Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

आयएलएस कॉलेज..ते केंद्रीय मंत्री!
अगाथा संगमाची भरारी
पुणे, २९ मे/खास प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्रीच नव्हे, तर देशाचे पंतप्रधानांनाही मोलाचे शैक्षणिक धडे देणाऱ्या विद्येच्या माहेरघराच्या लौकिकात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास खात्याच्या राज्यमंत्री अगाथा संगमा या पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत! साहजिकच, त्यांच्या निवडीने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. बारावीनंतर पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम करण्यासाठी अगाथा या दोन हजार साली पुण्यात आल्या.

तामिळनाडूत स्टालिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
करुणानिधींचा वारस ठरला..
चेन्नई, २९ मे/पीटीआय
तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी गेली अनेक वर्षे आपल्या मुलाला पुढील सूत्रे सांभाळणारा म्हणून जनतेसमोर प्रतिबिंबित केल्यानंतर त्यांनी आज अखेर स्टालिन याची राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली. ५५ वर्षीय स्टालिन यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक प्रशासन, जिल्हा महसूल आणि अल्पसंख्याक कल्याण ही खाती सोपविण्यात आली आहेत. आतापर्यंत या खात्यांचा कारभार करुणानिधी स्वत: पाहात होते.

मतभेद गाडून विधानसभेची तयारी करा
उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील नेत्यांना तंबी
ठाणे, २९ मे/प्रतिनिधी
ठाण्याची जागा गेल्याचे दु:ख शिवसेनाप्रमुखांनाही आहे. झाले तेवढे खूप झाले.. आता पुढच्या तयारीला लागा.. विधानसभेच्या निवडणुकीत ठाण्याचा बालेकिल्ला अभेद्य राहिला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सेना पदाधिकाऱ्यांना खडसावले. जे काही मतभेद असतील, ते इथेच गाडून निवडणुकांची तयारी करा, अशी तंबी देताना पदाधिकारी बदलाच्या शक्यतेला उद्धव ठाक रे यांनी पूर्णविराम दिला.

आघाडी कायम ठेवण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा राज्यातील नेत्यांना सूचक इशारा!
मुंबई, २९ मे / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात तीन मंत्रिपदे व शरद पवारांचे महत्त्व कायम राखतानाच स्वबळावर लढण्याची मागणी करणाऱ्या विलासराव देशमुख यांना तुलनेत कमी महत्त्वाचे खाते देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याचा सूचक संदेश दिला आहे. केंद्रात शरद पवारांकडे कृषी, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण ही तिन्ही खाती कायम ठेवण्यात आली.

स्वबळावरील निवडणुकीबाबत लवकर निर्णय व्हावा -भुजबळ
ठाणे, २८ मे/प्रतिनिधी

शिवसेना-भाजपा या जातीयवादी शक्तीला रोखण्यासाठी राज्यात राष्ट्रवादीने लहान भावाची भूमिका बजावत काँग्रेसशी आघाडी केली. लोकसभेतील यशानंतर काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा सुरू झाली आहे, म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीतील अशा नव्या समीकरणाबाबत दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी लवकरच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत मांडत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मतविभागणी टाळण्यासाठी आघाडीवर शिक्कामोर्तब केले.

मिहान प्रकल्पाला आता खरी गती -प्रफुल्ल पटेल
आर्थिक सुधारणांसाठी ‘हंड्रेड डेज्’
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

आर्थिक मंदीची झळ विमान वाहतूक क्षेत्रालाही बसली असली तरी, विदर्भासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मिहान प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती देऊ आणि प्रत्येक कामात जातीने लक्ष घालून सर्व अडचणी दूर करू, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज येथे दिली. नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून त्यांची ‘सेंकड इनिंग’ सुरू झाली. पहिल्या पाच वर्षांत देशातील विमानतळांचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि विमान वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या पटेल यांनी येत्या पाच वर्षांत वेगाने झेप घेऊ, असा विश्वास व्यक्त केला.

विलासराव-प्रतीक यांची ‘जोडी जमली रे!’
नवी दिल्ली, २९ मे/खास प्रतिनिधी

विलासराव आणि प्रतीक यांची जोडी जमल्याचे चित्र आज उद्योग भवनात बघायला मिळाले. अवजड उद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट व राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताना विलासराव देशमुख यांनी प्रतीक पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला, तर देशमुख यांच्यासारखे समर्थ असे वरिष्ठ सहकारी लाभल्यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल, असा विश्वास प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला. देशमुख आणि पाटील यांनी आज दुपारी उद्योग भवनातील आपापल्या कक्षात मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांचा एकत्रपणे सामना केला.

मंत्री लागले कामाला!
नवी दिल्ली, २९ मे/खास प्रतिनिधी

‘कामगिरी दाखवा किंवा दूर व्हा,’ असे नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पहिल्याच दिवशी बजावल्यानंतर ‘अजिबात वेळ दवडू नका,' असा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला गंभीर सल्ला शिरोधार्ह मानत आज बहुतांश केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. सूत्रे स्वीकारताना पत्रकार आणि कार्यकत्यार्ंमुळे दालने हाऊसफुल्ल झाल्याने पहिल्या दिवसापासून काम करण्याचा मंत्र्यांना जोम आला आणि त्यांनी आपले उद्दीष्टे जाहीर केले.

ममतांचा अजूनही टाटांवर राग कायम
नवी दिल्ली, २९ मे / पीटीआय

टाटा ट्रस्टने लोकसभा निवडणूक निकालानंतर दिलेला २७ लाख ६४ हजार ९२५ रूपयांचा धनादेश तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी साभार परत केला आहे. टाटा मोटर्सचा पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर नॅनो कारचा प्रकल्प उभारण्यास ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध करत आंदोलन केले होते व त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये न्यावा लागला होता. टाटा ट्रस्टने दिलेला धनादेश आभारसह या अगोदरच परत दिल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. टाटा सन्स्ने उभारलेल्या टाटा इलेक्ट्रोल ट्रस्टने निकालानंतर तृणमूल काँग्रेसला वरील रकमेचा धनादेश दिला होता. २००४ मध्ये लोकसभेची केवळ एक जागा जिंकणाऱ्या तृणमूलने या वेळी दमदार कामगिरी करत राज्यातील ४२ पैकी १९ जागा जिंकल्या आहेत. कोणत्या उद्योगाशी पक्षाची बांधिलकी राहू नये यासाठी आम्ही कोणत्याही उद्योगसमूहाकडून देणग्या घेत नाही. आमची बांधिलकी केवळ सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी व गरीब जनतेशी आहे, असे तृणमूलचे खासदार व ग्रामीण विकास राज्यमंत्री शिशिर अधिकारी यांनी सांगितले. बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पक्षसचिवांची बैठक होऊन निधी नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. बॅनर्जी यांच्या आंदोलनामुळे नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये न्यावा लागल्याचा आरोप टाटा उद्योगसमूहाने केला होता.