Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

विकासाच्या प्रकल्पासाठी तालुका केंद्र धरणार - पवार
सांगोला, २९ मे/वार्ताहर

देशात व राज्यात यापूर्वी विकासाचे प्रकल्प राबविताना जिल्हा हे सूत्र होते. परंतु यापुढे तालुका सूत्र धरून निधी उपलब्ध करून देऊन विकासाच्या योजना राबवून मागासलेल्या व दुष्काळी तालुक्याचा कायापालट करण्याचा निर्धार केला असल्याचे प्रतिपादन देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानिमित्त मतदारांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पवार सांगोला येथे आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सांगोला नगरपरिषदेच्या वतीने सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन व व्यापारी संकुलाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

निवडणूक प्रचार न केल्याने सांगलीच्या राजावर सूड?
सांगली, २९ मे / गणेश जोशी

सांगलीचे तत्कालीन संस्थानिक विजयसिंह पटवर्धन यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील पुरस्कृत विकास महाआघाडीचे उमेदवार आमदार अजित घोरपडे यांच्या प्रचारात सहभाग न घेतल्याने काळी खण जागेप्रकरणी त्यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून, एकप्रकारे निवडणुकीचा सूड उगवल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विजयसिंह पटवर्धन हे सांगलीत परतल्यानंतर सांगलीला नावाचा तरी का होईना राजा मिळाला, अशी भावना सांगलीकरांतून व्यक्त केली जात होती. या राजाचे उत्स्फूर्त स्वागतही करण्यात आले होते.

कोल्हापुरात पुन्हा एकदा कचऱ्याचे साम्राज्य टोपमध्ये कचरा टाकण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई
कोल्हापूर, २९ मे / विशेष प्रतिनिधी
न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरील मोठा संघर्ष करून कोल्हापूर महापालिकेने शहराच्या कचऱ्यातील अविघटित पदार्थ टाकण्यासाठी मिळविलेल्या टोप येथील जागेत कचरा टाकण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा कचऱ्याचे साम्राज्य उभे राहू लागले आहे. यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी तातडीने एक बैठक बोलावून दिशा ठरवली जाईल असे आश्वासन स्थायी सभापती इंद्रजित सलगर यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.

सोलापूरचा राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्प पूर्णत्वासाठी प्राधान्य- शिंदे
सोलापूर, २९ मे/प्रतिनिधी

बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या वर्षीच म्हणजे येत्या चार-पाच वर्षांत फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील साडेसहा हजार कोटींचा राष्ट्रीय औष्णिक विद्युतनिर्मिती प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याकडे आपला कटाक्ष राहील, असे सांगून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, देशात वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रांच्या निर्मितीच्या चार कारखान्यांचा भारतातील कंपन्यांशी करार झाल्याची माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर प्रथमच शिंदे यांचे सोलापूरला आगमन झाले.

रवी बँकेच्या संचालकांना पोलिसांचा वेगळा न्याय कशासाठी?
कोल्हापूर, २९ मे / नंदकुमार ओतारी

एखादा गुन्हा दाखल झालेली संशयीत आरोपी असलेली व्यक्ती सापडत नसेल तर संबंधीत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणून दबाव आणला जातो. बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल अशी संबंधीतांना धमकी देवून संशयीत आरोपीने पोलीस ठाण्यात येवून हजर व्हावे अशी परस्थिती निर्माण केली जाते.

नर्सिग महाविद्यालयात वासनाकांडाचा पत्रकाराचा दावा
मुलीचा मात्र आई-वडिलांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप
इचलकरंजी, २९ मे / वार्ताहर
परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीस वाममार्गाला लावून त्याची अश्लील चित्रफीत बनवून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप पत्रकार असणाऱ्या पित्याने केल्याने खळबळ उडाली आहे. पित्याने हे निवेदन कोल्हापूर येथे प्रभारी पोलीस अधीक्षक शारदा निकम-राऊत यांच्याकडे सादर केल्यानंतर पोलिसांनी इचलकरंजी व शिरोळ येथे तपास सुरू केला आहे.

करवीरनगर वाचन मंदिरात आज रंगणार कविसंमेलन
कोल्हापूर, २९ मे / विशेष प्रतिनिधी
येथील बिरादर प्रकाशनच्यावतीने आज करवीरनगर वाचन मंदिर येथे शनिवार, ३० मे २००९ रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगाव येथील सुप्रसिध्द कवयित्री स्वाती परळकर यांना निमंत्रित केले असून प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरच्या उपमहापौर स्मिता माने यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख कवी म्हणून मुंबईस्थित कोल्हापूरवासी कवी बाळासाहेब तोरस्कर यांना बहुमान देण्यात आला असून सहप्रमुख कवी म्हणून कवी अशोक भोईटे हे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई जिल्ह्य़ातील कवी सहभागी होणार असून या कार्यक्रमाचे स्वागत करण्यासाठी येथील रसिक बहुसंख्येने उपस्थित रहावेत तसेच अद्याप ज्या कवींना या संमेलनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संमेलनापूर्वी दोन तास अगोदर संयोजकांकडे आपल्या स्वरचित चार कविता आणून देण्याच्या आहेत, असे आवाहन बिरादर प्रकाशनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतीक पाटलांकडून ३०० साईभक्तांना नारळ वाटप
माळशिरस, २९ मे/वार्ताहर
नवस केला निवडून येण्यासाठी त्यानुसार निवडून तर आलेच पण मंत्रिपदही मिळाले. आंधळा मागतो एक देव देतो दोन, नूतन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या अकलूजच्या हितचिंतकांना साईबाबा पावले म्हणून त्यांनी ३०० साईभक्तांना नारळाचे वाटप केले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांनी निवडून यावे म्हणून राजाभाऊ लव्हाळे यांनी संग्राम मगरच्या साईबाबांना नवस केला होता. ते निवडून तर आलेच परंतु मंत्रिमंडळातही त्यांची वर्णी लागल्याने लव्हाळे कुटुंबाने आनंदोत्सव साजरा करीत केला.

‘गल्लीत गोंधळ..’ चे प्रदर्शन रोखण्याचा इशारा
कोल्हापूर, २९ मे / प्रतिनिधी
श्री गणेश आणि विठ्ठल या हिंदू दैवतांची निंदा नालस्ती करणारे प्रसंग चित्रीत करण्यात आलेल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाचे प्रदर्शन रोखा अन्यथा चित्रपटगृहात घुसून या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन हिंदू जनजागरण समितीने आज लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल चित्रपटगृहात आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्वती चित्रपटगृहात गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट दाखवला जातो आहे. या चित्रपटात श्री गणेशाची आणि विठ्ठलाची निंदानालस्ती करणारे प्रसंग आहेत. हिंदूू दैवतांची विटंबना करणारा हा चित्रपट बंद करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पत्रकार संजय साळुंखेंना शस्त्रक्रियेसाठी सातारा पत्रकार संघातर्फे अर्थसाहाय्य
सातारा, २९ मे/प्रतिनिधी

येथील पत्रकार संजय साळुंखे यांच्या रुबी हॉलमध्ये होणाऱ्या किडनीरोपण शस्त्रक्रियेसाठी सातारा पत्रकार संघाने मदत गोळा करण्याची मोहीम आखून अडीच लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य आज त्यांच्याकडे सुपूर्द केले व सहजीवनातील मित्राच्या बरोबरच्या सामीलकीचे व मानवतेचे दर्शन घडविले.सातारा पत्रकारसंघाचे अध्यक्ष विजय मांडके यांनी सव्वादोन लाखाचा धनादेश तसेच धनाकर्ष तसेच रोख स्वरुपातील रक्कम व धनादेश संजय साळुंखे यांना निर्मल हॉटेल येथे शहरातील सर्व दैनिकांचे पत्रकार, छायाचित्रकार वाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

जुन्या बसस्थानकाचाही वापर करण्याची मागणी
पंढरपूर, २९ मे / वार्ताहर
जुन्या बस स्थानकामध्ये चालक वाहक यांना विश्रांती बरोबर दवाखाना, पार्सल कार्यालय करण्यात यावे व उरलेल्या मोकळ्या जागेत बस थांबण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड व महासचिव प्र. बी. कुलकर्णी तसेच ग्राहक पंचायत यांनी केली आहे. नव्या बसस्थानकासमोरच एस. टी. चे भव्य असे शेड आहे. यातील समोर असलेल्या एका शेडचा उपयोग ग्रामीण बस स्थानक केल्यास सर्व प्रवासी लोकांची सोय होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना दुरच्या प्रवासाला जाण्यासाठी लागणारा वेळ वाचून नव्या बस स्थानकावर लागलेल्या गाडय़ास जाण्याची वेळेत सोय होणार आहे.

श्याम बेनेगल शिष्यवृत्ती सुरेखा वाघ यांना
माळशिरस, २९ मे/वार्ताहर
राष्ट्रीय छात्रसेनेत विशेष कामगिरी करणाऱ्या अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या सुरेखा वाघ या विद्यार्थिनीस राष्ट्रीय स्तरावरील श्याम बेनेगल शिष्यवृत्ती व झाशी राणी पुरस्कार मिळाला आहे. . वाघ हिने छात्रसेनेतील वरिष्ठ अधिकारी असून तिने सन २००८ च्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने संचलन केले होते. त्या संघाचे नेतृत्व केले होते. पंतप्रधान मनमोहनसिंग तसेच संरक्षणमंत्री वायूदल, हवाई व भूदलाचे प्रमुख यांनी वाघ हिचे कौतुक केले होते. त्याबद्दलही ‘बेस्ट गार्ड कमांडर’ चा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय छात्रसेनेच्या ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षेतही तिने ‘ए’ श्रेणीत सर्व-प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी सोलापुरातून रायगडावर शिवज्योत
सोलापूर, २९ मे/प्रतिनिधी

किल्ले रायगडावर ५ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी सोलापुरातील शिवप्रभू प्रतिष्ठानच्या चारशे शिवभक्तांचा ताफा शिवज्योत घेऊन सोमवारी १ जून रोजी रवाना होणार आहे. शिवाजी चौकातील अश्वारूढ शिवपुतळय़ास अभिवादन करून या परिक्रमेस सुरुवात होण्यापूर्वी तुळजापुरातून ही शिवज्योत सोलापुरात येईल. दुपारी दोन वाजता ही शिवज्योत परिक्रमा रायगडाकडे रवाना होणार असल्याचे शिवप्रभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले.