Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

अग्रलेख

चक्रीवादळाच्या अंतरंगात..

 

मान्सूनच्या केरळमधील आगमनाची प्रतीक्षा होत असतानाच बंगालच्या उपसागरात एका चक्रीवादळाची निर्मिती सुरू होती. गेल्या २३ तारखेला मान्सून केरळात दाखल झाला आणि बंगालच्या उपसागरात ‘एला’ नावाच्या चक्रीवादळाने आकार घेतला. ते दोनच दिवसांनी पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर सागर बेटांजवळ धडकले. पश्चिम बंगाल व शेजारच्या बांगलादेशाने त्याचा आघात अनुभवला. पश्चिम बंगालमध्ये शंभरजणांचा मृत्यू, बांगलादेशात सुमारे सव्वादोनशे बळी, पन्नास लाख लोकांना बसलेला फटका, पाऊस-समुद्राच्या लाटांमुळे जलमय झालेला किनारी भाग, डोंगरी भागातही पावसामुळे दरडी कोसळून प्राणहानी, हजारो घरांची पडझड, कोलकात्यासह बहुतांश भागात खंडित झालेला वीजपुरवठा आणि आता वादळ शमल्यानंतर रोगराईची भीती व पुनर्वसनाचे आव्हान.. एका मध्यम स्वरूपाच्या चक्रीवादळाच्या रूपात नैसर्गिक घटनांचे रौद्र रूप पाहायला मिळाले. या वादळाचा प्रभाव त्याच्यामुळे झालेल्या नुकसानीपुरताच मर्यादित नाही, तर या वादळाच्या जोडीनेच मान्सून ईशान्य भारत व पश्चिम बंगालमध्ये नियोजित वेळेपेक्षा दोन आठवडे आधीच दाखल झाला आणि आता मात्र काही काळासाठी आहे त्या जागीच थबकला आहे. ‘एला’ चक्रीवादळाने भारतीय उपखंडातील समुद्रावरील जास्तीत जास्त बाष्प वापरल्याने व वाऱ्याची दिशा बदलल्याने हे सर्व पूर्ववत होईपर्यंत तरी (आणखी चार-पाच दिवस) मान्सून पुढे सरकणार नाही. अशी चक्रीवादळे भारतीय उपखंडासाठी नवी नाहीत. उपखंडात दरवर्षीच अशी चार ते सहा चक्रीवादळे निर्माण होतात. त्यातही अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरातच त्यांची संख्या अधिक असते. या वादळांचा काळही तसा ठरलेला आहे. पावसाळा समजल्या जाणाऱ्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये शक्यतो ती हजेरी लावत नाहीत. त्याऐवजी मान्सूनपूर्व (मार्च ते मे) आणि मान्सूनोत्तर (ऑक्टोबर-नोव्हेंबर) काळातच ती प्रामुख्याने निर्माण होतात. ही वादळे भारताप्रमाणेच मुख्यत: उष्ण हवामानाच्या प्रदेशातच ( विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना) तयार होतात. या प्रदेशातील उष्णतेमुळे समुद्रावर हवेचा कमी दाब निर्माण होतो आणि मग इतर ठिकाणची हवा कमी दाबाच्या दिशेने वाहते. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याचा परिणाम म्हणून ही बाहेरून येणारी हवा थेट कमी दाबाच्या क्षेत्रात प्रवेश करीत नाही, तर ती त्याच्या भोवती फिरत राहाते. त्यातूनच चक्रीवादळाचा जन्म होतो. बाष्प मिळत जाईल तसे ते अधिक तीव्र होत जाते आणि किनाऱ्याकडे येऊन विध्वंस घडवते. त्याच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढावे लागते. म्हणूनच तर चक्रीवादळांची निर्मिती पृथ्वीवर विशिष्ट पट्टय़ातच होते. भारतीय उपखंडात ती ‘सायक्लॉन’ म्हणून ओळखली जातात. अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन बेटांच्या परिसरात उद्भवणारी ‘हरिकेन’; जपान, तैवान, चीन, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया या भागातील ‘टायफून’, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या परिसरातील ‘विली-विली’ हीसुद्धा हवामानाच्या दृष्टीने आपल्या चक्रीवादळांचीच भावंडे! त्यामुळेच अमेरिकेत २००५ साली विध्वंस करणारी ‘कॅटरिना’, ‘रीटा’, ‘डेनिस’ ही वादळे किंवा चीन-तैवान-इंडोनेशियामध्ये धडकणारी ‘डय़ुरियन’सारखी वादळे आणि भारतीय उपखंडातील चक्रीवादळे यांच्यात निर्मितीच्या दृष्टीने फरक करता येत नाही. या वादळांची निर्मिती लाखो-कोटय़वधी वर्षांपासून सुरूच आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सतराव्या शतकात म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात अशी वादळे आल्याच्या लिखित नोंदी आहेत. भारताचा पूर्व किनारा व बांगलादेश तर चक्रीवादळांसाठी अधिकच प्रवण असल्याने तिथेसुद्धा अशा नोंदी आहेत. अलीकडच्या काळात, १९७० साली आलेल्या ‘भोला’ चक्रीवादळाने बांगलादेशात पाच ते दहा लाख लोकांचा बळी घेतला. १९९१ सालच्या एका चक्रीवादळात बांगलादेशात दीड लाख लोक मृत्युमुखी पडले. १९९९ साली ओरिसात आलेल्या ‘सुपर सायक्लॉन’चा मानसिक आघात अजूनही कायम आहे. गेल्याच वर्षी बांगलादेशात पोहोचलेल्या ‘नर्गिस’ या वादळाने एक लाख ४० हजार लोकांचा बळी घेतल्याची नोंद झाली. अलीकडच्या काळात अरबी समुद्र पार करून ओमानच्या आखातात पोहोचलेले ‘गोनू’ हे वादळही असेच प्राणघातक आणि तेथील खनिज तेलाच्या अर्थव्यवस्थेवर आघात करणारे ठरले. या वादळांमुळे होणारे विस्थापन व आर्थिक नुकसानीचा आकडा फारच मोठा आहे. हे नुकसान मोठे असले तरी अलीकडच्या काळात अशा चक्रीवादळांचा वेध घेण्याची पद्धत सुधारल्याने वादळापासून बचाव करून घ्यायला पुरेसा अवधी मिळू लागला आहे. खरे तर चक्रीवादळांचा अशाप्रकारे वेध घेण्याची पद्धत भारतात हवामान विभागाची स्थापना (१८७५) होण्याच्या दहा वर्षे आधीपासून अस्तित्वात आलेली आहे. पण तंत्रज्ञानात प्रगती होत गेली, तशी चक्रीवादळांची निर्मिती व त्यांची किनाऱ्याकडे सरकण्याची दिशा या गोष्टी अधिक अचूकपणे हेरणे शक्य होत गेले. त्यातही विशेषत: अवकाशात सोडण्यात आलेले हवामान उपग्रह आणि किनाऱ्यावर उभारण्यात आलेली डॉप्लर रडार यांच्यामुळे हे काम जास्त चांगल्याप्रकारे होऊ लागले. त्यामुळे आता भारतच काय, पण जगाच्या कोणत्याही भागात निर्माण होणारे कुठलेच चक्रीवादळ या उपकरणांच्या ‘नजरे’तून सुटू शकत नाही. डॉप्लर रडारमुळे या वादळांच्या अंतरंगात सुरू असलेल्या हालचाली जाणून घेणे शक्य असल्याने वादळांची किनाऱ्याकडे सरकण्याची दिशा, त्यांची तीव्रता आणि किनाऱ्यावर पोहोचण्याची वेळ याबाबतची माहिती नेमकेपणाने मिळू लागली आहे. भारताचा पूर्व किनारा अशा चार डॉप्लर रडारने सज्ज आहे, तर श्रीहरिकोटा येथे भारतीय अवकाश संशोधन संघटनेतर्फे (इस्रो) भारतीय बनावटीचे असे एक रडार उभारण्यात आलेले आहे. आता तर केवळ भारतच नव्हे तर उपखंडातील आठ देश एकत्र येऊन वादळांचा वेध घेऊ लागले आहेत. (म्हणूनच वादळांना या वेगवेगळय़ा देशांची ‘एला’, ‘गोनू’, ‘ओग्नि’, ‘सिद्र’, ‘मूरजान’ अशी चित्रविचित्र नावे दिली जात आहेत.) चक्रीवादळे हेरणे आणि त्याबाबतच्या तंत्रज्ञानात जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारत मागे नाही. भारतातील हवामानाच्या अंदाजांची टिंगल केली जात असली तरी या संदर्भात हवामान विभागाने मोठी प्रगती केली आहे. आता तर डॉप्लर रडारचे जाळे अधिक व्यापक करण्यात येत आहे. तसेच ‘इन्सॅट-३ डी’ हा पूर्णपणे हवामान व सागरी सर्वेक्षणासाठी वाहिलेला उपग्रह याच वर्षी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर चक्रीवादळांचा अधिक अचूक वेध घेता येईल. आपल्याकडे चक्रीवादळांचा असा वेध घेण्याच्या पद्धतीत वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. त्यानुसार त्याबाबतचे पूर्वानुमान व माहिती सरकारच्या संबंधित विभाग व प्रशासनाला पुरवली जाते. अशी सर्व व्यवस्था असूनही या वादळांमुळे इतके नुकसान का होते, हा प्रश्न उरतोच! एक तर चक्रीवादळे निर्माण होण्यापासून रोखणे, त्यांची तीव्रता कमी करणे किंवा त्यांची दिशा बदलणे हे अजून तरी माणसाला शक्य झालेले नाही. (अमेरिकेत असे प्रयोग सुरू आहेत, पण त्यांनाही अपेक्षित यश आलेले नाही.) त्यामुळे वादळाचा अंदाज मिळाल्यावर लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा आणि आपत्ती हाताळण्याचे कौशल्य या बाबतीत आपण बरेच मागे आहोत आणि चक्रीवादळांमुळे घडणाऱ्या नुकसानीच्या मुळाशी प्रामुख्याने याच बाबी आहेत. आज देशाचा (जगाचासुद्धा!) कोणताही किनारा पाहिला तर तिथे प्रचंड प्रमाणात वस्ती वाढली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून अतिक्रमणे झालेली आहेत. इथेच चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसतो आणि नुकसान वाढते. याशिवाय आपत्तीच्या वेळी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यातील तत्परता आणि त्यांना पुन्हा किनाऱ्यावरील आपत्तिप्रवण भागात वसू न देणे हे आपल्याकडील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यात अजून तरी आपण यशस्वी होऊ शकलेलो नाही. अशा स्थितीत मग चक्रीवादळांची माहिती पुरेशी आधी मिळूनही नुकसान व्हायचे ते होतेच. केवळ प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही, कारण नागरिक म्हणून आपण सारे तितकेच जबाबदार आहोत. याबाबतीत पूर्व किनारा काय आणि मुंबई-कोकणासारखा पश्चिम किनारा काय, सर्वत्र एकसारखीच बेशिस्त आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिगच्या काळात तर जगभरातील चक्रीवादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे चक्रीवादळांमुळे होणाऱ्या हानीमध्ये वाढच अपेक्षित आहे. अशा बिकट परिस्थितीत तरी किनारी भागातील अतिक्रमणे, आपत्तीच्या काळातील बेशिस्त आपण थांबवणार का आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सज्ज होणार का, हेच कळीचे प्रश्न आहेत.