Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

‘जोडी जमली रे’मध्ये वंदना गुप्ते
नेहमीच्या प्रथेप्रमाणे ‘जोडी जमली रे’मध्ये आज अभिनेत्री वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते हे सेलिब्रिटी दाम्पत्य स्पर्धकांच्या भेटीला येत आहेत. या भागाचे विशेष म्हणजे गुप्ते दाम्पत्य सर्वोत्तम जोडी निवडणार असून या सर्वोत्तम अनुरूप जोडीला ८० हजार रुपयांचे हिऱ्याचे दागिने बक्षीस म्हणून देण्यात येतील. प्रथितयश अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांची ओळख आहे. आपले पती शिरीष गुप्ते यांनी आपल्या कलाजीवनात कशी साथसोबत केली. त्यांचे अनुभवही ते स्पर्धक तसेच प्रेक्षकांसमोर सांगणार आहेत. त्याशिवाय शनिवारच्या भागात मॉलमध्ये जाऊन समान रंगाच्या, समान चवीच्या गोष्टी खरेदी करण्याचे ‘टास्क’ तिन्ही स्पर्धक जोडय़ांना देण्यात येईल. विवाह टिकविणे, त्या नात्यातले प्रेम टिकविणे-वाढविणे यातले गुपित गुप्ते दाम्पत्य सांगणार आहे. तसेच या भागात ‘रोमॅण्टिक प्रपोज राऊंड’सारखी धमाल फेरी खेळताना स्पर्धक काय-काय गंमत करतात तेही पाहायला मिळणार आहे. विजेत्या ठरलेल्या सर्वोत्तम जोडीला ८० हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. प्रथितयश कलावंत जोडय़ांना दर शनिवारी ‘जोडी जमली रे’मध्ये बोलावण्यात येत असल्याने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.
प्रतिनिधी

एंजल्स अँड डीमन्स
तत्त्वचर्चेच्या दोराला लटकलेले थरारनाटय़
धर्म आणि विज्ञान यात विरोधाभास असायला हवा का? असतो का? - या तात्त्विक पश्नंनाचा दोर धरून खूनसत्र-रहस्याच्या थरारनाटय़ाचा स्वर्ग गाठायचा प्रयत्न डान ब्राऊनने त्याच्या ‘एंजल्स अँड डीमन्स’ या कादंबरीत आणि दिग्दर्शक रॉन हॉवर्डने त्या कादंबरीवर आधारित चित्रपटात केला आहे. ‘दा व्हिंची कोड’प्रमाणेच. ‘दा व्हिंची कोड’ची सुरुवात तरी खरोखरीच रंजक, उत्सुकता निर्माण करणारी होती. आता ‘दा व्हिंची कोड’चा पॅटर्न परिचयाचा झाल्यानंतर तीच सगळी तत्त्वे वापरलेला ‘एंजल्स अँड डीमन्स’ पाहताना शिळा अनुभव घेत असल्याचीच भावना होते. पोपचा मृत्यू आणि नव्या पोपची निवड या यातल्या कळीच्या घटनांना अनुसरून व्हॅटिकन सिटीच्या भव्यतेचे दृश्य परिमाण कॅमेरा या चित्रपटाला देतो. व्हॅटिकन सिटी आणि रोममधली प्राचीन गूढ चर्चेस यांच्या चित्रीकरणाने या थरारनाटय़ात भव्यतेचा आणि गूढाचा परिणाम साधायचा प्रयत्न आहे. परंतु मुळात थरारनाटय़ाच्या आशयाचाच परिणाम उणा पडल्यामुळे ही भव्यताही फार काही प्रभाव पाडू शकत नाही.
कॅथलिक ख्रिश्चन धर्माच्या विरोधात कारवाया करणारी गुप्त संघटना, त्या संघटनेने आरंभलेले खूनसत्र, पुरातन चर्चेसच्या वास्तूंमधल्या शिल्पांत लपलेली सांकेतिक भाषा, प्रतीके आणि प्रतीकशास्त्राचा विशेषज्ञ रॉबर्ट लँगडन (टॉम हँक्स) याला रहस्याची उकल करण्यासाठी पाचारण केले जाणे ही या दोन्ही चित्रपटांतली समान तत्त्वे. ‘दा व्हिंची कोड’मध्ये ‘ओपस देइ’ ही प्राचीन गुप्त संघटना - सीक्रेट सोसायटी - सक्रिय आहे तर ‘एंजल्स अँड डीमन्स’मध्ये ‘इल्युमिनेटी’ ही कॅथलिक ख्रिश्चन धर्मविरोधी गुप्त संघटना. या संघटनेला पोपचे, पर्यायाने कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे साम्राज्य उद्ध्वस्त करायचे आहे. त्यासाठी व्हॅटिकन सिटीच स्फोटाने उडवून द्यायची आहे.
दुसरीकडे ‘अँटीमॅटर’ नावाच्या नव्या ऊर्जेचा शोध लावण्याचे काम गुप्तपणे काही वैज्ञानिक करताहेत. हे जे तथाकथित ‘अँटीमॅटर’ आहे ती प्रतिऊर्जा म्हणजे खरे तर आजच्या न्यूक्लियर ऊर्जेचाच अवतार आहे. विधायक कामासाठीही वापरता येईल आणि विध्वंसक प्रयोजनासाठीही. ते कसे वापरायचे हे माणसातला देवदूत ठरवेल किंवा दानव ठरवेल. ऊर्जेचा नवा स्रोत शोधून त्याचा विधायक वापर म्हणजे जणू प्रतिसृष्टी निर्माण करून ईश्वराच्या सृजनशक्तीला आव्हान देणे असेही काही जण म्हणू शकतात. म्हणून ते अँटीमॅटर तयार करावे की करू नये हाही तात्त्विक ‘डायलेमा’ होऊ शकतो. ‘इल्युमिनेटी’ ही संघटना नेमके हे अँटीमॅटर प्रयोगशाळेतून चोरून व्हॅटिकन सिटी उद्ध्वस्त करू पाहते. त्यासाठी अँटीमॅटर तयार करणाऱ्या दोघा शास्त्रज्ञांपैकी एकाची हत्या करते. त्याची सहकारी शास्त्रज्ञ डॉ. वित्तोरिया वेट्रा (अयेलेट झुरर) ‘इल्युमिनेटी’च्या कारस्थानाचा छडा लावण्याच्या मोहिमेत सामील होते.
प्रतीकशास्त्राचा विशेषज्ञ रॉबर्ट लँगडन याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून व्हॅटिकन सिटीला खास बोलावून घेण्यात येते. ‘दा विंची कोड’मध्ये लँगडन आणि सोफीची जोडी रहस्य उलगडण्यासाठी धावपळ करते, इथे लँगडन आणि वित्तोरियाची जोडी. (‘दा विंची कोड’मध्ये लिओनाडरे दा विंचीच्या पेंटिंगचा वापर केला आहे, इथे गॅलिलिओच्या ग्रंथाचा.) पोपच्या ऐन निवडीच्या दिवशीच ज्या चार उमेदवारांचे नामांकन झाले आहे, म्हणजेच जे ‘प्रीफरेटी’ आहेत त्यांचे तासा-तासाच्या अंतराने खून करण्यात येतील अशी धमकीही ‘इल्युमिनेटी’ने सांकेतिक भाषेत दिलेली आहे. रॉबर्ट लँगडन प्रतीकांचा अर्थ लावत त्या त्या चर्चमध्ये होणारा खून टाळण्यासाठी धावत राहतो, पण खून टाळू शकत नाही. प्रतीकांचा अर्थ लावण्याचा या चित्रपटातला प्रकार बालिश आणि एकूणच खुनामागच्या रहस्याची, अँटीमॅटरचा स्फोट घडवून आणण्यामागच्या कारस्थानाची उकल करण्याचा पटकथेतला प्रकार सुमार दर्जाचा आहे. त्यात तार्किक सहजता नसून अतार्किक सोपेपणा आहे. त्यामुळे तो प्रेक्षकाला मठ्ठ समजण्याचा उद्योग वाटतो. ‘इल्युमिनेटी’चे सदस्य हे व्हॅटिकनच्या कॅथलिक परंपरेतच छुपेपणाने वावरताहेत आणि अँटीमॅटर तयार करण्याचा गुप्त प्रयोग पोपच्या कार्यालयाच्या संमतीनेच चाललेला आहे. - रहस्यकथेतली एव्हाना रहस्य न राहिलेली ही तत्त्वे. त्यामुळे त्यांचे सुटणारे पीळदेखील पुरेसे रंजक होत नाहीत.
तत्त्वचर्चेचे सूत, नव्हे जाड दोर वापरूनही रॉन हॉवर्ड-टॉम हँक्स प्रभृती थरारनाटय़ाच्या स्वर्गापर्यंत न पोहोचता अधांतरीच लटकत राहतात.
‘एंजल्स अँड डीमन्स’
दिग्दर्शक - रॉन हावर्ड
कलावंत - टॉम हँक्स, अयेलेट झुरर, इव्हान मॅकग्रेगर.