सजून जावे, पण तरीही इथे ऋतूंचे येणे-पलटणे प्रकर्षांने जाणवते. केवळ निसर्गच बदलतो असे नाही, तर ऋतुमानानुसार माणसांचे व्यवहारही बदलताना ठळकपणे नजरेस पडतात. लहान असताना कधीतरी मी इंदौरला गेल्याचे आठवते. इंदौरची माझ्या मनातली आठवण होती, रस्तोरस्ती उसाच्या रसाची दुकाने असण्याची. भोपाळला मागच्या वर्षी मी आले तर माझ्यापाठोपाठ लगेच पाऊस येऊन दाखल झाला होता. वर्षभर मी आश्चर्य करीत राहिले की, इंदौर शहरातील इतकी उसाच्या रसाची दुकाने माझ्या आठवणीत कशी राहून गेली आहेत? आणि इथे तर एकही उसवाला दिसत नाही. जणू उसाचा रस इथे मिळतच नसावा. बरं, भोपाळ-इंदौर या दोन शहरांत फार काही फरक असण्याचे कारण नाही. बहुधा माझी आठवणच चुकीची असावी, अशा निष्कर्षांप्रत मी पोचतच आले होते की, उन्हाळा सुरू झाला आणि रस्तोरस्ती भुईछत्रासारखे रसवाले उगवले. तेव्हा कुठे लक्षात आले की, माझ्या आठवणीतली ती सुट्टी मे महिन्याची होती.
थंडी पडावी तर रस्तोरस्ती गाद्या आणि रजईवाले दिसतात. हायवेवर डाळिंबं विकायला गर्दी करून बसलेल्या फळवाल्यांप्रमाणे कुणी नाक्यानाक्यांवर गाद्या घेऊन विकायला बसावे, याचे तेव्हा आश्चर्यच वाटून गेले होते. मुंबईला स्वेटर घेऊन नेपाळी लोक रस्त्यावर दिसू लागले की, लक्षात येते की बहुधा थंडीचा मोसम सुरू झाला असावा. मात्र स्वेटर घालण्याइतकी थंडी कधीच हाती सापडत नाही. इथल्या कडाक्याच्या थंडीत नाक-कान गुरफटून शेकोटीभोवती दाटून राहिलेले अवघे शहर पाहिले आणि आठवले काही अंशी अशी थंडी कधीतरी लहानपणी दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला वाजायची. दात थडथडायचे आणि नुकत्याच न्हालेल्या ओल्या केसांचा गंध हवेत मिसळून जायचा. जशी मुंबईची संस्कृती सपाट व्यक्तिमत्त्वहीन होत गेली तसे तिथले ऋतूही व्यक्तिमत्त्व हरवत गेले की काय न कळे. कानपूरवाल्यांच्या ‘काली आँधी’ पाठोपाठ मेमधील सुट्टीच्या अखेरीस येणारी धुळीची वादळं आणि वळवाच्या सरी आठवल्या होत्या. वाटलं, ती दिवाळीची थंडी, मेमधील वळवाचा पाऊस, धुळीची चक्रीवादळं कधी लुप्त होऊन गेली, ते जगण्याच्या नादात ध्यानातच आले नाही की आपल्या! ऋतूंचा बहर झाडांवर, फुलांवर, पाखरांवर आणि माणसांवरही होतो, याची प्रकर्षांने जाणीव या शहराने पुन्हा एकदा करून दिली. निसर्गाच्या प्रत्येक विभ्रमाची, ऋतू पालटण्याची इथे बातमी होऊन येते. मग तो नौतपा असो की, हाडात घुसणारी थंडी असो. अगदी साधा लग्नाचा मोसम सुरू होऊन शहरात अलाण्या-फलाण्याचे पहिले लग्न पार पडल्याचीदेखील पद्धतशीर बातमी पेपरात वाचायला मिळते. चैत्रातले कोकिळचे कूजन, पळस-पांगाऱ्याचे बहरणे, नव्या तकतकीत पालवीने झाडांचे सजणे, हे घडते तर सर्वत्रच, पण त्याचे कौतुक थबकून पाहायला ‘पाखरांसाठी घरोघर पाणी ठेवा किंवा सुकलेला बडा ताल खोदून काढा’, म्हणून वर्तमानपत्रीय आव्हानाला भरभरून प्रतिसाद द्यायला या शहरापाशी अजून संवेदना आहे, हातात वेळ आहे.
..आणि फुहार म्हणजे पाऊस! ढगातला पाऊस इतका हलका, की पाऊस पडत असावा, अशी केवळ शंका मनात यावी. पाऊस पडून गेल्यावर हवेत पावसाचे थेंब राहून जातात. बर्फ भुरभुरावा तसा हा पाऊस भुरभुरत राहतो. असं म्हणतात की, हादेखील पाऊस केवळ इथलाच. सर्वार्थाने मी इथला निसर्ग लिहावा, असे वाटणारी माझी एक मैत्रीण म्हणाली होती, ‘‘मुझे तो लगता है कि इतनी बारीश इस साल हो जाए कि सिर्फ तुम्हारे लिखने के लिए बदबदा डॅम खुल जाए।’’
भोपाळ ही राजा भोजाची नगरी. एकाहून एक सुंदर तळी या शहरात आहेत. त्यातही ‘बडा ताल’ आणि ‘छोटा ताल’. हे दोन तलाव शहराचे केंद्रबिंदू आहेत. ‘बडा ताल’ तर इतका अलोट मोठा की जणू समुद्रच अवतरलेला भासावा. कोलांस नदीवर मातीचे धरण बांधून भोजाने अकराव्या शतकात या तळ्याची निर्मिती केली. तलावाच्या एका अंगाला अलीकडे १९६५ मध्ये ११ द्वारांचे धरण बांधण्यात आले आहे. शहराला अधिकतर पाणी याच तलावातर्फे पुरविले जाते. ११ दारांचा तोच हा बदबदा डॅम! बडा तालची कथा सांगितली जाते की, एकदा भोजराजाला त्वचारोगाने ग्रासले. कुणाच्याही औषधाने गुण येईना. तेव्हा एका योगीपुरुषाने त्याला सांगितले की, ३६५ झरे असतील असा तलाव खोदून त्यात स्नान केल्यास त्याचा रोग पूर्णपणे बरा होईल. सर्वत्र शोध घेतला गेला. राजाच्या तंत्रज्ञांना बेतवा नदीपाशी एक योग्य जागा सापडली. पण तिथे केवळ ३५९च झरे होते. राजाच्या गौंड सरदार कालियाने मग त्याला एका अदृश्य नदीचा पत्ता सांगितला आणि ३६५ झऱ्यांचा आकडा पूर्ण झाला. राजाने तलाव खोदून घेतला. पाण्याचा अलोट समुच्चय होऊन ‘बडा ताल’ समुद्रसदृश शहरात पसरला. भोजाची भोपाळ नगरी बडा तालभोवती वाढली, बहरली. पाण्याभोवती संस्कृती वाढते. प्राणी-पाखरांचे जीवन फुलते. पाण्याभोवती सगळेच जीव एकवटतात आणि म्हणूनच गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाअभावी सुकलेला, रोडावलेला बडा ताल हे आज प्रत्येक भोपाळवासीयांचे दु:ख! रोडावलेला बडा ताल भरून ११ दारांनी बदबदाचे धरण उघडले जावे, ही आज इथे ज्याची-त्याची इच्छा.
अलीकडेच ऐन उन्हाळ्याच्या मुहूर्तावर मडईच्या जंगलात गेलो होतो. मडई भोपाळपासून अवघे तीन- साडेतीन तास अंतरावर. अगदी कान्हा-बांधवगडसारखे दाट जंगल. पण फारसे कुणाला माहीत नसलेले. किंबहुना, आमचा बेत ऐकून अगदी भोपाळमधील माणसांनीही मडईचा ठिकाणा विचारावा इतके अपरिचित ठिकाण. मडईला पोचेपर्यंत सपाटून पावसाचा मारा व्हावा, तसा उन्हाचा मारा होत राहिला. मध्ये दिलासा केवळ होशंगाबादच्या घाटावरील नर्मदेचा. वाटेतही रस्ता शोधताना लोकांनी ‘मडई’ हे नावही इतके आश्चर्याने घ्यावे की, जणू हा शब्द प्रचलितच नसावा. पुढे जात होतो खरे, पण शेवटी शेवटी वाटू लागले की, कुठल्या अस्तित्वात नसलेल्या ठिकाणचीच आपण चौकशी करत असू बहुधा. उन्हाने होरपळून निघालेल्या निर्मनुष्य प्रदेशातून गाडी सुसाट धावत होती. भोवताली सुकलेली झाडे. डोळ्याला कुठे ना पाण्याचा विसावा, ना हिरव्याचा ओलावा. शेवटी एकदाचे मडईला पोचलो. किमान एक रेस्ट हाऊस तळपत्या उन्हात उभे असण्याचा आनंद. (आनंद ही किती सापेक्ष कल्पना आहे!) रेस्ट हाऊससमोर विस्तीर्ण अवकाश नजरेस पडावा असे खुलेपण. पुढय़ात देनवा नदीचे कृश पात्र. पावसाळ्यात नदी भरभरून वाहत असल्याच्या खुणा नजरेस पडाव्यात. नदीपलीकडे मडईचे जंगल. प्राण्यांच्या शक्यतेने उभे असलेले. सगळे तसे विलोभनीय, तरीही भाजत्या उन्हाने जीव करपून जावा. अशा उन्हात काय प्राणी नजरेस पडणार? संदेह होताच.
ऊन उतरले, तसे चारच्या सुमारास जंगलात जायला निघालो. नदीकडच्या उतारावर पावले पडू लागली आणि पावसाचे पहिले हलके थेंब अंगावर पडल्याची जाणीव झाली. पावसाच्या शक्यतेने बावचळून आभाळाकडे पाहिले तर दूर उजवीकडच्या क्षितिजापाशी काळ्या ढगांचा गुच्छ दाटून आलेला. जसजसे नदीपाशी पोचू लागलो, तसा वाऱ्याचा वेग वाढू लागला. गव्हाच्या सोनपिवळ्या शेतातून, कलिंगडाच्या हिरव्या-काळ्या मळ्यातून रस्ता काढत जाता जाता पार ढकलले जावे, असा वारा सोसाटून वाढला. स्वत:ला सावरता सावरता प्रत्येकजण तारांबळू लागला. पावसाची गती वाढली. थेंबाचे टपोरपण अंगावर घेत बदललेल्या हवामानाचे आश्चर्य मनात बाळगत नदीवरील रंगीत फ्लोटवर जाऊन उभे राहिलो, तर समोर सोंडेने पाणी उडवत आनंदाने देनवात नहात असलेला एक रानहत्ती आणि पलीकडच्या काठावर हिंदळणाऱ्या नावा. अंगभर पाऊस. दिवसभराचे ऊन सत्य की हा पाऊस? आभाळात गडगडाट. शांत, निपचित पडलेली देनवा जणू प्रेयसीच्या आवेगाने उचंबळून आलेली. तिच्यात इतक्या लाटा उसळत आहेत की, फ्लोटवर तोल सावरणेही कठीण जावे. पाऊस झेलत, देनवाच्या लाटांमध्ये पाय सोडून बसून राहिलो तर खूप वरून माथ्यावरून काहीतरी जात असल्याची स्पष्ट जाणीव झाली. लहानपणच्या पुस्तकात सूर्याचा सोळा घोडय़ांचा रथ असायचा. वर आभाळात उजव्या क्षितिजावरून जाणाऱ्या रथात सदेह वारा होता की, पाऊस याची मला कल्पना नाही, पण असाच एखादा सोळा घोडय़ांचा रथ वर ढगाआडून जात असावा अशी उगीच एक दाट शक्यता वाटत राहिली. देनवाच्या पाण्यात नहात असलेला हत्ती, त्यापार मोराचे केकावणे, आभाळभर विजांच्या रुपेरी चमकदार रेषा आणि उचंबळून आलेली देनवा. हे सारे आमच्यासाठी असण्याचे कारण नव्हते, पण निसर्गातली एखादी अद्भुत सुंदर गूढ शक्ती क्षितिजापार जात असताना आम्ही तिथे उभे होतो, हे मात्र खरेच! पावसाचा रथ ढगाआडून पलीकडे गडगडत निघून गेला. सारे काही शांतवले. नावाडी आला. नाव पलीकडे गेली. नावेबाहेर उडी घेऊन पुन्हा मागच्या विस्तीर्ण प्रदेशावर नजर टाकली. हत्ती शांतपणे पाण्याबाहेर आला होता. देनवा पुन्हा पहिल्यासारखीच कृश दिसत होती. पावसाने मात्र आपला स्पर्श हवेवर सोडून दिला होता. पुसटसा सूर्य उगवला आणि डावीकडे संपूर्ण प्रदेशात इंद्रधनुष्याची अर्धवर्तुळाकार कमान अवतरली. एका कमानीचे कौतुक, आश्चर्य करीत आहोत, तोच त्या खाली अस्पष्ट दुसरी कमान दिसू लागली. एकेकदा निसर्ग असे दान देऊन जातो की, घेताना आपले हात तोकडे पडावे. दोन कमानी पाहता पाहता आभाळात तिसरेही इंद्रधनुष्य दिसत आहे की काय, अशी शंका जागी झाली. एकाच वेळी तीन तीन इंद्रधनुष्य कधी दिसतात का? की ती नुसतीच भूल आहे? ठाव घेतला आभाळाचा, मनाचा, पण खात्रीने सांगता येईना. तिसरेही इंद्रधनुष्य तिथे आहे?.. नाही? असेलही?.. नसेलही! मडई-चुरणा जंगलात प्राण्यांची लयलूट. पुढे तीन दिवस आमच्यासोबत पाऊस मडईला मुक्कामाला राहिला. मडईच्या जंगलातून पुन्हा भोपाळमध्ये परतलो तर पारा पार वपर्यंत चढलेला. पाण्याचे दुर्भिक्ष्य. पाखरांच्या चोची वासलेल्या, माणसांची पाण्यासाठी चाललेली तडफड. बडा ताल सुकून रोडावलेला. शहरभर पाण्याची वानवा आणि मनात मात्र मडईचा पाऊस वस्तीला येऊन ठाकलेला!
माणसाने आशावादी तरी किती असावे म्हणते मी? मध्य प्रदेशच्या आगीच्या फुफाटय़ात फिरतानाही मनात मडईचा पाऊस आहे, फुहार आहे. ‘कम तपेगा नौतपा’ असे कितीही म्हटले असले, तरीही २५ मेपासून सुरू झालेला ‘नौतपा’ चांगला तापेल, अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा मी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. नौतपा संपेल, त्या दिवशी माझ्या घराशेजारील आंब्यावर पहिला पाऊस वाजेल. झाडावरून जमिनीवर उतरेल. सोसाटेल. झाडे लवलवून हलू-डुलू लागतील. सुकून गेलेला बडा ताल भरभरून वाहू लागेल. ११ दारांनी बदबदा उघडला जाईल. सहस्रधारांनी अलोट पाणी पृथ्वीवरून धावू लागेल. पाण्याच्या लोटात तापलेली अवघी जमीन निवून जाईल. तृप्त हिरवी होईल. पाण्यासाठी आसुसलेल्या अवघ्या जगाची- प्राण्या-पाखरांची, मुला-माणसांची तल्लखी दूर होईल. कालगतीतले एक वर्ष गेले आहे, अनेक उलथापालथींसह. तरीदेखील नौतपाच्या लाटेतही ती फुहार पाहत आहे, कारण मला माहीत आहे की जगण्याच्या सगळ्या तपाअंती शेवटी उरतो, तो शुद्ध आनंद. इतका विशुद्ध, शाश्वत आणि बदबदासारखा अलोट की, अवघा ताप निवून जातो.
मित्रा, लिहित आहे ‘नौतपा आणि फुहारबद्दलच!’ लक्षात घे, नौतपा जितका तापेल, तितकी पावसाची आणि पर्यायाने फुहारची शक्यता अधिक. आणि जे शाश्वत आहे ते सगळ्यापार राहून उरते. मनावर पसरत जाते. मडईमधील तिसऱ्या इंद्रधनुष्यासारखे. असेलसे.. नसेलसे!
.. आणि फुहार म्हणजे पाऊस! ढगातला पाऊस. इतका हलका भुरभुरणारा, की हा पाऊस अंगावर न पडता थेट मनावरच पडत राहतो.
राणी दुर्वे
ranidurve@hotmail.com