Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९

धोनी ब्रिगेड निघाली पुन्हा विश्वचषक जिंकायला
मुंबई, २९ मे / क्री. प्र.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘ट्वेण्टी-२०’ क्रिकेटचे विश्वविजेतेपद राखण्यासाठीच्या मोहिमेवर भारतीय क्रिकेट संघ आज रवाना झाला. आयपीएल स्पर्धा खेळून दक्षिण आफ्रिकेहून नुकत्याच परतलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा उत्साहाचे उसने अवसान घेतले होते. जायबंदी झहीर खान स्पर्धेआधी तंदुरुस्त होणार या आशेने मात्र या संघात उत्साहाचे वारे संचारले होते.

शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडेच
मुख्यमंत्र्यांनी मेटे, खेडेकर यांना फटकारले

मुंबई, २९ मे / खास प्रतिनिधी
मुंबईतील नियोजित शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असतानाच समितीचे अध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचे सांगून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला कोणी सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर आक्रमक झालेल्या विनायक मेटे व खेडेकर या मराठा संघटनांच्या नेत्यांना हाणला आहे.

..तर राज ठाकरे यांना उभा महाराष्ट्र आडवा केल्याशिवाय राहणार नाही
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

सगळ्या महाराष्ट्राच्या हिताचा मक्ता घेतल्यागत बोलण्याची सवय लागलेल्या राज ठाकरे यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, म्हणजे आपण काय लायकीचे आहोत ते त्यांच्या लक्षात येईल. अध्र्या हळकुंडाने पिवळे पडल्यागत राज ठाकरे नको त्या गोष्टीत नाक खुपसून अपुऱ्या माहितीच्या आधारावर वाटेल ती बकबक करीत आहेत. खरे तर राज ठाकरे महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाच पर्यावरणाच्या व अन्य विकासाच्या नावाने तीव्र विरोध केला होता हे कदाचित ठाकरे महाशय विसरले असतील, पण शिवप्रेमी जनता विसरली नाही.

मेटेंसारखी विषवल्ली जनतेने उखडून फेकावी- मधू चव्हाण
मुंबई, २९ मे/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या अध्यक्षतेखाली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी करून जातीयवादाचे व विद्वेषाचे संतापजनक व हिडीस प्रदर्शन केले आहे ते केवळ निषेधार्ह नाही तर ही विध्वंसक विषवल्ली येथेच उखडून फेकून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेने एकत्र येणे आवश्यक आहे, अशा तीव्र शब्दांत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार मधू चव्हाण यांनी हल्ला केला. पुरंदरे यांची नियुक्ती सरकारने रद्द केली तर भाजप त्या विरोधात संघर्ष करील, असा इशारा प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे यांनी दिला.

शिवाजी महाराजांना कोणत्याही जातीत अडकवू नका -शरद पवार
फलटण, २९ मे/प्रतिनिधी

युगपुरुषांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करू नका, असे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना ठणकाविले. छत्रपती शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असा संकुचित विचार रुजणे, हे धोकादायक असून शिवरायांचा इतिहास संभाजी ब्रिगेड ठरविणार काय, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र आणून ज्यांनी एक मोठी ताकद निर्माण केली, अशा महापुरुषाला जातीच्या राजकारणात अडकविणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

पुरंदरेंकडून इतिहासाचे विद्रुपीकरण -दलवाई
नगर, २९ मे/प्रतिनिधी
इतिहासाचे विद्रुपीकरण करून बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजीमहाराज मुस्लिमविरोधी होते, असा खोटा इतिहास समोर आणला. त्यामुळे मुंबईतील शिवस्मारक समितीवर त्यांची नेमणूक सरकारने करू नये. राज ठाकरे यांनीही त्यास वादाचे स्वरूप देऊन राजकारण करू नये व हिंसेंची भाषा वापरू नये, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी केले. दलवाई म्हणाले की, शिवाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यास आमचा पाठिंबा आहे. स्मारकासाठी सरकारने समिती स्थापन केली नसली, तरी नोकरशाहीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या माध्यमातून पुरंदरे यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावास आमचा विरोध आहे. पुरंदरेंपेक्षा अनेक चांगले इतिहासकार आहेत. त्यांना समितीवर घ्यावे. पुरंदरे यांच्यामुळे खोटा इतिहास लोकांसमोर जाईल. ‘जाणता राजा’च्या माध्यमातून त्यांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी बनवली.

भारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियात ‘पेट्रोल बॉम्ब’चा हल्ला
मेलबर्न, २९ मे/वृत्तसंस्था

भारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले वांशिक विद्वेषातून होत नसल्याचा कितीही दावा ऑस्ट्रेलियाई प्रशासन करीत असले, तरी हल्ल्यांचे प्रमाण मात्र वाढत आहे. ताज्या घटनेत काल सिडनीमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर ‘पेट्रोल बॉम्ब’ने हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले. हल्ल्यात विद्यार्थी ३० टक्के होरपळला असल्याचे वृत्त येथील भारतीय समुदायाचे स्थानिक वृत्तपत्र ‘साऊथ एशिया टाइम्स’ने दिले आहे. या आठवडय़ात झालेला हा चौथा हल्ला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी जीआर जारी
प्रवेश प्रक्रिया चालणार ३५ दिवस

मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शासन निर्णय (जीआर) अखेर आज शालेय शिक्षण विभागाने जारी केला. एमएमआरडीए क्षेत्रातील (मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील) अकरावीचे प्रवेश केवळ ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाविद्यालय स्तरावर अर्ज सादर करण्याचा पर्याय विद्याथ्यार्ंसाठी यंदा उपलब्ध असणार नाही. मात्र अल्पसंख्याक महाविद्यालयातील ५० टक्के व एमसीव्हीसी अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर होतील, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

गझल गायिका चित्रा सिंग यांच्या मुलीची आत्महत्या
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी
प्रसिद्ध गझल गायिका चित्रा सिंग यांची मुलगी मोनिका चौधरी (४५) हिने गुरूवारी रात्री वांद्रे येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून मोनिका हिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब अजमावणारी मोनिका वांद्रे येथील पेरी क्रॉस मार्गावर राहते. आज सकाळी तिचा मुलगा तिच्या खोलीमध्ये गेला असता त्याला गळफास लावलेला मोनिकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याने आरडाओरड केली. मोनिकाला तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण परंतु दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे उपायुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले. मोनिका ही सिंग यांची पत्नी चित्रा आणि देबो प्रसाद दत्ता यांची मुलगी होती. दत्ता यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर चित्रा यांनी जगजीत सिंग यांच्याशी विवाह केला. त्यानंतर सिंग यांनी मोनिकाचीही जबाबदारी स्वीकारली होती. काही वर्षांपूर्वी जगजीत सिंग यांचा मुलगा विवेक याचे अपघाती निधन झाले होते.

उत्तर कोरियाने केली सहावी क्षेपणास्त्र चाचणी
सोल, २९ मे/पीटीआय
चालू आठवडय़ाच्या प्रारंभी केलेल्या अणुचाचणीनंतर क्षेपणास्त्रांची सहावी चाचणीही उत्तर कोरियाने शुक्रवारी पार पाडली. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अणुचाचणी केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने र्निबध लादले तर त्याचा आपण प्रतिकार करू असे आज उत्तर कोरियाने म्हटले आहे.उत्तर कोरियाने पूर्वी केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांपेक्षा चालू आठवडय़ात केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या सर्वार्थाने वेगळ्या आहेत. १६० कि. मी. पर्यंतच्या पल्ल्यामध्ये लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या व भूपृष्ठावरून हवेत मारा करावयाच्या या क्षेपणास्त्राची सहावी यशस्वी चाचणी करण्यात आली. अणुचाचणी केल्याबद्दल आमच्यावर आंतरराष्ट्रीय दबावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने र्निबध लादले तर स्वसंरक्षणासाठी त्याचा प्रतिकार केला जाईल असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी