Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

लोकमानस

बाह्येंद्रियाच्या साधनाची जोड हवी

 

परंपरा-रूढी या समाजामध्ये वैज्ञानिक संस्कृती रुजवण्याच्या आड येतात असे (लोकमानस, २५ एप्रिल) सांगताना अवधूत परळकर मनाचे स्वतंत्र अस्तित्व नाकारतात. वैचारिक प्रक्रिया केवळ मेंदू करतो हे सांगताना त्यांनी वैज्ञानिक सिद्धांताचा नेमका संदर्भ सांगितलेला नाही. सिग्मंड फ्रॉइडबरोबर अलीकडच्या काळातील मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग (१८७५-१९६१) यांचा उल्लेख त्यांनी का केला नाही? भगवद्गीतेत कर्मयोगात म्हटले आहे की, इंद्रिय ही (देहापेक्षा) सूक्ष्म म्हणून श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ..(अथवा त्यापलीकडील आहे.)
इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचा परस्पर संबंध यात स्पष्ट होतो. इंद्रियांना मनाकडून मिळालेल्या आदेशानुसार क्रिया घडतात. तसा आदेश देताना त्या क्रियांच्या बऱ्यावाईट परिणामांची पूर्वकल्पना मन करू शकत नाही. जर बुद्धी चांगली असेल तर मनाकडून पार पाडल्या जाणाऱ्या क्रियांचे संभाव्य परिणाम बुद्धी जाणू शकते. त्याहीपलीकडे चित्त हे बुद्धीवर ताबा ठेवू शकते. अंत:करणपूर्वक केलेली कृती व केवळ बुद्धी वापरून केलेली कृती यांत खूप फरक असतो. परंतु या टप्प्यातही डावे-उजवे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या वेळी इंद्रियांची कार्यसूत्रे चित्ताच्या पलीकडील असलेले चैतन्य हाती घेते तेव्हा ते कार्य अलौकिक ठरते. मेंदू सर्व मानवी शरीरात आढळतो. परंतु केवळ मेंदूच वैचारिक प्रक्रियांचे काम पाहतो, तर व्यक्तीनुसार कार्यात फरक का? सर्व भारतीय तत्त्वदर्शनात ‘मन’ हे स्थूल देहाहून वेगळे मानले आहे. योगदर्शनाप्रमाणे मन हे २४ तत्त्वांपैकी एक तत्त्व असून, ते अहंकार या तिसऱ्या तत्त्वातील तत्त्वप्रधान अहंकारातून विकसित झाले आहे. योगदर्शनात यास ‘चित्त’ अशी संज्ञा आहे.
‘अंत:करण’ अशीही संज्ञा भारतीय दर्शनात दिलेली आढळते. मूलत: मन हे आत्म्यात ज्ञान निर्माण करणारे आत्म्याचे साधन आहे. नेत्र, श्रोत्र, त्वक्, रसना आणि घ्राण या बाह्य ज्ञानेंद्रियांप्रमाणेच सर्व बाह्य आणि कर्मेद्रियांना आधार देऊन त्यांच्यातून उत्पन्न होणारे ज्ञान व कर्मे निर्माण करण्याचे साधन म्हणजे मन होय. नेत्र, श्रोत्र इ. इंद्रियांचा शब्द, रूप इ. बाह्य विषयांशी संपर्क आल्यावर त्या विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. परंतु मनाचा आणि इंद्रियांचा दृढ संपर्क नसेल तर विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान होणे असंभव.
आपल्याभोवती गंध, वारा, आवाज, प्रकाश अशा अनेक विषयांसंबंधी घटना घडत असतात. असे असूनही सर्व इंद्रियांना त्याचा अनुभव येतोच असे नसते. यासाठी बाह्येंद्रियांना जोडणारे इंद्रिय हवे असते व ते इंद्रिय म्हणजे मन होय. घटनांची स्मृती व तिच्यातून मानसिक अवस्थांचा अनुभव घेणारा आत्मा असतो आणि बाह्येंंद्रियांशी जोडणारे साधन म्हणजे मन असते.
डॉ. श्रीकांत परळकर, मुंबई
shriparalkar@gmail.com

उदात्तीकरण टाळा
‘भटकत फिरलो भणंग आणिक’ हा लेख विचारप्रवृत्त करणारा आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत निमशहरी गावांत कलंदर पण भणंग अवस्थेतल्या एखाददोन व्यक्ती तरी बघायला मिळत. ती व्यक्ती लहानपणापासून कशी ‘एक्स्ट्राऑर्डिनरी’ बुद्धिमान होती, अतिहुशारीमुळे किंवा एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे तिच्या डोक्यावर कसा परिणाम झाला, हे अनुभवी मंडळी सांगत. अशा व्यक्तींना कणवेपोटी गावकरी सांभाळून घेत. पण त्यांचे मनोविश्लेषण करण्याचे कुणाला सुचले नाही, याचे आता ‘त्रिकालवेध’ वाचल्यानंतर आश्चर्य वाटते. मात्र मुकुल शिवपुत्र यांच्या उल्लेखाबाबत नमूद करू इच्छितो की, अंगच्या कलेमुळे लोकप्रिय कलावंत चलतीच्या काळात व्यसनाधीन होतात. तरी त्या व्यसनाधीनतेचे बऱ्याच वेळा चाहते व मीडियाकडूनही उदात्तीकरण होते, ते मात्र टाळावयास हवे.
जयंत पठाडे, डोंबिवली